Wednesday, March 13, 2024

 वृत्त क्र. 239 

प्रधानमंत्र्यांचा नांदेडसह देशभरातील सफाई कामगारांची संवाद

 

पीएम सुरज क्रेडिट सपोर्ट राष्ट्रीय पोर्टलचा शानदार शुभारंभ

 

नांदेड दि. 13 : केंद्रीय सामाजिक न्याय विभागामार्फत आज पासून वंचित समुदायाला उद्योग, व्यवसायासाठी ऑन लाईन कर्ज उपलब्ध करणाऱ्या महत्त्वाकांक्षी पीएम सुरज राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नांदेड सह देशभरातील 525 जिल्ह्यातील सफाई कामगारांची यावेळी संवाद साधला.

 

नांदेड येथील नियोजन भवनांमध्ये या कार्यक्रमासाठी सफाई कामगार तसेच आयुष्यमान योजनेचे लाभार्थी यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. सामाजिक न्याय विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्जवाटप योजनेतून लाभार्थ्यांना कर्ज वाटपही करण्यात आले. बीज भांडवल योजनेतूनही लाभार्थ्यांना यावेळी धनादेश देण्यात आले.

 

नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मीनगिरे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक डी.डी. मोहिते, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

अनुसूचित जाती, जनजाती व इतर मागासवर्ग समुदायातील महिला, पुरुष उद्योग इच्छूक नागरिकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कोणत्याही बँकेत न जाता ऑनलाईन या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. यावेळी देशभरातील अनुसूचित जाती जनजाती व इतर मागासवर्गीय समुदायातील ज्या नागरिकांनी आपल्या व्यवसायाला महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत विविध योजनेचा लाभ घेऊन नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसाय उभारले त्यांच्यातील नवउद्योजकांसोबत प्रतिनिधीक चर्चा प्रधानमंत्र्यांनी केली.

 

तत्पूर्वी, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करणाऱ्या श्रीमती आरती शाम वाघमारे कापड व्यवसाय सुरू करणारे संतोष किशन शिंदे यांचा मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना धनादेश देण्यात आला. विभागामार्फत मिळणाऱ्या अन्य योजनांचे धनादेश यावेळी देण्यात आले. यासोबतच नांदेड महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या 27 सफाई कर्मचाऱ्यांना पीपी सुरक्षा किट देण्यात आल्या. दहा लोकांना आयुष्यमान कार्ड देण्यात आले. नांदेड ग्रामीण भागातील निळा व तुप्पा या गावातील नागरिकांना देखील आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला संत रोहिदास चर्मकार महामंडळ इतर मागासवर्गीय विकास महामंडळ व राज्य शासनाच्या अनुसूचित जाती जनजाती व इतर मागासवर्गीय समुदायाला लाभ देणाऱ्या मंडळांचे अधिकारी उपस्थित होते.

00000










 वृत्त क्र. 238 

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातर्फे

"बालरक्षा" किटचे वितरण 

नांदेड, दि. 13 :  नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नांदेडच्या वतीने आज 13 मार्च  रोजी सकाळी 10.30 वाजता नांदेड-वाघाळा शहर संचलीत वजिराबाद येथील माध्यमिक  महानगरपालिका शाळेत बाल रक्षा किटचे विनामूल्य वितरणास मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सुरूवात  करण्यात आली. आयुष मंत्रालयाच्याअंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था नवी दिल्ली यांच्याद्वारा विकसित केलेली आयुर्वेदीय औषधींची किट ही शालेय बालकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे तसेच त्यांचा विविध व्याधीच्या संक्रमणापासून बचाव करण्याकरीता अत्यंत उपयुक्त आहे. 

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नांदेडच्या या उपक्रमामुळे परिणामी नांदेड शहरातील मुलांच्या आरोग्याचा स्तर वाढेल. शालेय मुले सुदृढ व सशक्त झाल्यास शाळेतील उपस्थिती वाढेल, परिणामी नांदेड शहरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल असा आशावाद मनपा आयुक्तांनी या प्रसंगी व्यक्त केला. अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांनी या उपक्रमामागील भूमिका विशद करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांना त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. 

मनपा संचलित सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य निरोगी रहावे यासाठीच सदर आयुर्वेदीय औषधींचे बालरक्षा किटचे वितरण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाच्या वैद्यकीय चमूने सर्व शालेय विद्यार्थ्यांना बालरक्षा किट वितरित करून त्यातील चारही औषधांविषयी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे विस्तृत स्वरूपात त्याची उपयोगिता व त्याचे सेवनाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात उपायुक्त ॲड. अजितपाल सिंह संधू, मनपा शिक्षणाधिकारी राजेश पातळे, आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन सिंग, शासकीय आयुर्वेद रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. मंजुषा पाटील, शाळेचे  मुख्याध्यापक साईनाथ चिद्रावार, डॉ. प्रसाद देशपांडे आणि डॉ. देवकुमार राऊत  आणि वैद्यकीय चमूतील सर्व सदस्य  उपस्थित होते.

000000







 वृत्त क्र. 237 

नांदेड जिल्ह्यातील 17 वाळू गटांना पर्यावरण अनुमती

सात गाळ मिश्रित वाळूगटातून गाळ काढण्‍यासाठी परवानगी 

नांदेड दि. 13 : - नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्‍हयात एकूण 24 वाळू डेपो प्रस्तावित करण्‍यात आले आहे. यामध्‍ये बिलोली, देगलुर, माहुर, हदगाव व हिमायतनगर तालुक्‍यातील 17 वाळू डेपो हे नियमित वाळू डेपोना पर्यावरण अनुमती प्रदान करण्‍यात आली आहे. तर उर्वरित 7 वाळू डेपो नांदेड व लोहा तालुक्‍यातील गाळमिश्रीत वाळू डेपो आहेत. या गाळमिश्रीत वाळू डेपोमधुन गाळ काढण्‍यासाठी विशेष बाब म्‍हणुन यंत्राच्‍या सहायाने परवानगी देण्‍यात आली आहे.

पर्यावरण अनुमती प्राप्‍त नियमित वाळू डेपो 

बिलोली तालुक्यातील येसगी येथील वाळू डेपोच्या ठिकाणाशी संलग्न असलेले रेतीघाट येसगी, गंजगाव, कार्ला बु., तर नागणी वाळू डेपोच्या ठिकाणी नागणी व माचनुर, देगलूर तालुक्यातील तमलुर या वाळू डेपोच्या ठिकाणाशी संलग्न असलेले रेतीघाट तमलुर, मेद्दनकल्‍लुर तर शेवाळा डेपोच्या ठिकाणी शेवाळा, शेळगांव हे रेतीघाट आहेत. तर हदगाव तालुक्यातील बेलमंडळ वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट गोर्लेगांव, बाभळी, बनचिंचोली, बेलमंडळ, गुरफळी हे आहेत. बिलोली तालुक्यातील माचनुर डेपोशी संलग्न माचनुर रेतीघाट आहे. बिलोली तालुक्यातील सगरोळी 1 वाळू डेपोशी संलग्न सगरोळी रेतीघाट तर गंजगाव वाळू डेपोच्या ठिकाणाशी संलग्न गंजगाव व कार्ला बु., माहूर तालुक्यातील केरोळी वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट टाकळी, लांजी तर कोळी बे वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट सायफळ हे आहे. बिलोली तालुक्यातील बोळेगाव वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट बोळेगाव, येसगी तर हुनगुंदा वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट हुनगुंदा, माचनुर हे आहेत. सगरोळी-2 वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट सगरोळी, बोळेगाव हे आहेत. तर देगलुर तालुक्यातील शेखापुर वाळू डेपोशी संलग्न रेतीघाट शेखापुर, शेळगांव हे आहेत. हिमायतनगर तालुक्यातील विरसणी वाळू डेपोच्या ठिकाणाशी संलग्न असलेले रेतीघाट विरसणी, पिंपरी, कामारी, दिघी, घारापुर, रेणापुर हे आहेत. तर उमरी तालुक्यातील बळेगाव वाळू डेपोशी संलग्न बळेगाव रेतीघाट आहे. हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली ज. वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट डोलारी, बुंदली बे.कौठा, धानोरा ज. पळसपुर हे रेतीघाट आहेत.

गाळ मिश्रित डेपो 

नांदेड तालुक्यातील वाघी वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट रहाटी बु. , सोमेश्‍वर, जैतापुर, थुगांव, हस्‍सापुर, कोटीतीर्थ, बोरगांव तेलंग हे आहेत. खुपसरवाडी वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट वाहेगांव, भनगी, गंगाबेट, असर्जन, विष्‍णुपूरी, मार्कंड, पिंपळगांव मि., कौठा हे आहेत. भायेगाव वाळू डेपोशी संलग्न असलेले रेतीघाट भायेगांव, राहेगांव, नागापुर, पुणेगांव, ब्राम्‍हणवाडा, त्रिकुट, बोंढार तर्फे हवेली, सिद्धनाथ, वांगी, किकी हे आहेत. लोहा तालुक्यातील बेट सांगवी वाळू डेपोशी संलग्न बेटसांगवी, शेवडी हे रेतीघाट तर येळी वाळू डेपोशी संलग्न असलेले येळी रेतीघाट, पेनुर वाळू डेपोत पेनुर तर मारतळा वाळू डेपोत कौडगांव या रेतीघाटाचा समावेश आहे. 

या रेतीघाटावर गाळ काढण्यासाठी यंत्राच्या सहाय्याने विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. या वाळू गटाव्‍यतिरिक्‍त इतरत्र ठिकाणावरुन गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी व मन्‍याड या नदीपात्रातुन उत्‍खनन होत असल्‍यास तसा प्रकारची रितसर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 236

तीन तालुक्यातील नवीन तीन महसूल महामंडळात

दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित 

नांदेड दि. 13 : - राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसूली मंडळामध्ये माहे जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि.पेक्षा कमी झाले आहे, अशा 10 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णया मध्ये नमूद नांदेड जिल्ह्यातील महसुल मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होवून नवीन महसूली मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत. तसेच त्या महसूली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही, अशा नांदेड जिल्ह्यातील नांदेड, घुंगराळा, दिग्रस बू या तीन नवीन महसूल मंडळे दुष्काळ सदृष्य मंडळे म्हणून घोषित केली आहेत. या घोषित केलेल्या महसूली मंडळासाठी सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे. 

दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेले तालुके व महसुल मंडळामध्ये नांदेड तालुक्यातील नांदेड, नायगाव खै. तालुक्यातील घुंगराळा, कंधार तालुक्यातील दिग्रस बू. या महसूल मंडळाचा समावेश आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 3 महसूल मंडळात शासनाने विविध सवलती लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्रचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतीचा समावेश असणार आहे.   

दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या महसूल मंडळातील संबंधित विभागाच्या प्रमुखांनी  गावातील खातेदारांना लागू करण्यात आलेल्या सवलती व उपाययोजना देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

0000


 वृत्त क्र. 235 

लोकसभा निवडणुकीसाठी

नांदेड जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती गठीत

 

नांदेड दि. 13 : - वृत्तपत्रइलेक्ट्रॉनिक मीडियासोशल मीडिया व अन्य माध्यमातून आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये व निरपेक्ष वातावरणात निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी माध्यमांची देखरेख व सनियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाने एमसीएमसी (माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती ) समिती जिल्हयासाठी गठीत करण्यात आली आहे.

 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय पक्ष अथवा उमेदवारांकडून प्रसारित करण्यात येणाऱ्या कोणत्याही माध्यम प्रकारातील जाहिरात मजकूरांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व देखरेख (एमसीएमसी) समिती गठीत करण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

 

या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत हे आहेत. तर सदस्य म्हणून सहा. 87-नांदेड दक्षिण वि.म.संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास मानेजिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रफुल कर्णेवारसायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद बाबुराव दळवीपत्र सूचना कार्यालयाचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभायेआकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारेजिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलींद व्यवहारेदै. लोकमतचे आवृत्ती संपादक राजेश निस्ताने काम करतील. तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके हे काम पाहणार आहेत.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...