Tuesday, March 18, 2025

 वृत्त क्रमांक 306

मेघना कावली नांदेडच्या नव्या सीईओ

मिनल करनवाल यांची जळगावला बदली

नांदेड दि. 18 मार्च : किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. त्या मिनल करनवाल यांची जागा घेणार आहेत. मिनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.

नांदेड जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असणाऱ्या मिनल करनवाल आता जळगाव येथे मुख्य कार्यकारी पदी रुजू होणार आहेत. गेल्या अडीच वर्षात मिनल करनवाल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि महिलांच्या सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी विविध योजना राबविल्या आहेत. बालिका पंचायत हा त्यांचा अभिनव प्रयोग राष्ट्रीय स्तरावर गाजला. त्यांच्या या प्रयोगातून अनेक गावांमध्ये प्रशासकीय व पायाभूत सुविधांना गती मिळाली तसेच किशोर मुलींना पंचायत राज व्यवस्थेचे प्रशिक्षण मिळाले. नुकतीच त्यांनी बालिका पंचायत 2.0 नव्या टप्प्याची सुरुवात केली होती.

नव्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी किनवट येथे परिविक्षाधीन कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर एक वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत होत्या. त्यांनी किनवट सारख्या आदिवासीबहुल भागामध्ये शैक्षणिक सुधारणांवर विशेष भर दिला. आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सुधारणांसाठी विविध योजनांचा अंमल त्यांनी केला आहे.

0000







 






 

 वृत्त क्रमांक 305

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा - आयुक्त दिलीप शिंदे

लोकसेवा हक्क कायद्याचे नोटीस बोर्ड कार्यालयात लावावे 

                                                                                                                                                                      नांदेड ( माहूर ) दि. 18 मार्च :- शासकीय पातळीवरच्या सेवा नागरिकांना वेळेत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्या तयार करण्यात आला आहे. नागरिकांना त्यांच्या सेवा वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. या सेवा नागरिकांना वेळेत देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्र आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिले.  

                                                                                                                                                                        आज माहूर येथे भेट देवून  शासकीय विश्रामगृह माहूर येथे त्यांनी आढावा बैठक घेतली.  यावेळी ते बोलत होते. यावेळी माहूरचे तहसीलदार राजकुमार राठोड, किनवट तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर, माहूर/ किनवटचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, मुख्याधिकारी माहूर विवेक कांदे, मुख्याधिकारी किनवट अजय कुरवाडे, माहूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे आदींची उपस्थिती होते. 

                                                                                                                                                                        सर्व कार्यालयामध्ये लोकसेवा हक्क अधिनियमाचे नोटीस बोर्ड असणे आवश्यक असून ते लावण्याच्या सूचना आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिल्या. लोकसेवा हक्क अधिनियमाची नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक विभाग प्रमुखांनी दर महिन्याला आढावा बैठक घ्यावी. कर्मचाऱ्यांसाठी आरटीएसचे प्रशिक्षण ठेवावे. कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांवरती आरटीएसचा लोगो असणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कार्यालयानी ऑनलाईन सेवा देण्यावर भर देवून ऑफलाईन सेवा देणे बंद कराव्यात, अशा सूचना त्यांनी कार्यालय प्रमुखांना दिल्या. तसेच त्यांनी यावेळी क्षेत्रीय अडचणीही जाणून घेतल्या. 

0000






विशेष लेख               

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना महत्वाची 

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेचे महत्व पाहता ही योजना राज्य शासनाकडून जोमाने राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातही ही महत्वांकाक्षी योजना राबविण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  पुढाकार घेवून जिल्ह्यातील अनेक तलाव, नदी, नाले यातील गाळ काढण्याचे काम पुढाकार घेवून मागील वर्षी  केले. तेच कार्य आताचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही पुढे सुरु ठेवलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची कामे येत्या दोन महिन्यात विविध ठिकाणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी 13 प्रकल्पामधून एकूण 1 लाख 41 हजार 846 घमी गाळ काढण्यात आलेला आहे. तर यावर्षी 53 प्रकल्पातून 5 लक्ष 80 हजार 721 घ.मी गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.  

हे काम नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स, भारतीय जैन संघटना तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. प्रकल्पातून काढण्यात आलेला गाळ अनुदान पात्र शेतकऱ्यांना शेतात पसरविण्यासाठी देण्यात येतो. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या जमीनीची सुपिकता वाढते. यामुळे शेतकऱ्यांच्या कृषि उत्पनात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते कालच मुखेड तालुक्यातील हिब्बट ते आळंदीपर्यत एकूण 9 कि.मी. नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. नाल्यातील गाळ काढल्यामुळे नाल्याची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. या पाण्याचा शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग होणार असून याकामासोबत नाल्याच्या दुतर्फा बांबूची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे हा भाग हरित होवून जनावराना सावलीही मिळणार आहे. यासोबत शेतकऱ्यांना बांबू वृक्षापासून विविध फायदे होणार असून या सर्व बाबीमुळे एकदंरीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. 

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थाना यंत्रसामग्री आणि इंधन यांचा खर्च देणे प्रस्तावित आहे. तसेच अल्प व अत्यल्पभुधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपुर लाभ घेता येईल यासाठी अनुदान देणे प्रस्तावित आहे. अशासकीय संस्थाना गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री आणि इंधन यासाठी 31 रुपये प्रती घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी 35.75 प्रती घनमीटर प्रमाणे 15 हजारच्या मर्यादा व 2.5 एकर साठी 37 हजार 500 रुपयापर्यत अनुदान दिले जाणार आहे. 

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना हा राज्यातील महत्वकांक्षी प्रकल्प असून यामध्ये धरणे व तलाव गाळमुक्त करुन तो गाळ शेत जमिनीमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे जलसाठ्यामध्ये वाढ होते आणि जमिनीची सुपिकताही वाढते. गेल्या दोन वर्षात राज्यात दीड हजारपेक्षा जास्त जलस्त्रोतातून सुमारे साडे चार कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून सुमारे चाळीस हजार शेतकऱ्यांनी हा गाळ शेतीमध्ये टाकला आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सुमारे 9 कोटी घनमीटर गाळ उपसण्याची क्षमता असून 1.8 लाखांहून अधिक शेतकरी गाळ वाहून नेणार आहेत. हे काम सध्या वेगाने सुरू आहे. 

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये सामाजिक संस्था काम करण्यासाठी उत्सुक आहेत. ए.टी.ई. चंद्रा फौंडेशन सक्रीय सहभागी होणार असल्यामुळे राज्यातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यासोबतच जमिनीची सुपिकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्येही चांगली वाढ होण्यात मदत होणार आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मृद व जलसंधारण विभाग फौंडेशन सहकार्य करणार आहे.

अलका पाटील, उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

00000






 

 विशेष वृत्त  क्रमांक 304 आज प्रसिद्धी आवश्यक 

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीची १९ व २० मार्चला विशेष मोहीम! 

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी आवश्यक 

नांदेड, दि. १८ मार्च – केंद्र व राज्य शासनाच्या ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जवळपास ५६ टक्के नोंदणी झाली आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने १९ आणि २० मार्च २०२५ रोजी विशेष नोंदणी मोहीम आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, आपल्या गावातील नोंदणी केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

जिल्‍हयातील सर्व शेतक-यांची अॅग्रीस्‍टॅक योजनेंतर्गत ३0 मार्च पर्यंत नोंदणी पुर्ण करावयाची आहे. सर्व शेतक-यांपेेकी पीएम किसान लाभार्थ्‍यांच्‍या नोंदणीसाठी दोन दिवशीय विशेष मोहिम आयोजित करण्‍यात आली आहे. पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता ज्यांनी ऍग्री स्टिक नोंदणी केली आहे त्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे ही नोंदणी गांभीर्याने घ्यावे गावातील सेतू केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ॲग्रीस्टॅक म्हणजे काय ? 

‘ॲग्रीस्टॅक’ ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण करणारी योजना आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला युनिक ओळख क्रमांक  दिला जातो, ज्याद्वारे विविध सरकारी योजना आणि अनुदानांचा थेट लाभ मिळतो.

योजनेचे प्रमुख फायदे

थेट लाभ हस्तांतरण (DBT) – पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत, पीएम किसान निधी यांसारख्या अनुदानांचा थेट लाभ.

पीककर्ज आणि विमा प्रक्रिया सुलभ – कर्ज व विमा मंजुरीसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही.

शेतीसाठी अनुदान व सुविधा – खत, बियाणे, सिंचन योजना, हवामान अंदाज यांसाठी मदत. आपत्ती मदत जलदगतीने – दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टीसारख्या संकटांत मदतीचा त्वरित लाभ.

नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे 

शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सेतू केंद्रात (कॉमन सर्व्हिस सेंटर) जाऊन नोंदणी करावी.

 आवश्यक कागदपत्रे: 

 आधार कार्ड

 आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक

 सातबारा उतारा (७/१२)

ही नोंदणी पूर्णतः मोफत आहे, त्यामुळे कोणीही मध्यस्थ किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये.

 ई-केवायसी व इतर योजनांचा लाभ 

 रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी त्वरित पूर्ण करावी, अन्यथा शासकीय धान्याचा लाभ बंद होऊ शकतो.

‘आयुष्यमान भारत कार्ड’ साठीही आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येईल.

 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना ! 

१९ व २० मार्च ही शेवटची संधी असू शकते.पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी तर आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे कारण पुढचा पीएम किसान चा हप्ता हा ऍग्री स्टॅक नोंदणी केलेल्यांनाच मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याकडे लक्ष वेधावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अद्याप नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो कॅप्शन : भोकर तालुक्यातील मौजे नांदा पट्टी म्हैसा येथे नेटवर्क नसल्यामुळे छतावर जाऊन ॲग्रीस्टॅगचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तंत्रज्ञानाशी कार्यतत्पर्तने लढणाऱ्या या टीमचे कौतुक केले आहे.

00000




 वृत्त क्रमांक 303

नांदेडमध्ये सांस्कृतिक विभागाच्या तीन दिवसीय लोककलांचा महोत्सव 

 असंघटीत लोककलांचा महोत्सव सुरू 

नांदेड दि. १७ मार्च : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित "असंघटित लोककलांचा महोत्सव" १७ मार्चपासून सुरू झाला आहे. शहरातील कुसुम सभागृहात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केला .१९ मार्चपर्यंत संध्याकाळी ६ ते १० वाजेपर्यंत रंगणार आहे. कला संस्कृती यामध्ये रस असणाऱ्या श्रोत्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

या महोत्सवात गोंधळ, बहुरूपी, लावणी, गोंधळी गीते, आदिवासी नृत्य, पोवाडे, वाघ्या-मुरळी, दशावतार आदी विविध लोककला सादर केल्या जाणार आहेत. प्रवेश विनामूल्य असल्याने रसिकांना हा सांस्कृतिक सोहळा मोफत अनुभवता येणार आहे.

 या उपक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले असून, श्रीकृष्ण कला फाउंडेशन महोत्सव समन्वयक आहे. 17 मार्चला पहिल्या दिवशी विविध लोककलांनी या कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या लोककलांचे सादरीकरण आणि त्याबाबतची माहिती देखील यावेळी सादर केली जाते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पिंगळा जोशी या लोककलेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पिंगळा जोशी, हेळवी, बहुरूपी, धनगर ओवी, कडकलक्ष्मी, करपलवी गोंधळी आदी लोककलेचे सादरीकरण झाले.पिंगळा या लोककलेबाबत प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज कौर यांनी माहिती दिली. दररोज सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल नांदेडकर कलारसीकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उदया १८ मार्च: आदिवासी गोंधळ गीत, आदिवासी गोंधळ नृत्य, आदिवासी पाटा गायन, मथुरा लभान नृत्य सादर केले जाणार आहे.

हा महोत्सव पारंपरिक लोककला आणि कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी रसिकांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमाला समन्वयक कृष्णात कदम हे उपस्थित होते तर व्यासपीठावर डॉक्टर संजय पुरी उमेश जोगी श्यामजी मडगे भास्कर डोईबळे यांचे सत्कार करण्यात आले. उद्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.

000000









  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक  समता  सप्ताहाचे आयोजन   ना...