Wednesday, March 13, 2024

 वृत्त क्र. 238 

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातर्फे

"बालरक्षा" किटचे वितरण 

नांदेड, दि. 13 :  नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नांदेडच्या वतीने आज 13 मार्च  रोजी सकाळी 10.30 वाजता नांदेड-वाघाळा शहर संचलीत वजिराबाद येथील माध्यमिक  महानगरपालिका शाळेत बाल रक्षा किटचे विनामूल्य वितरणास मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सुरूवात  करण्यात आली. आयुष मंत्रालयाच्याअंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था नवी दिल्ली यांच्याद्वारा विकसित केलेली आयुर्वेदीय औषधींची किट ही शालेय बालकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे तसेच त्यांचा विविध व्याधीच्या संक्रमणापासून बचाव करण्याकरीता अत्यंत उपयुक्त आहे. 

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नांदेडच्या या उपक्रमामुळे परिणामी नांदेड शहरातील मुलांच्या आरोग्याचा स्तर वाढेल. शालेय मुले सुदृढ व सशक्त झाल्यास शाळेतील उपस्थिती वाढेल, परिणामी नांदेड शहरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल असा आशावाद मनपा आयुक्तांनी या प्रसंगी व्यक्त केला. अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांनी या उपक्रमामागील भूमिका विशद करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांना त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. 

मनपा संचलित सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य निरोगी रहावे यासाठीच सदर आयुर्वेदीय औषधींचे बालरक्षा किटचे वितरण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाच्या वैद्यकीय चमूने सर्व शालेय विद्यार्थ्यांना बालरक्षा किट वितरित करून त्यातील चारही औषधांविषयी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे विस्तृत स्वरूपात त्याची उपयोगिता व त्याचे सेवनाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात उपायुक्त ॲड. अजितपाल सिंह संधू, मनपा शिक्षणाधिकारी राजेश पातळे, आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन सिंग, शासकीय आयुर्वेद रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. मंजुषा पाटील, शाळेचे  मुख्याध्यापक साईनाथ चिद्रावार, डॉ. प्रसाद देशपांडे आणि डॉ. देवकुमार राऊत  आणि वैद्यकीय चमूतील सर्व सदस्य  उपस्थित होते.

000000







No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...