लेख -
मराठवाड्याच्या विकासाला ‘मेन’ मार्गदर्शक
|
|
मराठवाड्यात पहिल्यांदाच
संपादकांची परिषद हा स्तुत्य प्रयोग औरंगाबाद येथे झाला. दिवसभर विचारांची
देवाण-घेवाण होऊन मराठवाड्यातील संपादकांची साखळी (मराठवाडा एडिटर्स नेटवर्क)
निर्माण व्हावी, अशी संकल्पना यातून समोर आली. समाजाला दिशा देण्याचे
कार्य करणाऱ्या संपादकांनी या विचारमंथनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या
परिषदेवरचा हा वृत्तांत…
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, युनिसेफ आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या
विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे दि.20 रोजी विद्यापीठात
आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. बी.ए.चोपडे, जनसंवाद व
वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. सुधीर गव्हाणे, माहिती व जनसंपर्क मराठवाडा विभागाचे प्र. संचालक यशवंत भंडारे, आरोग्य विभागाचे उपसंचालक विजय कंदेवाड, युनिसेफच्या
स्वाती मोहोपात्रा, राजेश्वरी चंद्रशेखर, भूयान खनेंद्र, अल्पा व्होरा, विकास
सावंत यांनी या परिषदेत बालक, स्त्रियांचे प्रश्न आणि विकास
याबाबतीत संपादकांसमोर विचार मांडले. माध्यमांची कामगिरी, त्यांच्याकडून
अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. संपादकांनीही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून
समस्या सोडवणुकीसाठीचे उपाय सूचवून मराठवाडा एडिटर्स नेटवर्क (मेन) या संकल्पनेचे
स्वागत केले.
डॉ. गव्हाणे यांनी ग्रामीण पत्रकारिता अडचणीची असतानाही ग्रामीण
भागात मोलाचे कार्य होते आहे. संयुक्त राष्ट्र संघ ग्रामीण भागातील प्रश्नांच्या
सोडवणुकीसाठी मागील 25 वर्षांपासून शाश्वत विकासावर काम करत
आहे. त्यात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने विद्यापीठाच्या जनसंवाद व
वृत्तपत्रविद्या विभागात 15 वर्षांपासून शाश्वत विकास हा
विषय पत्रकारितेतील विद्यार्थ्यांना शिकविला जातो. त्यातून विद्यार्थ्यांना
ग्रामीण व मागास भागातील समाजाचे प्रश्न सोडवणुकीसाठी ज्ञान मिळते, त्यांचा त्यावर अभ्यास होतो, असे सांगितले.
माणसाला माणुसकीच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबी मिळाव्यात,
त्यांच्यापर्यंत त्या पोहोचाव्यात, त्यांना
त्याबाबत अवगत करावे, ज्ञानी बनवावे, त्यांचा
विकास साधावा आदी जनजागृतीचे कार्य संपादकच करू शकतात. या उद्देशाने मराठवाड्यातील
संपादकांनी एकत्रित येऊन बालकांचे, स्त्रियांचे प्रश्न
सोडवणुकीसाठी ‘मेन’मध्ये सहभागी होऊन
मराठवाड्याच्या विकासाला चालना द्यावी, अशी संकल्पना मांडून
श्री. गव्हाणे यांनी संपादकांकडून अपेक्षा व्यक्त केली.
श्रीमती चंद्रशेख्रर यांनी युनिसेफच्या 70 वर्षांचा
इतिहास संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून मांडला. यामध्ये युनिसेफने बालकांसाठी,
महिलांसाठी व शिक्षणासाठी उचलेले पावले दाखवून उपस्थितांना
युनिसेफबाबत माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने युनिसेफची स्थापना 1946 मध्ये संयुक्त राष्ट्र संघातर्फे झाली येथून 2015 च्या
भारतातील नवजात बालकांच्या कृती आराखड्यापर्यंत टप्पे विषद केले. युनिसेफने
ठरविलेल्या उद्दिष्टांपेक्षाही अधिक वेगाने महाराष्ट्र शासनाने बालकांचा मृत्यूदर
घटविण्यात, हगणदारीमुक्त राज्य करण्याची कामगिरी पार पाडली
आहे. उद्दिष्टांपेक्षा आधीच त्यांनी उद्दिष्ट पार केले आहे, हे
कौतुकाचे आहेच, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. चोपडे यांनी तर या परिषदेच्या आयोजनाचे कौतुक करून
डॉ.बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचे व्रत प्रत्येकाने घ्यावे हे याठिकाणी
विशेषरित्या नमूद केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री-पुरूष समानता आली. समतेचे
निर्मिती केली. वंचिताना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यांना विकासाच्या प्रवाहात
आणले. त्यांच्या या कार्याचा आदर्श घेऊन समाजातील बालकांचे आरोग्य, शिक्षण, भूकबळी, बालमजुरी,
हुंडा पद्धती, स्त्रियांचे आरोग्य यावर
सविस्तररित्या मार्गदर्शन केले. माध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत.
सकारात्मकपणे ते वार्तांकन करतातच परंतु त्यांनी या विषयांवरही भर देणे आवश्यक
असल्याचे सांगितले. 70 टक्के समाज हा ग्रामीण भारतात राहतो.
म्हणून ग्रामीण भागातील प्रश्नांवर तेथील विकासामध्ये ग्रामीण पत्रकारिता मोलाची
भर घालत असते. 80 ते 90 टक्के डायरिया,
टायफाइड, कॉलरा आदींसारखे आजार पाण्यामुळे
उद्भवतात त्यात जगात भारत क्रमांक एकवर आहे.त्यामुळे पाण्याबाबतीत जनजागृती
माध्यमांनी करणे आवश्यक आहे. ते करतातच, परंतु अधिक प्रभावी
व सातत्याने यावर लोकांना शिक्षित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य उपसंचालक विजय कंदेवाड यांनी मातामृत्यू रोखण्यासाठी
करावयाच्या उपाययोजना, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित
मातृत्व अभियान, प्रसूती दरम्यान मातामृत्यू टाळण्यासाठी
उपायोजना, नवजात सुविधा केंद्र, लेबर
रूम अद्यावतीकरण, जिल्हास्तरावरील नवजात बालक दक्षता केंद्र,
आशा कार्यकर्तींचे कामकाज, रूग्णवाहिका,
प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी याविषयावर माहिती दिली. तर नवजात
बालकांचे आरोग्य याविषयावर युनिसेफचे खनेंद्र भूयान यांनी बाल आणि बालकांचे
मृत्यूदर कमी करण्यासाठी घ्यावयाची काळजी, माध्यमांची भूमिका
या विषयावर मार्गदर्शन केले.
स्थलांतरित कुटुंबियांच्या पाल्यात शिक्षणाची निर्माण केलेली गोडी
बालमित्र नवनाथ वाव्हळे, समाधान यांनी याठिकाणी प्रत्यक्षात
दाखविली. बालसंरक्षणावर कार्य करणाऱ्या अल्पा व्होरा, विकास
सावंत यांनी याबाबत स्थलांतरीत कुटुंबियांचे प्रश्न आणि त्यावर करण्यात आलेल्या
उपायांबाबत सांगितले. तर प्रत्यक्षात स्थलांतरीत असलेल्या जालना जिल्ह्यातील परतूर
तालुक्यातील पिंपळी धामणगावच्या मनीषा प्रधान आणि भोकरदन तालुक्यातील तडेगावचा
कृष्णा साळवे या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी स्थलांतरीत न होता शिक्षण
घेत असल्याचे यावेळी सांगितले. दोन चिमुकल्यांचे अनुभव कथन ऐकताना अंगावर काटा येत
होता. परंतु स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल आणि
आत्मविश्वास जाणवत होता, हेही तितकेच महत्त्वाचे. यावेळी
मनीषाचे आई-वडील उसतोडीला पंढरपूरला गेल्याचे तिने सांगितले. परंतु बालमित्राने
तिला गावातून जाऊ न दिल्याने ती आता गावातच शिक्षण घेत आहे. मात्र तिच्यासारखे 40
पाल्य हे उसतोडीला गेल्याची खंतही तिच्या व बालमित्राच्या मनात
जाणवत होती.
तडेगावचा कृष्णा म्हणतो, माझे आई-वडील उसतोड
कामगार आहे. आता वडिलांचा पाय मोडल्याने भाऊही त्यांच्या सोबतीला गेला आहे. परंतु
बालमित्रांनी थांबविल्यामुळे मी आणि माझी बहीण गावात थांबलो आहोत. येथील बालमित्र
नवनाथ वाव्हळे म्हणतो, मीही उसतोड मजुराचा मुलगा. आम्हाला
शिक्षणाचे महत्त्व कळले, पण ते प्रत्येकाला कळावे, यासाठी आम्ही शाळेलाच विकासाचा केंद्रबिंदू मानला. गावातून आम्ही
प्रभातफेरी काढली. जनजागृती केली. शिक्षणाचे महत्त्व सांगितले. स्वराज प्रतिष्ठान
या संस्थेनेही मदत केली, मार्गदर्शन केले. यामुळे आज
तालुक्यातील 121 गावांपैकी 119 गावांमध्ये
हंगामी स्थलांतरित होणारी कुटुंबांची पाल्य गावातच थांबली आहेत, ते शिक्षण घेत आहेत. शासनामार्फत विद्यार्थ्यांना योग्य तो नियमानुसार
मोबदल्यासही ते पात्र झाले आहेत, असेही यावेळी युनिसेफच्या
अल्पा व्होरा यांनी सांगितले.
संपादकांच्या या परिषदेत श्री.भंडारे यांनी अध्यक्षीय समारोपात
विकास संवादात संपादकांची भूमिका व महासंचालनालयाच्या कार्य शैलीबाबत सविस्तर
माहिती दिली. शासनासाठी सर्वच माध्यमे समान असून महासंचालनालयाकडून दर्जेदार मजकूर
योग्य वेळेत पोहोचविला जातो. त्यात नवमाध्यमांचाही वापर मोठ्या प्रमाणात केला
जातो. माध्यमेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य पद्धतीने ते प्रसिद्ध करून
विकासाला चालना देतातच. जनतेपर्यंत ते पोहोचवतातच. मात्र आता या परिषदेत मेन या
नवकल्पनेच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाला अधिक चालना देण्यासाठी सर्वांनी
पुढे येणे तितकेच आवश्यक असल्याचे सांगितले. या माध्यमातून मराठवाड्याला नवी दिशा
प्राप्त होईल. विकास संवादात मार्गदर्शन आणि सूचना या दोन्ही महत्त्वाच्या असतात,
त्यामुळे हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा राहणार आहे. नवलेखकांसाठीही
यातून विचार मंथन उपलब्ध होईल. विचारांची देवाण घेवाण होऊन नवनव कल्पनांचा उदय
होईल, अशी अपेक्षा आहे. मेनमध्ये सर्व संपादकांनी उत्स्फूर्त
सहभागी व्हावे, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकर यांनीही प्रातिनिधीक स्वरूपात
मत मांडताना महात्मा गांधीजींनी दिलेल्या खेड्याकडे चला या मूलमंत्राचा उल्लेख
करून समस्येची सर्व उत्तरे खेड्यात मिळतील असे सांगितले. मेन ही संकल्पना अत्यंत
स्तुत्य आहेच. परंतु हे नेटवर्कच असावे ती संघटनेची जोड असता कामा नये अन्यथा हक्क,
अधिकारांचा प्रश्न समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगितले. बीडचे चंपावती पत्रचे संपादक नामेदवराव क्षीरसागर, औरंगाबादचे संजय वार्ताचे संपादक शिवनाथ राठी यांनीही यावेळी विचार
मांडले.
मराठवाड्याच्या या संपादक परिषदेतून विचारांची देवाण-घेवाण झाली.
संपादकांची भूमिका, त्यांचे एकत्रित नेटवर्क खूप महत्त्वाचे
असल्याचा सूर परिषदेतून निघाला. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्याच्या विकासात ‘मेन’ महत्त्वाची भूमिका बजावेल आणि येथील बालकांचे,
स्त्रियांचे उद्भवणारे प्रश्न सोडवणुकीसाठी त्यांचा मोठा हातभार
लागेल, असेच वाटते.
- श्याम
टरके,
माहिती सहायक, विभागीय माहिती केंद्र, औरंगाबाद.