Tuesday, March 18, 2025

 विशेष वृत्त  क्रमांक 304 आज प्रसिद्धी आवश्यक 

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीची १९ व २० मार्चला विशेष मोहीम! 

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी आवश्यक 

नांदेड, दि. १८ मार्च – केंद्र व राज्य शासनाच्या ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जवळपास ५६ टक्के नोंदणी झाली आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने १९ आणि २० मार्च २०२५ रोजी विशेष नोंदणी मोहीम आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, आपल्या गावातील नोंदणी केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

जिल्‍हयातील सर्व शेतक-यांची अॅग्रीस्‍टॅक योजनेंतर्गत ३0 मार्च पर्यंत नोंदणी पुर्ण करावयाची आहे. सर्व शेतक-यांपेेकी पीएम किसान लाभार्थ्‍यांच्‍या नोंदणीसाठी दोन दिवशीय विशेष मोहिम आयोजित करण्‍यात आली आहे. पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता ज्यांनी ऍग्री स्टिक नोंदणी केली आहे त्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे ही नोंदणी गांभीर्याने घ्यावे गावातील सेतू केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ॲग्रीस्टॅक म्हणजे काय ? 

‘ॲग्रीस्टॅक’ ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण करणारी योजना आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला युनिक ओळख क्रमांक  दिला जातो, ज्याद्वारे विविध सरकारी योजना आणि अनुदानांचा थेट लाभ मिळतो.

योजनेचे प्रमुख फायदे

थेट लाभ हस्तांतरण (DBT) – पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत, पीएम किसान निधी यांसारख्या अनुदानांचा थेट लाभ.

पीककर्ज आणि विमा प्रक्रिया सुलभ – कर्ज व विमा मंजुरीसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही.

शेतीसाठी अनुदान व सुविधा – खत, बियाणे, सिंचन योजना, हवामान अंदाज यांसाठी मदत. आपत्ती मदत जलदगतीने – दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टीसारख्या संकटांत मदतीचा त्वरित लाभ.

नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे 

शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सेतू केंद्रात (कॉमन सर्व्हिस सेंटर) जाऊन नोंदणी करावी.

 आवश्यक कागदपत्रे: 

 आधार कार्ड

 आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक

 सातबारा उतारा (७/१२)

ही नोंदणी पूर्णतः मोफत आहे, त्यामुळे कोणीही मध्यस्थ किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये.

 ई-केवायसी व इतर योजनांचा लाभ 

 रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी त्वरित पूर्ण करावी, अन्यथा शासकीय धान्याचा लाभ बंद होऊ शकतो.

‘आयुष्यमान भारत कार्ड’ साठीही आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येईल.

 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना ! 

१९ व २० मार्च ही शेवटची संधी असू शकते.पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी तर आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे कारण पुढचा पीएम किसान चा हप्ता हा ऍग्री स्टॅक नोंदणी केलेल्यांनाच मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याकडे लक्ष वेधावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अद्याप नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो कॅप्शन : भोकर तालुक्यातील मौजे नांदा पट्टी म्हैसा येथे नेटवर्क नसल्यामुळे छतावर जाऊन ॲग्रीस्टॅगचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तंत्रज्ञानाशी कार्यतत्पर्तने लढणाऱ्या या टीमचे कौतुक केले आहे.

00000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक  798 उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  शासकीय वसतिगृह योजना सुरू   नांदेड दि. 1 ऑगस्ट :- इतर मागास बहुजन कल्याण विभ...