Wednesday, March 13, 2024

वृत्त क्र. 236

तीन तालुक्यातील नवीन तीन महसूल महामंडळात

दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित 

नांदेड दि. 13 : - राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसूली मंडळामध्ये माहे जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि.पेक्षा कमी झाले आहे, अशा 10 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णया मध्ये नमूद नांदेड जिल्ह्यातील महसुल मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होवून नवीन महसूली मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत. तसेच त्या महसूली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही, अशा नांदेड जिल्ह्यातील नांदेड, घुंगराळा, दिग्रस बू या तीन नवीन महसूल मंडळे दुष्काळ सदृष्य मंडळे म्हणून घोषित केली आहेत. या घोषित केलेल्या महसूली मंडळासाठी सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे. 

दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेले तालुके व महसुल मंडळामध्ये नांदेड तालुक्यातील नांदेड, नायगाव खै. तालुक्यातील घुंगराळा, कंधार तालुक्यातील दिग्रस बू. या महसूल मंडळाचा समावेश आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 3 महसूल मंडळात शासनाने विविध सवलती लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्रचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतीचा समावेश असणार आहे.   

दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या महसूल मंडळातील संबंधित विभागाच्या प्रमुखांनी  गावातील खातेदारांना लागू करण्यात आलेल्या सवलती व उपाययोजना देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

0000


No comments:

Post a Comment

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...