मुळ हस्तलिखीत सातबाराशी
तंतोतंत जुळविण्याचे काम
जिल्ह्यात 80 टक्के पुर्ण -
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 26 :- राज्यातील
जनतेस अचूक संगणकीकृत गा.न.नं. सातबारा ऑनलाईन उपलब्ध होणे आणि सर्व फेरफार
ऑनलाईन पध्दतीने होण्याच्या दृष्टीने डिजीटल इंडीया कार्यक्रमांतर्गत डिजीटल
इंडीया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या मोहिमेंतर्गत
नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात चावडी वाचन पुर्ण करण्यात आले असून
खातेदारांकडून प्राप्त आक्षेप / तक्रारी नुसार प्रत्येक संगणकीकृत गाव न.नं. सातबारा
मुळ हस्तलिखीत गाव.न.नं. सातबाराशी तंतोतंत जुळविण्याचे काम जिल्ह्यात 80 टक्के
पेक्षा अधिक पुर्ण करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी
दिली.
जिल्ह्यात हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून मुळ हस्तलिखीत
गाव न.नं. सातबारा व संगणकीकृत गाव न.नं. सातबारा तंतोतंत मेळात आणावयाचा असल्याने
शासनाने मे 2017 मध्ये चावडी वाचनाची विशेष मोहिम राज्यात सुरू केली होती. विशेष
म्हणजे नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांपैकी हिमायतनगर, लोहा व हदगाव
या तालुक्यानी 100 टक्के काम पुर्ण करून जिल्ह्यात अनुक्रमे प्रथम, दिव्तीय व तृतीय येण्याचा मान प्राप्त केला आहे. तसेच उर्वरित तालुक्याचे
कामही अंतिम टप्यात असुन ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व स्तरावरून
प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेच्या
प्रगतीचा आढावा व कामाचा दर्जा तपासण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालय,
पुणे यांच्यामार्फत नुकतेच विशेष पथक नांदेड येथे पाठविण्यात आले होते. ज्यामध्ये
उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक रामदास जगताप व विभागीय समन्वयक गणेश देसाई
DILRMP हे तपासणी अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने नुकतीच
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन
भवन येथे तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तपासणी पथकाने प्रत्येक
तालुक्यातील 5 गावांच्या कामाची तपासणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब
तहसिलदार (DBA) मंडळ अधिकारी व तलाठी यांना DILRMP प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.चे जयराज कारभारी, जिल्हा सूचना व विज्ञान
अधिकरी सुनिल पोटेकर यांनी केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी धर्माबाद, देगलुर व सर्व तहसिलदार, नायब
तहसिलदार (DBA) मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन नायब तहसिलदार मुगाजी काकडे
यांनी तर आभार शिवानंद स्वामी यांनी मानले.
000000