Wednesday, October 15, 2025

 वृत्त क्रमांक  1102

मृत्यू पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मुद्रांक परवाना हस्तांतरीत 

अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत 

नांदेड दि. 15 ऑक्टोबर :- राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने नैसर्गिक किंवा अन्य कारणामुळे मृत्यू पावलेल्या, बेपत्ता झालेल्या, शारीरिक व मानसिक अक्षमता व वृद्धत्वामुळे काम करुन न शकणाऱ्या तसेच अज्ञान वारस इत्यादी कारणांमुळे मुद्रांक विक्रेत्यांचा वारसांना मुद्रांक परवाना हस्तांतरीत विक्री करण्याबाबत शासन निर्णय 30 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमीत केला आहे.  

हा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीत मुद्रांक परवानाधारकाच्या वारसांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. अधिक माहिती व अटी व शर्तीसाठी हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. त्यांचा संकेतांक 202509301722286319 असा आहे. या शासन निर्णयाचा लाभ मयत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मिळु शकेल असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी सुभाष निलावाड यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक  1101

दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये 

नांदेड, दि.15 ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, त्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात येत आहे. 

लेखी परीक्षा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा कालावधी मंगळवार 10 फेब्रुवारी, 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह), माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र (इ. 10 वी), परीक्षा कालावधी शुक्रवार 20 फेब्रुवारी, 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 पर्यंत राहील. 

प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा इयत्ता 12 वीचा कालावधी शुक्रवार 23 जानेवारी 2026 ते सोमवार 9 फेब्रुवारी 2026 (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह), इयत्ता 10 वीचा कालावधी सोमवार 2 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 फेब्रुवारी 2026 (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) राहील. 

शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी- मार्च, 2026 परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा वरीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000

वृत्त क्रमांक  1100

मोटार सायकल वाहनासाठी नवीन मालिका 

नांदेड दि. 15 ऑक्टोबर :- परिवहनेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी MH26-CX ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज गुरूवार 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. या अर्जासोबत संबंधीत पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डी.डी) सुध्दा सादर करावा. मुदतीनंतर व वेळेनंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वा. दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक  1099

“हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्तच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंत्रणानी कामे वेळेत पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी कर्डिले 

नांदेड, दि. 15 ऑक्टोबर : “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणानी त्यांना सोपविलेली कामे विहित वेळेत समन्वय ठेवून पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. 

बैठकीस रेल्वेचे अपर विभागीय व्यवस्थापक राजेंद्र कुमार मीना, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विजय कृष्णा, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी धोत्रे, मनपाचे उपायुक्त अजितपाल सिंग संधु, गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक हरजितसिंघ कडेवाले, क्षेत्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष व सचिव, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदीची उपस्थिती होती. 

नांदेड येथील या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशीव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील भाविकांचा समावेश राहणार आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात सुमारे पाच लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांसाठी निवास, भोजन व पार्किंग व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये, विविध पार्किंगसाठी मैदानाचे सर्वेक्षण सुरू आहे. संबंधित विभागांनी याबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिल्या. भाविकांना रेल्वे, बस व इतर वाहनाने शहरात येण्यासाठी व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आढावा घेण्यात आला. यासह बांधकाम विभागाने गुरुद्वारा परिसरातील रस्ते, नाल्या व इतर सोपविलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.     

नांदेड शहरात “हिंद-की-चादर”श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांमार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागांने कार्यक्रमाच्या अनुषंगाने हेलिपॅड, मंडप, ग्राऊंड दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, तात्पुरते स्वच्छता गृह इ. कामे करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

या बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, भाविकांना सर्व सुविधांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व यंत्रणानी नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000









वृत्त क्रमांक  1098

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 93 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

नांदेड दि. 15 ऑक्टोबर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला 15 ऑक्टोंबर 2025 रोजी 93 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड व जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आज संपन्न झाला.

 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य श्रीमती डॉ. छाया कुलाल या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी रामचंद्र वंगाटे , जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, सहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण, वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक श्रीमती माधवी राठोड, समाज कल्याण निरिक्षक संजय कदम, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी राहूल शेजुल हे होते.  

 

याप्रसंगी महामानवाचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलीत करण्यात आले तसेच याप्रसंगी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांची जयंती साजरी करण्यात आली. तद्नंतर संविधानाच्या प्रस्ताविकाचे सामुहीक वाचन करण्यात आले.

 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्रीमती डॉ. छाया कुलाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  सामाजिक न्याय विभागाचे महत्व सांगून मोलाचे मार्गदर्शन केले व उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

 

प्रास्ताविकात जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेचा संपूर्ण इतिहास सांगून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक न्याय विभागामध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे ऋण व्यक्त करून वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी  व विद्यार्थी,विद्यार्थींनी यांना शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी रामचंद्र वंगाटे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी सामाजिक न्याय विभागाची स्थापना कशी झाली याची संपूर्ण क्रमबध्द माहिती देवून मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड कार्यालयातील जिल्हा जात पडताळणी, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग नांदेड, विविध महामंडळाचे अधिकारी-कर्मचाचारी उपस्थित होते. सुत्रसचंलन गजानन पंपटवार यांनी केले तर आभार रामदास पेंडकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

0000






वृत्त क्रमांक  1097

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

नांदेड दि. 15 ऑक्टोबर :- भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय तसेच राम मनोहर लोहिया ग्रंथालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज करण्यात आले होते. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

भारताला जागतिक महासत्ता म्हणून आंतरराष्ट्रीय क्षितीजावर नेण्याचे स्वप्न देशातील तरुणाईचा डोळ्यात पेरणारे तसेच पुस्तकांचा लळा आयुष्यभर बाळगणाऱ्या मिसाईल मॅन म्हणून जगविख्यात असलेल्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणार्थ हा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या  साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व व आवड असणे यावर त्यांचे विचार व्यक्त केले तसेच राम मनोहर लोहिया सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार यांनी उपस्थित आमचे आभार मानले या कार्यक्रमास प्रतिभा पापुलवार, अजय वट्टमवार, राजू पाटील, उत्तम घोरपडे तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.  

00000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...