Sunday, December 24, 2017

राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा
नांदेड,दि.24 :- येथील जिल्‍हा पुरवठा कार्यालय व नांदेड तहसिल कार्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय ग्राहक दिन तहसिल कार्यालयात उत्साहात आज साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी ग्राहक पंचायतचे जिल्‍हाध्‍यक्ष पुरुषोत्तम अमिलकंठवार, श्रीमती जोशी, श्रीमती दयाळ, डॉ. भोसकर, बी. आर. लांडगे, पुरुषोत्तम जकाते, लक्ष्‍मीकांत मुळे, श्री. पांचाळ, काशीनाथ येजगे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी  अ.भा.ग्राहक पंचायत विभागाचे विभागीय संघटक आर. एस. कमटलवार यांनी ग्राहकांचे प्रबोधन केले. प्रांत उपाक्ष बा. दा. जोशी, डॉ. बालाजी कोमपलवार, विभागीय संघटक आर. एस. कमटलीवार यांनी मनोगत व्यक्त केले. अन्‍न व औषधी प्रशासन, प्रा‍देशिक परीवहन अधिकारी, वजने व मापे विभाग, निवडणूक, पुरवठा विभाग आणि गॅस व पेट्रोलपंप आदी विभागाचे स्टॉल्सचे उद्घाटन ग्राहक कल्‍याण सल्‍लागार समिती व राज्‍य अन्‍न आयोगाचे सदस्य संपत झळके यांचे हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक तहसिलदार किरण आंबेकर यांनी केली. सुत्रसंचालन श्रीमती एस. के. शाहाणे केले तर आभार नायब तहसिलदार विजय चव्‍हाण यांनी मानले. सुरुवातीला स्‍वामी विवेकानंद व बिंदू माधव जोशी यांचे प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्‍वलन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती एम. डी. वागीकर, लाठकर प्रेमानंद, सावते रामेश्‍वर, अंकुश हिवाळे, रविंद्र दोंतेवार आदींने केले. यावेळी विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार व ग्राहक बहुसंख्‍येने उपस्थित होते. 
000000


दुर्गम भागातील नागरिकांसाठी
आरोग्य शिबीर वरदान
- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
नांदेड,दि.24: राज्यातील दुर्गम भागातील जनसामान्यांपर्यंत आरोग्याच्या सर्व सेवा पोहचविण्यासाठी आरोग्य शिबीरामुळे मदत होत असून याप्रकारचे आरोग्य शिबीर हे नागरिकांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केले.    
            राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून किनवट येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण महाआरोग्य शिबिरात श्री. बागडे बोलत होते. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री गिरिश महाजन, शरदरावजी ठोले, माजी राज्यमंत्री डी. बी. पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, राम पाटील रातोळीकर, डॉ. अशोक पाटील सुर्यवंशी, धरमसिंग राठोड, संध्याताई राठोड आणि डॉ. संतुक हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
            श्री. बागडे म्हणाले की, अतीदुर्गम भागात आरोग्य सेवा उपलब्ध होत नसलेल्या नागरिकांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्व आरोग्य सेवा त्यांच्या पर्यंत पोहचविण्यास मदत होत आहे. आज याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विनामुल्य भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या पाहून या आरोग्य शिबिराची नोंद गिनीज बुकात होण्यासारखी आहे. अशा प्रकारच्या आरोग्य शिबीरामुळे नागरिकांना जीवनदान मिळत असल्याचेही ते म्हणाले.
या आरोग्य शिबिराच्या आयोजनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या अत्याधुनिक स्वरुपाच्या आरोग्य सेवा उपलब्ध होण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्यातील विविध भागातून आलेले नामांकित डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करत आहेत. तसेच सदर रुग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे घेऊन जाऊन त्यांच्यावर नामांकित रुग्णालयात विनामुल्य उपचार करण्यात येणार असल्याचेही श्री. बागडे यावेळी म्हणाले.  
           
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दूर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळत नाहीत अशा सामान्य गरीब नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबीर एक प्रकारचा आरोग्य महाकुंभ असल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टिने आज येथे ग्रामीण आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज या आरोग्य शिबिरात माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर आणि भोकर या भागातील गरजू दोन लाखाहून अधीक नागरिक लाभ घेण्यासाठी आले आहेत.  या नागरिकांसाठी अशा प्रकारचे आरोग्य शिबीर वरदान ठरत आहे. या आरोग्य शिबिरात येणाऱ्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करुन त्यावर उपचार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी ही शासन उचलणार आहे. शिबीरात येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत औषधी आणि जेवणांची सोय करण्यात आली आहेत. या सामाजिक कामासाठी अनेक दानशूर व्यक्ती, संघटना, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, शासनाचे विविध विभाग, धार्मिक संस्था आदींचे सहकार्य शिबीरासाठी मिळाले आहे. स्थानिक डॉक्टरांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांनी सहकार्य केल्याने आयोजन शक्य झाले आहे. या कार्यातून समाजसेवकांची नवी पिढी तयार होत असून, शिबीरात येणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी कितीही खर्च आला तरी प्रत्येक गरजू रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असेही श्री महाजन यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आरोग्य दुतचे विशेष कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक यांनी ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या संकल्पनेविषयी माहिती दिली. यावेळी वैद्यकीय शिक्षण, विशेष कार्यकारी अधिकारी आरोग्यदूत रामेश्वर नाईक, महाआरोग्य शिबीर समन्वयक डॉ. यशवंत पाटील तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विशेष कार्यकारी अधिकारी (आरोग्य दूत) रामेश्वर नाईक यांनी मानले.  

000000


जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारासाठी
26 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            नांदेड, दि. 19 :- महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाव्दारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाच्यावतीने गत वर्षीपासून राज्य, विभाग तसेच जिल्हा या तीन स्तरांवर पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या सन 2016-17 च्या पुरस्कारासाठी पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका विहित नमुन्यात   दि. 26 डिसेंबर 2017 पर्यंत तीन प्रतीत संबंधित स्तरावरील निवड समितीकडे कार्यालयीन दिवशी सादर करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर  यांनी पत्रकाव्दारे केले आहे.  
 जलयुक्त शिवार अभियानाबाबत जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करून पाणी प्रश्न सोडविण्यासात योगदान देणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो. गत वर्षीपासून या पुरस्काराला सुरूवात करण्यात आली असून यासंबंधीचा शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दि. 28 सप्टेंबर 2016  दि. 24 आक्टोबर 2016  9 ऑगस्ट 2017  रोजी निर्गमीत केले आहेत.
राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागीय स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावाने पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील साप्ताहिके व पाक्षिकांतील लिखाणाचा विचार केला जाईल. या पुरस्कारासाठी मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम असे गट करण्यात आले आहेत. दि. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल.
मुद्रित माध्यम गटासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतील. यामध्ये जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाला 31 हजार, व्दितीय क्रमांकास 21 हजार,तृतीय क्रमांकास 15 हजार, विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाला 50 हजार, व्दितीय क्रमांकाला 35 हजार, तृतीय क्रमांकाला 25 हजार तर राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाला 1 लाख,व्दितीय क्रमांकाला 71 हजार, तृतीय क्रमांकाला 51 हजार असे बक्षीस देण्यात येते, या स्पर्धेत विजेत्या सर्वांना स्मृतीचिन्ह देण्यात येते. तसेच इलेक्ट्रानिक माध्यमातील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्यांना राज्यस्तरावर तीन पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये प्रथम क्रमांकास 1 लाख रुपये, व्दितीय क्रमांकास 71 हजार तर तृतीय क्रमांकास 51 हजारांचे बक्षीस देण्यात येते. याच बरोबर प्रत्येक विजेत्यास स्मृती चिन्ह देण्यात येते.
मुद्रित माध्यम गटासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्त पत्रकार या पुरस्कार स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असतील. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. उमेदवारास ज्या स्तरावरील पारितोषिकासाठी अर्ज करावयाचा आहे, त्या स्तरावरील समितीच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येईल. मात्र कोणत्याही एका पारितोषिकासाठीच अर्ज करता येईल. एका वृत्तपत्राच्या एका आवृत्तीच्या एकाच पत्रकारास या स्पर्धेत भाग घेता येईल. एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी संबंधित जिल्ह्यातून प्रसिध्द होणारी वृत्तपत्रे, नियतकालिके यांमध्ये प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच विचार केला जाईल.
पुरस्कारासाठी मागील पाच वर्षाची कामगिरी, त्याची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. सलग दोन वर्षे एकाच पत्रकारास पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका स्विकारली जाणार नाही.
स्पर्धेत भाग घेत असलेल्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसोबत कोणाचेही शिफारस पत्र जोडण्याची आवश्यकता नाही. पुरस्कारासाठी पाठवायच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाची कागदपत्रे त्यांच्या दोन प्रतीसह पाठवावे लागतील. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका त्यासोबत पाठविलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे आवश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड केलेली कागदपत्रे, न वाचता येणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही, अशा प्रवेशिका रद्द समजल्या जातील.
पुरस्कार पात्रतेच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दि. 9 ऑगस्ट 2017 रोजी निर्गमीत केलेला शासन निर्णय पाहावा. प्रत्येक स्तरावरील पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तरी दि. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या बातम्यांच्या कात्रणांसह आपल्या प्रवेशिका दि. 26 डिसेंबर 2017 पूर्वी पोहोचतील या बेताने जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथे  पाठवाव्यात. उशीरा आलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही.
**** 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...