Thursday, August 22, 2024

 वृत्त क्र. 759

पिक विमा मिळाला नसल्यास

प्रपत्रात माहिती सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 22  ऑगस्ट :-  प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना देऊन देखील पिक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या प्रपत्रात संपूर्ण माहिती भरुन आवश्यक कागदपत्रासह संबंधित तालुका कृषि अधिकारी तथा सदस्य सचिव तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या कार्यालयात 3 सप्टेंबर 2024 पर्यत दाखल करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.  तसेच प्रपत्र संबंधित तालुका कृषि कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावे असेही कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 758

जिल्ह्यात 28 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन 

नांदेड दि. 22  ऑगस्ट :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई  व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबीक न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर व न्यायाधीश नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.

 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे, तसेच कौटुंबिक न्यायालयातील तडजोड होण्या योग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

याशिवाय सदर लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅंकांचे कर्ज वसुली प्रकरण, थकीत पाणी बिल इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आाहेत.

 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट फी  रक्कम 100 टक्के परत मिळते. नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही. अशाप्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातुन सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो.  सर्व पक्षकारांनी येतांना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे. सर्व संबंधित पक्षकारांनी दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचा  लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

वृत्त क्र. 757

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या

लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित

 

·         26 ऑगस्टपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन


नांदेड दि. 22 ऑगस्ट :-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपली सर्व प्रकारची अद्ययावत माहिती जसे की बँक/पोस्ट खात्याची पहिल्या पानाची पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, दिव्यांग प्रमाणपत्र , दुर्धर आजार असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर इत्यादी तलाठी शेळके व श्रीमती बोकन यांच्याकडे अथवा संजय गांधी निराधार योजना कार्यालय, नांदेड शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे 26 ऑगस्ट 2024 पर्यत जमा करावे असे आवाहन तहसिलदार संगायो शहर नांदेड यांनी केले आहे.

जे लाभार्थी विहित मुदतीमध्ये आपले अद्ययावत कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करता येणार नाही असेही तहसिलदार संगायो शहर नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्र. 756

शहरातील वाहतुक मार्गात बदल

नांदेड दि. 22 ऑगस्ट :-  नांदेड शहरात मामा चौकमैदान जुना कौठानांदेड येथे 23 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये पंडीत प्रदिप मिश्रा (सिहोरवाले) यांचे उपस्थितीत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवमहापुराण कथा कार्यक्रमास जिल्ह्यातील व परिसरातील भाविक मोठया प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कालावधीत शहरात व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना व इतर रहदारीस अडथळा होणार नाही यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये 23 ते 29 ऑगस्ट 2024 पर्यत सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यत वाहतुकीच्या नियमाबाबत पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे.

शिवमहापुराण कथा कार्यक्रमासाठी बाहेरुन येणारे वाहतुकीस बंद असलेले मार्ग

कथा कार्यक्रमासाठी परभणी-वसमत-पुर्णाकडून येणारी वाहतुक छत्रपती चौक-तरोडा नाका-राज कॉर्नर-वर्कशॉप ते वजिराबाद चौकाकडे येणारी वाहतुक बंद राहील. कथा कार्यक्रमासाठी अर्धापूरकडून येणारी वाहतुक शंकरराव चव्हाण चौक-नमस्कार चौक-महाराणा प्रताप पुतळा ते शहरात येणारी वाहतुक पूर्णपणे बंद राहील. कथा कार्यक्रमासाठी लिंबगाव कडून येणारी वाहतुक ही वाघी रोड-पोलीस मुख्यालय- तिरंगा चौक-गोवर्धन घाट पुल मार्गे जाणारी वाहतुक बंद राहील.

शिवमहापुराण कथा कार्यक्रमस्थळाकडे जाण्यासाठी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

कथा कार्यक्रमासाठी परभणी-वसमत-पुर्णाकडून येणारी वाहतूक ही छत्रपती चौक-मोर चौक-पिवळी बिल्डिंग-खडकपुरा अंडरब्रिज-वाघी रोड-हस्सापुर ब्रिज ते कार्यक्रमाचे पार्किंगचे ठिकाण. कथा कार्यक्रमासाठी अर्धापूरकडून येणारी वाहतूक आसना पुल ओव्हर ब्रिज-धनेगाव चौक-दुधडेअरी-आंबेडकर चौक-बसवेश्वर चौक- मामाचौक ते पार्कीगचे ठिकाण. कथा कार्यक्रमासाठी लिंबगावकडून येणारी वाहतूक ही वाघी रोड-हस्सापुर ब्रिज ते कार्यक्रमाचे पार्किंगचे ठिकाण. कथा कार्यक्रमासाठी नायगावकडून येणारी वाहतूक ही धनेगाव चौक-दुध डेअरी-आंबेडकर चौक-बसवेश्वर चौक-मामा चौक ते पार्कीगचे ठिकाणी याप्रमाणे राहील.

शिवपुराण कथेस परभणीवसमतपुर्णालिंबगावअर्धापूरनायगांवमुदखेड मार्गे येणारे भाविकांना वरील दिलेल्या पर्यायी मार्गाचा येण्या-जाण्यासाठी वापर करावा. 23 ते 29 ऑगस्ट 2024 पर्यत दररोज 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीस अडथळा होवू नये यासाठी पर्यायी मार्गाची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

00000

 वृत्त क्र. 755

जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध सभांचे 23 ऑगस्ट रोजी आयोजन

नांदेड दि.  22 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समितीची सभा 23 ऑगस्ट 2024 रोजी सायं 4.30 वा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.  

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...