Monday, December 28, 2020

 

तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत हंगाम 2020-21 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आजपासून सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020-21 साठी नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, कंधार, लोहा याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आजपासून सुरु करण्यात आली आहे. या खरीप हंगामात तुरीचा हमीभाव प्रती क्विंटल 6 हजार रुपये आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील तुर या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक प्रत आदी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असेही आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.  

0000

 

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144 लागू

नांदेड (जिमाका) दि. 28 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 28 डिसेंबर 2020 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.  

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 28 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

0000

 

39 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू

34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सोमवार 28 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 39 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 26 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 909 अहवालापैकी 862 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 319 एवढी झाली असून यातील 20 हजार 263 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 285 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 13 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  रविवार 27 डिसेंबर रोजी तरोडा नाका नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर देगलूर नाका नांदेड येथील 65 वर्षीय पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 572 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, माहूर तालुक्यांतर्गत 2, औरंगाबाद 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, मुखेड कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 34 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 20, माहूर तालुक्यात 1, कंधार 1, नांदेड ग्रामीण 1, लोहा 2, मुखेड 1 असे एकुण 26 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, लोहा तालुक्यात 6, मुदखेड 1, कंधार 1 असे एकुण 13 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 285 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 19, मुखेड कोविड रुग्णालय 21, देगलूर कोविड रुग्णालय 8, हदगाव कोविड रुग्णालय 5,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 132, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 39, हैद्राबाद येथे  संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 17 आहेत.   

सोमवार 28 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 63 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 78 हजार 653

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 52 हजार 831

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 319

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 263

एकुण मृत्यू संख्या-572

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-869

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-285

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-13.           

000000

 

31 डिसेंबर व नववर्षासंदर्भात

नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- शासन निर्णयान्वये दि. 22 डिसेंबर 2020 ते   5 जानेवारी 2021 या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड  -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत 31 डिसेंबर 2020 व नुतन वर्षाचे स्वागत करावयाच्या संदर्भात खालीलप्रमाणे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

 

कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.

 

31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी नदी किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नांदेड शहरातील काही ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्यादृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्याठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहिल.  तसेच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.  

 

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, समुह भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहिले. परंतू आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही केली जाणार नाही, असे आदेश जिल्हदंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहेत.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...