Tuesday, August 14, 2018


धर्मादाय आयुक्त यांच्या हस्ते
पदाधिकारी, देणगीदारांचा सत्कार
नांदेड, दि. 14 :- धर्मादाय सामुहिक विवाह सोहळा समितीच्यावतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, दुर्बल घटक, शेतकरी व मजूर यांच्या पाल्यांचा सामुहिक विवाह सोहळा 12 मे रोजी नांदेड येथे पार पाडला. या विवाह सोहळा समितीचे पदाधिकारी व देणगीदार विश्वस्तांच्या चांगल्या कामामुळे हा विवाह सोहळा उत्कृष्ट पद्धतीने पार पडला. त्यामुळे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या हस्ते समितीचे पदाधिकारी व देणगीदार यांचा सत्कार येथील शासकीय विश्रामगृहात पार पडला. यावेळी धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
00000



नानाजी कृषी देशमुख संजीवनी प्रकल्पात
जिल्ह्यातील 384 गावांची निवड
नांदेड, दि. 14 :- नानाजी कृषी देशमुख संजीवनी प्रकल्पातर्गत नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यात 384 गावांची निवड करण्यात आली असून प्रथम टप्यात अर्धापूर, किनवट, मुदखेड, देगलूर, कंधार, भोकर, उमरी, नायगाव या 8 तालुक्यातील 70 गावांची निवड करण्यात आली आहे.
प्रथम टप्यात 64 ग्रामपंचायतींचा समावेश असून 56 गावात  44  ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात येऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या योजनेतर्गत प्रत्येक गावात सोयाबेन + तूर आणि कापूस + उडीत / मूग हे प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात येऊन प्रात्याक्षिकांस लागणारे बियाणे, MAUS -१५८, BDN - ७१६, NH - ६१५ या वानाचे वितरण करण्यात आले आहे. या 70 गावांमध्ये एकूण 140  शेतीशाळचे आयोजन करण्यात येऊन, शेतीशाळमार्फत पेरणी पूर्व पेरणी पश्चात शेतीशाळा घेण्यात आल्या आहेत. या योजनेतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी यांचे बळकटीकरण सक्षमीकरण करण्याचा उद्देश आहे.
निवड करण्यात आलेल्या 70 गावांची सुक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून हवामान अनुकूल शेती पद्धती अवलंब करून सर्व समावेशक बाबी अंतर्भूत करण्यात येणार आहे. त्या अनुषगांने मुदखेड तालुक्यातील ( इजळी / चिकाळा / रोहिपिंपळ्गाव / वाडी मुक्तायची / वाडी मुक्तापूर ) या 5 गावांची सुक्ष्म नियोजन प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000


पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा
नांदेड, दि. 14 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 17 ऑगस्ट 2018 रोजी हिंगोली येथून शासकीय वाहनाने सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार 18 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून गुरुद्वाराकडे प्रयाण. सकाळी 11 वा. गुरुद्वारा येथे दर्शनास उपस्थिती. दुपारी 1 वा. राष्ट्रीय समाज पक्ष आढावा बैठक. स्थळ- राष्ट्रीय समाज पक्ष व्यापारी आघाडी कार्यालय बाफना रोड खालसा हायस्कूल समोर नांदेड. दुपारी 4 वा. बाफना रोड नांदेड येथून शासकीय वाहनाने जालनाकडे प्रयाण करतील.
00000


जिल्ह्यात राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही सर्वेक्षण सुरु
नांदेड, दि. 14 :- राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही तयार करण्याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून यामध्ये आस्थापनाचालक, परवानाधारकांकडून त्यांचा पॅन क्रमांक, टॅन क्रमांक, आस्थापना क्रमांक, कर्मचारी संख्या याबाबतची माहिती  सर्वेक्षण करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना देण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी चं. प. कोंडेकर यांनी केले आहे.  
या सर्वेक्षणात कंपनी ॲक्ट 1956, फॅक्ट्री ॲक्ट 1948, शॉप ॲन्ड कमर्शीयल इस्टॅब्लीशमेंट ॲक्ट 1948, सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1960, को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960, खादी ॲड व्हीलेज इंडस्ट्रीज बोर्ड, डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीज (डीआयसी) या सात कायदयांतर्गत 31 मार्च 2015 पूर्वी नोंदणी झालेल्या आस्थापनांची माहिती संकलीत केली जाणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
00000


नांदेड शिख गुरूव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुक 2018
दि. 15 17 ऑगस्ट रोजीच्या शासकीय सुट्टीच्या दिवशीदेखील
मतदार नोंदणी कक्ष चालु राहणार
नांदेड, दि. 14 :- नांदेड शिख गुरूव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणूकीसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 18 ऑगस्ट रोजी मतदार नोंदणीची अंतिम तारीख असून, जास्तीतजास्त मतदार नोंदणी होणेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून दि. 15 ऑगस्ट व 17 ऑगस्ट 2018 रोजीच्या शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील नांदेड शिख गुरूव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुक 2018 साठीचे मतदार नोंदणी कक्ष सुरू ठेवण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
या निवडणूकीसाठी मतदार क्षेत्र नांदेड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, लातूर हे संपूर्ण जिल्हे व चंद्रपूर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपना व जीवती हे तालुके (तत्‍कालीन हैद्राबाद निजाम संस्‍थानाचा मराठवाड्यातील भाग) असून, मतदार नोंदणी कक्ष सुरु ठेवणेबाबत जिल्‍हाधिकारी औरंगाबाद जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, बीड, लातूर, चंद्रपुर यांचेमार्फत सर्व तहसिलदार यांना तसेच नांदेड जिल्‍ह्यातील सर्व तहसिलदार यांना सुचना देण्‍यात आल्‍या आहेत.  
या मतदार नोंदणी कक्षात अतिरिक्त कर्मचारी वर्गाची नेमणूक करून मतदार नोंदणी जास्तीतजास्त करण्याबाबत आवश्यक सर्व उपाययोजना करणे तसेच मतदार नोंदणीसाठी आलेल्या नागरिेकांना फॉर्म – 1 वाटप करणे, फॉर्म – 1 दाखल करून त्याची पोच देणे, विधानसभा मतदार यादीतील यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक शोधण्यासाठी व अनुषंगीक बाबींसाठी वाजवी सहकार्य करण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व शिख धर्मिय नागरिकांनी मतदार यादीमध्ये जास्तितजास्त नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.



जिल्हयातील नोंदणीकृत संस्थानी
समाजाच्या उन्न्‍तीसाठी कार्य करावे.
                                                                           -  धर्मदाय उपायुक्त श्रीनीवार
        
नांदेड दि. 14 :- संस्था या समाजहितासाठी असतात, समाजाच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम हाती घेऊन संस्थेने आपली सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन धर्मदाय उपायुक्त सौ.प्रणिता श्रीनीवार यांनी प्रतिपादन केले. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पदमश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 126 व्या जयंती निमीत्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने आयोजित ग्रंथप्रदर्शन व एकदिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
बदल अर्ज, हिशोब पत्रके, वेळोवेळी संस्थेत होणारे बदल धर्मदाय कार्यालयास सादर करणे सर्व संस्थेस बंधनकारक आहे असे मत यावेळी व्यक्त केले. या कार्यशाळेत संस्थेने निवडणूक प्रक्रिया कशी राबवावी, हिशोब पत्रके कसे दयावेत, संस्थेच्या घटनेचे महत्व,बॉम्बे पब्लीक ट्रस्ट ॲक्ट मधील तरतुदी इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत केले.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड. गंगाधर पटने म्हणाले सध्या सार्वजनिक ग्रंथालय हे अनेक समस्यांना तोंड देत आहे. धर्मदाय कार्यालयातील कामाची पध्दत, त्यांचे नियम याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती सार्वजनिक ग्रंथालयांच्या पदाधिका-यांना नाही. त्यामुळे ही कार्यशाळा खुप उपयुक्त ठरणार असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त केले.
        कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन व डॉ. रंगनाथन यांच्या प्रतीमेच्या पुजणाने झाली. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले. कार्यशाळेची रुपरेषा व कार्यशाळा आयोजित करण्याबाबचा हेतू यावेळी विषद केला. तर प्रमुख अतिथी म्हणून विदयापीठ ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकणी, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. श्यामल पत्की, ग्रंथालय संघाचे सचिव राजेंद्र हंबीरे हे याप्रसंगी उपस्थीत होते.
        डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमीत्त आयोजित या कार्यशाळेस प्रमुख अतिथी डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या कार्याची माहिती यावेळी दिली.
या कार्यशाळेत डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या 126 व्या जयंती निमीत्त ग्रंथपालांना चांगले काम करतांना अधिक प्रोत्साहन मिळावे याकरीता प्रातिनिधीक स्वरुपात 5 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या ग्रंथपालांचा कार्यगौरव करण्यात आला. त्यामध्ये संजय पोतदार (तुप्पा), सुभाष पाटील (बिलोली),‍ शिवाजी सुर्यवंशी (भोकर), पुंडलीक कदम (देगलूर), शिल्पा कौलासकर (नांदेड) तसेच नांदेडचे निर्मल प्रकशनाचे निर्मलकुमार सुर्यवंशी यांना नुकताच मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचा रा.ज.देशमुख पुरस्कार मिळाला त्यानिमीत त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रताप सुर्यवंशी यांनी केले तर आभार शिवाजी पवार यांनी मानले. कार्यक्रमास नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरती कोकुलवार, को.मा.गाडेवाड, संजय पाटील,गजानन कळके,संजय सुरनर, दत्ता शिरामवाड,नामदेव कदम,मारोती अदीने श्रम घेतले.
00000000


श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
ते महात्मा गांधी पुतळा परिसरात बंदी आदेश
नांदेड, दि. 14 :- नांदेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मंगळवार 14 ऑगस्ट रोजी सायं. 6 वाजेपासून ते बुधवार 15 ऑगस्ट 2018 रोजी मध्यरात्री पर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
बुधवार 15 ऑगस्ट 2018 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात होणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरात मुख्य रस्त्यावर मंगळवार 14 ऑगस्ट रोजी सायं 6 वाजेपासून बुधवार 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पर्यंत उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली इत्यादी आंदोलन करण्यात येऊ नयेत. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी लागू केला आहे.
000000


पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते
"युवा माहिती दूत" उपक्रमाचा आज शुभारंभ
             नांदेड, दि. 14 :- शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच युनिसेफच्या सहकार्याने "युवा माहिती दूत" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या "युवा माहिती दूत" उपक्रमाचा नांदेड जिल्ह्यातील शुभारंभ पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते बुधवार 15 ऑगस्ट 2018 रोजी ध्वजारोहणानंतर सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी नांदेड  यांचे निजी बैठक कक्षात होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील वरीष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी केले आहे. 
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...