Friday, September 9, 2022

 मुलांच्या निरीक्षणगृहात वाचनालयाचा शुभारंभ  

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  मुलांनी पुस्तकांचे वाचन करून स्वत:मध्ये सुधारणा करावी. आपल्या जीवनात कोणतेही वाईट कृत्य करू नये, असे प्रतिपादन डॉ. शालीन इटनकर यांनी केले. नांदेड येथील मुलांचे निरिक्षणगृह येथे त्यांच्या हस्ते आज वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिलिंद वाघमारे हे होते. वाचनालयातील पुस्तकांचे नियमित वाचन करावे, असे आवाहन मिलिंद वाघमारे यांनी केले. यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य, मुलांचे निरीक्षणगृहाचे अधीक्षक एस. के. दवणे, परिविक्षा अधिकारी एस. आर. दरपलवार, गजानन जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या अळणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपअधिक्षक सतिश हिवराळे यांनी केले तर शेवटी आभार अधिक्षक दवणे यांनी मानले.

000  

 

 

 11 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा दुखवटा   

नांदेड (जिमाका) दि. 9 :- महामहीम महाराणी एलीझाबेथ द्वितीय, युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन आणि उत्तर आर्यलँड यांचे दिनांक 8 सप्टेंबर  2022 रोजी दु:खद निधन झाले आहे. दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहन्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी संपूर्ण देशात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. रविवार 11 सप्टेंबर 2022 रोजी ज्या इमारतीवर दररोज नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात यावा. या दिवशी कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी बिनतारी संदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.

00000

 मतदान ओळखपत्रास आधार जोडणी करण्यासाठी

10 व 11 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी शिबिराचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्याच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी मतदारांचे निवडणूक ओळखपत्राशी आधार लिंकींग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअन्वये 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील 344 व 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील 308 मतदान केंद्रावर शनिवार 10 सप्टेंबर व रविवार 11 सप्टेंबर रोजी मासिक विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. मतदारांनी या मासिक शिबिरात निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करुन घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे. 

मतदारांनी निवडणूक ओळखपत्रास आधार लिंकींग करण्यासाठी पुढील सुविधाचा वापर करावा. व्होटर हेल्प लाईन ॲपचा वापर करुन निवडणूक ओळखपत्रास आधार लिंकींग करावी. ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयातील संगणकचालक यांच्यामार्फत निवडणूक ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करता येईल. याचबरोबर संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय नांदेड येथील बीएलओ कक्ष, निवडणूक विभाग तसेच नांदेड तालुक्यातील सर्व नागरी सुविधा केंद्रावर हे काम विनामुल्य आहे. याबाबत सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेडचे संबंधित वसुली अधिकारी, सुपरवायझर यांना तसे आदेश दिले आहेत.

000000

 नानाजी देशमुख कृषि संजीवनी

प्रकल्पांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड या घटकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर २०२२ अखेर पर्यंत आहे. त्यानंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प गावातील संबंधित कृषी सहाय्यक किंवा समूह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

कृषी विभाग व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प गावातील लहान शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाला जुळवुन घेण्यास सक्षम करणे. शेती पूरक व्यवसाय किफायतशिर करण्यासाठी जिल्ह्यात ३८४ गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे.  सप्टेंबर २०२२ अखेर पर्यंत एकूण प्राप्त अर्जांवर निकषानुसार पूर्व संमती मिळाल्यानंतर पात्र अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या विषयी संबंधीत शेतकऱ्याने हमीपत्र लिहून देणे गरजेचे आहे. 

प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड या घटकांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प गावातील इच्छुक असलेले शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर (http://dbt.mahapocra.gov.in) नोंदणी करावी. नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये संबंधित शेतकऱ्यांचे आधारकार्ड, सातबारा उतारा,  आठ- अ, मोबाईल क्रमांक, अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे. एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ट फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड बाबीसाठी स्वतंत्र अर्ज करावा, असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

00000

 ग्रामपंचायत मतदान, मतमोजणी केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी रविवार 18 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसर तसेच सोमवार 19 सप्टेंबर 2022  रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केले आहेत.  

या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने रविवार 18 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून तर सोमवार 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे,  सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामव्यतिरिक्त व्यक्तींस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.  

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील 91 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ज्या ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहे अशा मतदान केंद्रावर रविवार 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहील. तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून  मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

00000

 श्री गणेश उत्सव कालावधीत

डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध  

नांदेड (जिमाका), दि. 9 :-  डॉल्बी मालक, धारक, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात, उपयोगात आणण्यास 10 सप्टेंबर पर्यंत प्रतिबंध केले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी  यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार आदेश निर्गमीत केले आहेत.

00000

 जनावरांचे गोठे व जनावरे यांची फवारणी

करुन घेण्याचा पशुपालक व शेतकऱ्यांना सल्ला 


नांदेड जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव नाही

जिल्हा पशुसंवर्धन विभाग दक्ष 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- राज्यात सद्यस्थितीत काही जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातर्फे विशेष दक्षता घेण्यात आली असून ग्रामपातळी पर्यंत पशुपालक शेतकऱ्यांना पशुधनाची योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. या आजाराला रोखण्यासाठी आपल्या जवळील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार गोठा व जनावरांवर औषधांची फवारणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी केले आहे. 

सन 2020-21 मध्ये लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये झाला होता. जिल्हयातील एकूण 45 हजार जनावरे बाधीत झाली होती.  1 लाख 20 हजार गोट पॉक्स लस मात्रा खरेदी करुन पशुधनास लसीकरण करण्यात आले होते.  सन 2022-23 साठी राज्यस्तरावरुन 10 हजार लस मात्रा खरेदी करुन संस्थाना रोग प्रादुर्भाव उदभवल्यास प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी वाटप करण्यात आलेले आहे. पशुपालकामध्ये जनजागृतीचे कार्य पशुसंवर्धन विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. पशुपालक व ग्रामपंचायतच्या मदतीने जनावरांच्या गोठयामध्ये फवारणी करणेसाठी किटकनाशक औषधाचा पुरवठा करुन गोठे फवारणीचे काम चालु असल्याची माहिती डॉ. रत्नपारखी  यांनी दिली. 

पशुपालकामध्ये या आजाराविषयी जनजागृती होण्यासाठी नांदेड एफ एम रेडीओवरुन किसानवाणी या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मागदर्शनपर मुलाखत सादर करण्यात आली. जिल्हा आणि तालुकास्तरावर माहीतीपर घडीपत्रीका वितरीत करण्यात येत आहेत. पशुवैदयकिय संस्था  पातळीवर या रोगाविषयी माहीती होण्यासाठी बॅनर तयार करुन लावण्यात आले आहे. जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात 16 तालुक्यात शिघ्र कृती दल स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्हयात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी -1 – 74, श्रेणी -2 – 104   राज्यस्तरीय संस्था- 6 असे एकूण -184 पशुवैदयकिय संस्था कार्यरत आहेत. मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेचे तीन फिरते पशुचिकित्सा पथके कार्यान्वित आहेत.  सर्व संस्था प्रमुखांना या रोगाविषयी सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. बाधीत जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व तात्काळ उपचार सुरु करावा.  गोचिड, गोमाशा व डास निर्मुलन मोहिम सुरु करावी असेही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

00000

 

 किनवट येथे आदिवासी समाजातील 410 मुलींची

टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत निवड   

पालकांच्या डोळ्यात आनंदही आणि अश्रुही ! 

·   पालकांनी मुलींना धैर्य द्यावे - आमदार भीमराव केराम

·  आपल्या कर्तव्यातून काही घरे उजळल्याचा सर्वोच्च आनंद - किर्तीकिरण पुजार 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट कार्यालयामार्फत आदिवासी जमातीच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. यात प्रामुख्याने निवासी आश्रमशाळा व मुलींच्या शिक्षणावर विशेष भर दिला गेला आहे. या मुलींना आपले बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यादृष्टिने प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी वेगळा विचार केला. टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी संपर्क साधून या मुलींना विकासाच्या प्रवाहात घेता येईल का याची चाचपणी केली. कंपनीच्या मानव संसाधन विभागाने याला तात्काळ प्रतिसाद देत किनवट येथे आपली स्वतंत्र टिम पाठवून दोन दिवस निवड शिबीर घेतले. या शिबिरात तब्बल 410 मुलींना नौकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

आदिवासी समाजातील मुलींसाठी किनवट येथे दिनांक 6 व 7 सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिर घेतले होते. यात 600 मुली सहभागी झाल्या. यवतमाळ, धारणी येथील केंद्रांना कल्पना देऊन तेथील मुलींनाही निमंत्रित केले होते.  टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या पथकाने मुलींशी संवाद साधत यातील तब्बल 410 मुलींची निवड केली. या सर्व मुलींना बेंगळूरू येथे विशेष प्रशिक्षण देऊन तेथून 50 किमी अंतरावर असलेल्या होसुर येथील टाटाच्या मोबाईल पार्टस् व इलेक्ट्रॉनिक्स विभागात रुजू केले जाणार आहे. 

पुढील शिक्षणापेक्षा कायदानुसार वय पूर्ण झाले की मुलींचे लग्न लावून देण्याची आदिवासी पालकांची मानसिकता या मुलींच्या भविष्याला मर्यादा घालणारी होती. आजही फार कमी प्रमाणात आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी त्यांचे पालक तयार होत नाहीत. यात काही परिवर्तन करता येईल का या विचारातून  प्रकल्प संचालक किर्तीकिरण पुजार यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी बोलणे केले. सामाजिक कृतज्ञता आणि तत्परता यासाठी आदर्श मापदंड निर्माण करणाऱ्या टाटा कंपनीने यावर तात्काळ प्रतिसाद देत मुलींच्या निवडीसाठी सरळ किनवट गाठले हे विशेष. 

तलाईगुडापाडा येथील या मुलींपैकी एक असलेले पालक राजाराम मडावी यांनी आपल्या मुलीच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. हा आनंद व्यक्त करतांना राजाराम व त्याची पत्नी अत्यंत भाऊक झाली. आमच्या पिढ्यांनी तालुक्याबाहेर जास्त दूरचे जग कधी बघितले नाही. मात्र पुजार यांच्या एका छोट्याशा प्रयत्नातून मुलगी बेंगळूरूला जाते ती सुद्धा नौकरीसाठी असे सांगून आपल्या आनंद अश्रुंना वाट मोकळी करून दिली. याच भावना इतर पालकांच्या नसतील तर नवलच !    

पालकांनी मुलींना धैर्य द्यावे

- आमदार भीमराव केराम

आदिवासी भागातील मुलींना शासनाच्या विविध योजनांमुळे शिक्षणाची संधी मिळाली. मुलींच्या पालकांनीही थोडे धैर्य दाखवून शिक्षणासाठी त्यांना बाहेर वसतीगृहात ठेवण्यास अनुमती दिली. हे जरी खरे असले तरी शिक्षण घेतल्यानंतर मुलींना जेंव्हा स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते तेंव्हा पालकांनी वेगळा विचार न करता धैर्याने त्यांच्या सोबत उभे राहून मुलींना हिंमत द्यावी असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट व प्रकल्प संचालक किर्तीकिरण एच पुजार यांनी हाती घेतलेल्या या विशेष उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले. टाटा सारखी कंपनी किनवटच्या आदिवासी भागात येते हे आम्हा सर्वांसाठी भूषणाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 

आपल्या कर्तव्यातून काही घरे उजळल्याचा

सर्वोच्च आनंद - किर्तीकिरण पुजार  

आपली शासकीय कर्तव्य बजावताना वास्तविक पाहता प्रत्येकाला समाज ऋण फेडण्याची, समाजाप्रती कृतज्ञता जपण्याची संधी मिळत असते. आदिवासी प्रकल्पातील काम हे मानवी मुल्यांना, मागास असलेल्या घरांना नवा प्रकाश देणारे असते. शासनानी ज्याही काही योजना हाती घेतलेल्या आहेत त्या या घटकातील प्रत्येकांना प्रकाश वाटा दाखविणाऱ्या आहेत. मी फक्त यांच्या रोजगारा संदर्भात टाटा कंपनीसमवेत बोललो व याला यश आल्याची भावना आदिवासी प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त केली.

00000

 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...