Thursday, May 26, 2022

 आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत 

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ही असंघटीत व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी असून एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जात आहेया योजनेअंतर्गत वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगासाठी, सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी 35 टक्के अनुदान, ब्रॅडींग व मार्केटींगसाठी एकुण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद (4 लाख रुपया) पर्यंत अनुदान देय आहे. या योजनेचा सर्वांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात ही योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत असून अर्ज करण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी दर बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत आवश्यक कागदपत्रांसह जसे आधार कार्ड, पॅनकार्ड, वीज बिल, बँक पासबुक, यंत्र सामुग्रीचे दरपत्रक, इतर परवाना असल्यास आणावे. प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय, संतोष बीज भांडारच्यावर नवीन मोंढा नांदेड किंवा संबंधित तालुका कृषि कार्यालयात उपस्थित रहावे.

 

नांदेड जिल्ह्यासाठी हळद व इतर मसाले पदार्थ हे उत्पादन मंजूर असून या उत्पादनाच्या व्यतीरीक्त इतर पिकाखालील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी देखील लाभ घेता येईल. या योजनेत वैयक्तिक उद्योजक, मालकी / भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, एनजीओ, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट, खाजगी कंपन्यांना नवीन तसेच सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी (जसे गुळ उद्योग, दाळ मिल आदी) प्रस्ताव सादर करता येतील. यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नसुन 18 वर्षावरील सर्वांना या योजनेचा लाभ घेता येतो, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत

लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण बंधनकारक

 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना योजनेचा एप्रिल-जुलै 2022 या कालावधीत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक केले आहे. त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर फार्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान ॲप ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वत: ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) येथे प्रति लाभार्थी 15 रुपये दराने ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी 31 मार्च 2022 अखेर पर्यंत पूर्ण करण्याबाबत शासनाने सूचना आहेत. त्याअनुषंगाने ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.

000000 

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत

लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे

 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांची बँक खाते आधार संलग्न करून सुरळीत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेअंतर्गत देय लाभ एप्रिल 2022 पासून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात आधार आधारीत अदा करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी लाभार्थ्यांची पी.एम. किसान योजनेची बँक खाती असलेल्या सर्व बँकांमध्ये सर्व पी. एम. किसान लाभार्थी खातेदारांची बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी मोहिम राबविण्याबाबत नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  

0000

 

वृत्त क्र. 1558

भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

शेतकऱ्‍यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबई, दि.24 : शेतकरी बांधवांनी त्यांच्या कृषी उत्पादनाचा दर्जा आणि वेगळेपणा जपून गुणवत्तापूर्वक उत्पादने तयार करण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर राज्याची ओळख निर्माण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी भौगोलिक मानांकन हा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात राज्यातील 12 भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यात मंगळवेढा मालदांडी ज्वारी, नवापूर तूरडाळ, भिवापूर मिर्ची पावडर, पुणे आंबेमोहोर तांदूळ, महाबळेश्वर ड्राय स्ट्रॉबेरी, सांगली हळद, आजरा घनसाळ तांदूळ, वायगाव हळद, डहाणू चिक्कू पावडर, सांगली बेदाणा, वेंगुर्ला काजू, भंडारा चिन्नोर तांदूळ या उत्पादनांचा समावेश आहे. या शुभारंभप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार तथा प्राधिकृत अधिकारी  बाबासाहेब पाटील, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी व पदुम विभागाचे सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, प्राधिकृत अधिकारी  मंडळ  सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले शेतकरी  उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला. या माध्यमातून शेतकऱ्‍यांची गुणवत्तापूर्ण उत्पादने आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. सध्या मॅाल संस्कृती पुढे येत असून या संस्कृतीत शेतकऱ्‍यांची कृषी उत्पादने टिकून ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचे आहे.

            सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, ग्राहक हा चोखंदळ असतो. त्याला चांगली उत्पादने हवी असतात. ग्राहकाला भौगोलिक मानांकन प्राप्त असलेली उत्पादने ही अधिक विश्वासार्ह वाटतात. गुणवत्ता व दर्जा टिकवून ग्राहकांचा विश्वास संपादन करता येते. 

            भौगोलिक मानांकन (जीआय) म्हणजे एखादी वस्तू व उत्पादनास विशिष्ट स्थानामुळे प्राप्त झालेला असाधारण गुणधर्म, दर्जा आणि वेगळेपणा होय. वस्तू व उत्पादनांना वैज्ञानिक विश्लेषण, वैशिष्टपूर्ण गुणधर्म व पारंपरिक इतिहास सिद्ध केल्यावरच भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त होते. केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्याद्वारे भौगोलिक मानांकन देण्यात येते. जीआय टॅगमुळे फसवेगीरीस आळा बसतो व अस्सल दर्जाची उत्पादने असल्याची ग्राहकाला शाश्वती मिळते.

०००




  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...