Sunday, December 24, 2017

दुर्गम भागातील नागरिकांसाठी
आरोग्य शिबीर वरदान
- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
नांदेड,दि.24: राज्यातील दुर्गम भागातील जनसामान्यांपर्यंत आरोग्याच्या सर्व सेवा पोहचविण्यासाठी आरोग्य शिबीरामुळे मदत होत असून याप्रकारचे आरोग्य शिबीर हे नागरिकांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केले.    
            राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून किनवट येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण महाआरोग्य शिबिरात श्री. बागडे बोलत होते. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री गिरिश महाजन, शरदरावजी ठोले, माजी राज्यमंत्री डी. बी. पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, राम पाटील रातोळीकर, डॉ. अशोक पाटील सुर्यवंशी, धरमसिंग राठोड, संध्याताई राठोड आणि डॉ. संतुक हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
            श्री. बागडे म्हणाले की, अतीदुर्गम भागात आरोग्य सेवा उपलब्ध होत नसलेल्या नागरिकांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्व आरोग्य सेवा त्यांच्या पर्यंत पोहचविण्यास मदत होत आहे. आज याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विनामुल्य भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या पाहून या आरोग्य शिबिराची नोंद गिनीज बुकात होण्यासारखी आहे. अशा प्रकारच्या आरोग्य शिबीरामुळे नागरिकांना जीवनदान मिळत असल्याचेही ते म्हणाले.
या आरोग्य शिबिराच्या आयोजनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या अत्याधुनिक स्वरुपाच्या आरोग्य सेवा उपलब्ध होण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्यातील विविध भागातून आलेले नामांकित डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करत आहेत. तसेच सदर रुग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे घेऊन जाऊन त्यांच्यावर नामांकित रुग्णालयात विनामुल्य उपचार करण्यात येणार असल्याचेही श्री. बागडे यावेळी म्हणाले.  
           
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दूर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळत नाहीत अशा सामान्य गरीब नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबीर एक प्रकारचा आरोग्य महाकुंभ असल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टिने आज येथे ग्रामीण आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज या आरोग्य शिबिरात माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर आणि भोकर या भागातील गरजू दोन लाखाहून अधीक नागरिक लाभ घेण्यासाठी आले आहेत.  या नागरिकांसाठी अशा प्रकारचे आरोग्य शिबीर वरदान ठरत आहे. या आरोग्य शिबिरात येणाऱ्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करुन त्यावर उपचार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी ही शासन उचलणार आहे. शिबीरात येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत औषधी आणि जेवणांची सोय करण्यात आली आहेत. या सामाजिक कामासाठी अनेक दानशूर व्यक्ती, संघटना, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, शासनाचे विविध विभाग, धार्मिक संस्था आदींचे सहकार्य शिबीरासाठी मिळाले आहे. स्थानिक डॉक्टरांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांनी सहकार्य केल्याने आयोजन शक्य झाले आहे. या कार्यातून समाजसेवकांची नवी पिढी तयार होत असून, शिबीरात येणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी कितीही खर्च आला तरी प्रत्येक गरजू रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असेही श्री महाजन यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आरोग्य दुतचे विशेष कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक यांनी ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या संकल्पनेविषयी माहिती दिली. यावेळी वैद्यकीय शिक्षण, विशेष कार्यकारी अधिकारी आरोग्यदूत रामेश्वर नाईक, महाआरोग्य शिबीर समन्वयक डॉ. यशवंत पाटील तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विशेष कार्यकारी अधिकारी (आरोग्य दूत) रामेश्वर नाईक यांनी मानले.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...