Wednesday, March 13, 2024

 वृत्त क्र. 239 

प्रधानमंत्र्यांचा नांदेडसह देशभरातील सफाई कामगारांची संवाद

 

पीएम सुरज क्रेडिट सपोर्ट राष्ट्रीय पोर्टलचा शानदार शुभारंभ

 

नांदेड दि. 13 : केंद्रीय सामाजिक न्याय विभागामार्फत आज पासून वंचित समुदायाला उद्योग, व्यवसायासाठी ऑन लाईन कर्ज उपलब्ध करणाऱ्या महत्त्वाकांक्षी पीएम सुरज राष्ट्रीय पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नांदेड सह देशभरातील 525 जिल्ह्यातील सफाई कामगारांची यावेळी संवाद साधला.

 

नांदेड येथील नियोजन भवनांमध्ये या कार्यक्रमासाठी सफाई कामगार तसेच आयुष्यमान योजनेचे लाभार्थी यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. सामाजिक न्याय विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्जवाटप योजनेतून लाभार्थ्यांना कर्ज वाटपही करण्यात आले. बीज भांडवल योजनेतूनही लाभार्थ्यांना यावेळी धनादेश देण्यात आले.

 

नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मीनगिरे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक डी.डी. मोहिते, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

अनुसूचित जाती, जनजाती व इतर मागासवर्ग समुदायातील महिला, पुरुष उद्योग इच्छूक नागरिकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कोणत्याही बँकेत न जाता ऑनलाईन या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. यावेळी देशभरातील अनुसूचित जाती जनजाती व इतर मागासवर्गीय समुदायातील ज्या नागरिकांनी आपल्या व्यवसायाला महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत विविध योजनेचा लाभ घेऊन नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसाय उभारले त्यांच्यातील नवउद्योजकांसोबत प्रतिनिधीक चर्चा प्रधानमंत्र्यांनी केली.

 

तत्पूर्वी, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करणाऱ्या श्रीमती आरती शाम वाघमारे कापड व्यवसाय सुरू करणारे संतोष किशन शिंदे यांचा मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना धनादेश देण्यात आला. विभागामार्फत मिळणाऱ्या अन्य योजनांचे धनादेश यावेळी देण्यात आले. यासोबतच नांदेड महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या 27 सफाई कर्मचाऱ्यांना पीपी सुरक्षा किट देण्यात आल्या. दहा लोकांना आयुष्यमान कार्ड देण्यात आले. नांदेड ग्रामीण भागातील निळा व तुप्पा या गावातील नागरिकांना देखील आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला संत रोहिदास चर्मकार महामंडळ इतर मागासवर्गीय विकास महामंडळ व राज्य शासनाच्या अनुसूचित जाती जनजाती व इतर मागासवर्गीय समुदायाला लाभ देणाऱ्या मंडळांचे अधिकारी उपस्थित होते.

00000










No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...