Friday, December 9, 2016

विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड, दि. 9 :-  राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
शनिवार 10 डिसेंबर 2016 रोजी परळी येथून हेलिकॅाप्टरने सकाळी 9.40 वा. अर्धापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. हेलिकॉप्टरने अर्धापूर येथून उमरीकडे प्रयाण. सकाळी 11.50 वा. उमरी हेलिपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी 1.15 वा. उमरी येथून हेलिकॉप्टरने प्रयाण. दुपारी 1.35 वा. व्यंकटराव पाटील कवळे साखर कारखाना उमरी येथे सिंधी (गोपाळवाडी) हेलिपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. सिंधी (गोपाळवाडी) येथून हेलिकॉप्टरने धर्माबादकडे प्रयाण व दुपारी 3.20 वा. धर्माबाद हेलिपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी 4.45 वा. हेलिकॉप्टरने देगलूरकडे प्रयाण. सायंकाळी 5.10 वा. हेलिपॅड देगलूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.

0000000
पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री
महादेव जानकर यांचा दौरा
नांदेड, दि. 9 :- राज्याचे  पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 12 डिसेंबर 2016 रोजी परळी येथून मोटारीने मुखेड मार्गे देगलूर येथे दुपारी 1 वा. आगमन व राखीव. दुपारी 2 वा. देगलूर येथून मोटारीने धर्माबादकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4 वा. धर्माबाद येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वा. धर्माबाद येथून मोटारीने अदिलाबाद, पांढरकवडा, हिंगणघाट मार्गे नागपूरकडे प्रयाण करतील.

0000000
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा
नांदेड, दि. 9 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 11 डिसेंबर 2016 रोजी अंबेजोगाई जि. बीड येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.30 वा. मुदखेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.45 वा. हेलिकॉप्टरने कंधारकडे प्रयाण करतील. दुपारी 3.55 वा. हेलिकॉप्टरने कंधार येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.15 वा. कंधार येथून हेलिकॉप्टरने परळी जि. बीडकडे प्रयाण करतील.
सोमवार 12 डिसेंबर 2016 रोजी हेलिकॉप्टरने पांगरी ता. परळी जि. बीड येथून सायंकाळी 5.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6 वा. खाजगी विमानाने मुख्यमंत्री महोदयांसमवेत नागपूरकडे प्रयाण करतील.  

0000000
मतदार जागृती व आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी
- राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया
                नांदेड, दि. 9 :- नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम हाती घ्यावी , असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिले.
          
  नांदेड येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात नांदेड, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक संदर्भातील विभागीय आढावा बैठक राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, नांदेड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक नविनचंद्र रेड्डी, लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            श्री. सहारिया यांनी सांगितले की , राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चार टप्प्यात या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 2016 रोजी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात पुणे आणि लातूर या दोन जिल्ह्यांतील 14 नगरपरिषदांसाठी 14 डिसेंबर 2016 रोजी मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, नांदेड, भंडारा आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांतील 20 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींसाठी 18 डिसेंबर 2016 रोजी; तर शेवटच्या टप्यात नागपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांतील 11 नगरपरिषदांसाठी 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होईल.
            या निवडणुकांच्या तयारी संदर्भात विभागीय पातळीवर आढावा बैठका घेण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक संदर्भातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कायदा व सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. मतदार जागृती करताना मतदानाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच वस्तू अथवा पैशाच्या स्वरूपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारू वाटपावर नजर ठेवणे ; तसेच बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढी मते देणे याबाबत देखील मतदार जागृती करण्याच्या सूचना सहारिया यांनी यावेळी दिल्या.
            नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता मतदारांना मतदान करता यावे याची व्यवस्था करावी. आदर्श निवडणूक आचारसंहितीच्या मार्गदशक तत्वानुसार निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक होण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील माहिती मतदारांना व्हावी यासाठी शपथपत्रातील महितीचा गोषवारा वृत्तपत्रातून तसेच मतदान केंद्र परिसरात नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.  
            या विभागात सर्व यंत्रणाचे समन्वयाने काम सुरु असल्याने या निवडणुका यशस्वीरित्या पार पडतील असा विश्वास व्यक्त करुन औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी मतदार जागृती मोहिम राबविली जात असल्याने मतदानाच्या टक्केवारीतही वाढ होईल, असे सांगितले.
            राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांनी निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सतर्क रहाण्याचे सूचना पोलीस यंत्रणाना दिलेले आहेत, असे सांगितले.
            यावेळी श्री. चन्ने यांनी निवडणुकीशी संबंधित यंत्रणानी अधिक सतर्क राहून या निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडाव्यात. सिंगल विंडो सिस्टीम सुरु करुन राजकीय पक्ष उमेदवारांना आवश्यक परवानगी देण्यात याव्यात. यासारख्या विविध सूचना त्यांनी दिल्या. तर नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी निवडणूक विषयी आपल्या विभागाची माहिती दिली.
            यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी आपआपल्या जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा यावेळी सादर केला. लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक नविनचंद्र रेड्डी, नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी कायदा व सुव्यवस्थाबाबतची माहिती दिली. या बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी आदी उपस्थित होते.
            शेवटी नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आभार मानले.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत बैठक
            नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे घेतली. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीत राजकीय पक्षांची भुमिका महत्वाची आहे. निवडणुका निर्भय मुक्त व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे , असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            यावेळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी आदी अधिकारी उपस्थित होते.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...