खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेतील
विजेत्यांचा सत्कार समारंभ
नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना, आणि आरसीएफ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2021 मध्ये शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम बीजप्रक्रिया स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील सहभागी विजेत्या शेतकरी स्पर्धकांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे व आत्मा यंत्रणेच्या उपसंचालक माधुरी सोनवणे यांच्या हस्ते सन्मानपत्र, ट्रॉफी, कृषी विभागातील योजनांची माहिती पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या
प्रमाणात सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन
तंत्रशुद्ध पद्धतीने बीजप्रक्रिया करतानाचे व्हिडिओ तयार करून अपलोड करावयाचे होते.
ज्या स्पर्धकांच्या व्हिडिओला जास्तीतजास्त लाईक मिळतील त्यांच्यामधून प्रथम तीन
विजेत्या स्पर्धकाच्या नावाची
घोषणा करण्यात आली. त्यात नांदेड जिल्ह्यासाठी प्रथम क्रमांक हिमायतनगर
येथील श्याम सुंदर गणपत ढगे, द्वितीय क्रमांक मुदखेड तालुक्यातील विश्वनाथ संभाजी पवार
निवघेकर, तृतीय क्रमांक नायगाव तालुक्यातील मांजरम येथील
संदीप विश्वंभर गायकवाड यांना मिळाला.
स्पर्धेसाठी आरसीएफ कंपनीकडून स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बायोला या जैविक संघाचा पुरवठा करण्यात आला. कार्यक्रमात रविशंकर चलवदे यांनी बीज प्रक्रियेचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करून सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक संघटना व आरसीएफ कंपनीकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढून पुढील हंगामात शेतकऱ्यांनी शंभर टक्के क्षेत्रावरील पेरणीसाठी बीज प्रक्रियाचा वापर करावा, असे आवाहन केले.
सत्कार समारंभ कार्यक्रमास आरसीएफ कंपनी नांदेड
जिल्हा समन्वयक केदार काचावार, सहाय्यक कृषी अधिकारी परिवाराचे जिल्हा समन्वयक शरद निळकंठवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र
अधिकारी वैभव लिंगे, जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळेचे तंत्र
अधिकारी संदीप स्वामी, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे
राज्य सरचिटणीस वसंत जारीकोटे, नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर
पवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राम कपाटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य दिलीप काकडे, कृषी सहाय्यक
शिवकुमार देशमुख, कदम, केकान, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शेतकरी व कार्यालयीन
कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0000