विशेष लेख
नांदेड ; न्यू स्पोर्ट हब...
नांदेड येथे 21, 22 व 23 फेब्रुवारी २०२५ ला झालेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेने नांदेडच्या क्रीडा जगताला नवी उभारी दिली आहे. क्रीडा क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.या स्पर्धेने क्रीडाप्रेमींच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला. उत्कृष्ट आयोजन, उच्च दर्जाची व्यवस्था आणि स्पर्धामधील चुरस यामुळे ही स्पर्धा एक व्यावसायिक आयोजन ठरली. दुसरीकडे यानिमित्ताने नांदेडने स्वतःला एक प्रमुख क्रीडा हब म्हणून सिद्ध केले आहे.
व्यावसायिक आयोजन
स्पर्धेचे आयोजन हे केवळ व्यावसायिक पातळीवरच नव्हे, तर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले.यामध्ये स्पर्धकांच्या सोयीसाठी प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला. स्पर्धेचे मैदान, पंचाची नियुक्ती, तांत्रिक सुविधा, खेळ साहित्य, मैदाने यांचे आधुनिक व्यवस्था,आणि स्पर्धेच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन यामुळे हा सोहळा अधिक भव्यदिव्य तर ठरलाच. पण गुणवत्तेच्या पातळीवर व्यावसायिक आयोजनही ठरले.या स्पर्धेचे नियोजन देशातील मोठ्या क्रीडा स्पर्धांना लाजवेल असे होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी देखील यावेळी क्रीडा स्पर्धा असलेली ठिकाणे आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी स्वच्छता व मैदान तयार करण्यासाठी केलेली मदत लक्षवेधी ठरली. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून केलेली योजना स्पर्धेच्या यशाचा मुख्य आधार होती.
निवास आणि भोजन –सर्वोत्तम
असे म्हणतात आनंद आणि समाधानाचा मार्ग पोटातून जातो. त्यामुळेच सहभागी खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या निवास आणि भोजन व्यवस्थेने आयोजकांनी सर्वांचे मन जिंकले. खेळाडूंसाठी अत्यंत स्वच्छ आणि आरामदायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे स्पर्धकांना कोणत्याही त्रासाविना आपला खेळ सादर करता आला.
भोजन व्यवस्थाही वाखाणण्याजोगी होती. पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार खेळाडूंना मिळावा याची विशेष काळजी घेतली गेली. खेळाडूंसाठी संतुलित आहार उपलब्ध करून देण्याचे नियोजन हे अत्यंत प्रभावी होते, ज्याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या ऊर्जेवर आणि कामगिरीवर दिसून आला.
नांदेड स्पोर्ट्स बेस्ट डेस्टिनेशन
या भव्य स्पर्धेच्या आयोजनामुळे नांदेड आता क्रीडा जगतात एका महत्त्वाच्या स्थळी रूपांतरित होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या धडपडीत शहराने अशा २४ दर्जेदार राष्ट्रीय व राज्य स्पर्धांचे वर्षभरात आयोजन करून भविष्यातील क्रीडा स्पर्धांसाठी स्वतःला आदर्श स्थळ म्हणून सिध्द केले आहे. यामध्ये १८ राज्य व राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन एका कॅलेंडर वर्षातील आहे.नांदेडमध्ये असलेली क्रीडा संरचना, उत्तम सुविधा आणि खेळाडूंसाठी पोषक वातावरण यामुळे येत्या काळात नांदेड महाराष्ट्रातील एक प्रमुख क्रीडा हब बनण्याच्या मार्गावर आहे.
क्रीडा प्रेमींसाठी पोषक वातावरण
या स्पर्धेने स्थानिक क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण केले आहे. महसूल विभागाच्या दर्जेदार खेळाडूंनी यामध्ये वर्णी लावली. स्वतः खो -खो च्या राष्ट्रीय कर्णधार असणाऱ्या प्रियंका इंगळे यांनी आयोजनाचे, मैदानाच्या तयारीचे कौतुक केले. या स्पर्धेमुळे भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी नांदेड एक उत्कृष्ट केंद्र म्हणून विकसित होईल, अशी आशा आहे.
भवीष्यातील नांदेडचा क्रीडा विकास
या स्पर्धेच्या यशानंतर नांदेडमध्ये भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अधिक योजना आखण्याची गरज आहे.
यामध्ये आधुनिक क्रीडा संकुल उभारणे, प्रशिक्षकांची संख्या वाढवणे आणि खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्याची पावले उचलली तर नांदेड महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.
आठवणींचा अमूल्य ठेवा
"आयुष्यभराच्या आठवणी" या स्पर्धेने केवळ खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही, तर ती नांदेडच्या क्रीडा परंपरेला चालना देणारी स्पर्धा ठरली. उत्तम आयोजन, उत्कृष्ट व्यवस्था आणि संस्मरणीय क्षण यामुळे ही स्पर्धा सर्वांच्या मनात कायमची कोरली गेली.
ही स्पर्धा यशस्वी झाल्यामुळे भविष्यात नांदेडमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा भरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नांदेड महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचेल, यात शंका नाही!
राज्यस्तरीय स्पर्धांमुळे मैदानांचे अद्यावतीकरण
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय इनडोअर हॉलमध्ये बॅडमिंटन आणि टेबल टेनिस, तसेच बुद्धिबळाचे प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. तसेच आउटडोरला बास्केटबॉलची दोन मैदाने आणि स्केटिंग रिंग अंतर्गत दोन्ही प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे, ही सुविधा अद्यावत झाली.
श्री.गुरुगोविंद सिंघ जी स्टेडियममध्ये क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार आहे. या मैदानावरील स्टेडियम वरील रंगरंगोटी करण्यात आली तसेच आऊटफिल्ड अद्यावत करण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडूंना या मैदानावर खेळताना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शैल्याचा फील होता. या खेळाडूच्या माध्यमातून राज्याला या मैदानाची क्षमता कळली. दर्जेदार स्पर्धेसाठी या मैदानाची शिफारस कानोकानी झाली.
इंदिरा गांधी मैदान, मनपा,या ठिकाणी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रो बॉलचे मैदान तयार झाले.
सायन्स कॉलेजच्या अथलेटिक्स सिंथेटीक ट्रॅक, व्हॉलीबॉलचे मैदान, खो -खो चे मैदान,इन्डोअर व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस,त्याचबरोबर आऊटडोरला लॉन टेनिसचे मैदान अद्यावत झाले.
पीपल्स कॉलेजचे फुटबॉल मैदान, बास्केटबॉल कोर्ट तयार आहेत.
नांदेड क्लबच्या ठिकाणी लॉन टेनिसचे मैदान उपलब्ध आहेत.
खालसा स्कूल या ठिकाणी हॉकीचे मैदान उपलब्ध आहे.
दशमेश स्कूल या ठिकाणी हॉकीचे टर्फचे मैदान उपलब्ध आहे. ही अद्यावत झालेली मैदाने या पुढेही अशाच पद्धतीने खेळाडूंना उपलब्ध होईल. यासाठी सर्व स्थानिक प्रशासनांनी त्याची निगा राखावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
महसूलचे टीमवर्क ठरले विजेते...
या संपूर्ण स्पर्धेच्या मध्यवर्ती एक नेतृत्व होते. एक कोअर टीम होती. या कोअर टीमच्या डोक्यामध्ये अगदी पहिल्याच दिवशी स्पर्धा यशस्वी कशी करायची याचा रोड मॅप होता. प्रचंड आत्मविश्वासाने ही टीम कार्यरत होती. या टीमची ऊर्जा होती तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि आताचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले. या टीमची पहिली तपासून अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या थर्मामीटरने व्हायची... आणि मग सूत्रधार निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व त्यांची कोअर टीम गडावरचे दोर कापल्याप्रमाणे समस्येचे समाधान काढूनच शांत व्हायचे.या टीम मध्ये प्रत्येकाने आपले काम चोख बजावले. सांस्कृतिक स्पर्धा तर दर्जेदार रंगमंचावरील कार्यक्रमाची साखर पेरणी होती या साठी टीमने केलेली धडपड ७० एमएमच्या पडद्यासारखी नजरेत भरणारी होती. ही अविरत मेहनत, धडपड महिन्याभराची होती. यामध्ये प्रत्येक गोष्टीची बारकाईने उपाययोजना करण्यात आली होती. हिमालयासारखे टीम वर्क एखादी स्पर्धा शंभर टक्के यशस्वी करण्यास कारणीभूत ठरले ! हॅट्स ऑफ टू टीम रेव्हेन्यू !!
प्रवीण टाके
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
९७०२८५८७७७