Monday, June 25, 2018



राजर्षी शाहु महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
समता दिंडीस उत्स्फुर्त सहभाग
नांदेड, दि. 25 :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या 144 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने " समता दिंडी "चे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला व राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.
समाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकणारा चित्ररथ आणि सामाजिक न्याय बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या घोषणांमुळे दिंडी लक्षवेधी ठरली. या दिंडीत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, तसेच विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते आय.टी.आय. नांदेड येथून समता दिंडीची सुरुवात करण्यात आली. समता दिंडीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आला.  
यावेळी समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अशोक गोडबोले , शिक्षणाधिकारी (माध्य) अशोक देवकरे, समता दूतचे प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदिंची यावेळी उपस्थिती होती.
*****

क्रीडा प्रबोधिनी सरळ प्रवेश आणि
 क्रीडा कौशल्य चाचणी (फुटबॉल-मुली) आयोजन 
नांदेड, दि. 25 :- राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत मुलींना फुटबॉल खेळासाठी क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे प्रवेश देण्याकरीता सरळ प्रवेश प्रक्रीया व खेळ निहाय कौशल्य चाचण्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील जास्तीतजास्त फुटबॉल (मुली) खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार  यांनी केले आहे.
सरळ प्रवेशाकरीता पात्रता पुढील प्रमाणे आहे. राज्यस्तरावर पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरसहभाग असलेल्या खेळाडूंची सबंधीत खेळाच्या अधिकृत कौशल्य चाचणीद्वारे गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाणार आहे. वयोमर्यादा 19 वर्षे. 
क्रीडा कौशल्य चाचणी पात्रता- राज्यस्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंची सबंधित खेळाच्या अधिकृत कौशल्य चाचणीद्वारे गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाणार आहे.वयोमर्यादा 19 वर्षे. 
खेळाडुची उपस्थिती :-27 जून 2018 रोजी सायं 5 वाजेपर्यंत, वसतिगृह शिवछत्रपती क्रीडा   संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे. खेळाडूंची निवास व्यवस्था- क वसतिगृह वसतिगृह शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे. फुटबॉल सरळ प्रवेश चाचणी तसेच फुटबॉल कौशल्य चाचणी व प्रवेश चाचणी- 28 जून 2018 मुख्य स्टेडीयम, शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळुंगे  बालेवाडी येथे होईल असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 00000

सामाजिक न्याय दिनानिमित्त
समता दिंडी व कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड, दि. 25 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून जिल्हा, तालुका व गाव पातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्याकडून जिल्हास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यापासून आयटीआय नांदेड येथून समता दिंडीची सुरुवात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन येथे समता दिंडीचा समारोप होईल. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक,  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
या कार्यक्रमास प्रा. डॉ. किरण सगर, प्रख्यात विचारवंत व उपाध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली आहे. 
0000


आराखड्यानुसार जलयुक्तची

कामे वेळेत पूर्ण करावीत  

 --- जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड, दि. 25 :- जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार मनरेगाची कामे आराखड्यानुसार कामे वेळेत व नियोजनबद्ध पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज दिले. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

या बैठकीस उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) महेश वडदकर, जिल्‍हा परिषदेचे उपजिल्‍हा कार्यक्रम समन्‍वयक नरेगा श्रीमती कल्‍पना क्षिरसागर, सामाजिक वनविभागाचे विभागीय वन अधिकारी सुर्यकांत मंकावार, कृषी उपसंचालक माधुरी सोनवणे तसेच जिल्‍ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार , गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी , वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल, उपविभागीय अभियंता तसेच विविध विभागांच्‍या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे म्‍हणाले की, सन 2017-2018 मधील जिल्ह्यात 183 गावांची निवड करण्यात आलेली आहेत. एकूण 5 हजार 424 कामे प्रस्तावित आहेत. 4 हजार 85 कामे पूर्ण तर 343 कामे प्रगतीपथावर आहे. रुपये 27.76 कोटी खर्च झाला आहे. जून, 2018 अखेरपर्यंन्त सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गतची 82 टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. 40 टक्के गावे जलपरिपुर्ण झाली आहेत.

सन 2018-2019 मध्ये 216 गावांची निवड करण्यात आली आहे. शिवार फेरी पूर्ण झालेली आहे. आराखड्यास तालुकास्तरीय समितीची मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्येक गावातील पाच व्यक्तींचे प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात आलेले आहेत. आराखड्यास जिल्हास्तरीय मान्यताही दिली आहे. सन 2018-2019 मधील कामांबाबत तालूका कृषि अधिकारी, किनवट व जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, नांदेड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

उपजिल्हाधिकारी रोहयो महेश वडदकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

0000

मुदखेड येथे नऊ तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही2017       /
नांदेड, दि. 25 :- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाकडून नुकतेच मुदखेड येथे अचानक धाडी टाकण्यात आल्या. कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार या पथकामार्फत 9 तंबाखू विक्रेत्यांकडून 4 हजार 800 रुपये इतका दंड आकारण्यात आला.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. नांदेड जिल्ह्याअंतर्गत कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखूमुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड व स्थानिक पोलीस उप निरीक्षक मुंढे, पोहेकॉ राठोड आदी होते.
00000


प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी
विमा हप्त्याची रक्‍कम भरुन सहभाग नोंदवावा
- जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे
           
नांदेड, दि. 25 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी विमा हप्त्याची रक्‍कम भरुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2018-19 जिल्‍हास्‍तरीय समितीची बैठक कै. शंकरराव चव्‍हाण स‍भागृह, नियोजन भवन येथे जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज संपन्‍न झाली.
या बैठकीस अप्‍पर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) महेश वडदकर, जिल्‍हा परिषदेचे उपजिल्‍हा कार्यक्रम समन्‍वयक नरेगा श्रीमती कल्‍पना क्षिरसागर, सामाजिक वनविभागाचे विभागीय वनअधिकारी सुर्यकांत मंकावार, कृषी उपसंचालक माधुरी सोनवणे, जिल्‍हा रेशिम अधिकारी श्री. पाटील तसेच जिल्‍ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार , गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी , वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल, उपविभागीय अभियंता, बॅंकेचे, विमा कंपनीचे, सीआरसीचे प्रतिनिधीसह विविध विभागांच्‍या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे म्‍हणाले की, नांदेड जिल्‍ह्यासाठी इफको टोकीओ कंपनी असून विमा हप्‍ता आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र व बॅंकेत भरता येईल. जिल्‍ह्यात तीन हजार सुविधा केंद्र निर्माण करण्‍यात आली आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा ऐच्छिक आहे. पिक विमा भरण्‍याची अंतीम मुदत दिनांक 31 जुलै आहे. जास्‍तीतजास्‍त शेतक-यांनी पिक विमा भरण्‍याबाबत जनजागृती करावी, असे जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सांगितले.
प्रत्‍येक गावात कृषिवार्ता फलकावर संदेश लिहनू पोस्‍टर लावावेत. आकाशवाणी, वृत्तपत्राद्वारे प्रसिद्धी करावी. तालुकास्‍तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी बैठक घेवून जास्‍तीतजास्त शेतकऱ्यांना विमा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिल्‍या.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी संदर्भात बॅंका, विमा कंपनी, विविध यंत्रणेनी करावयाची कामे, शेतकऱ्यांची कर्तव्‍ये व जबाबदाऱ्या, नुकसान भरपाई काढण्‍याची पध्‍दत, विमा हप्‍ता दर इत्‍यादी विषयांवर सादरीकरण प्रकल्‍प संचालक विजय  भरगंडे यांनी केले.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...