Wednesday, December 20, 2023

 खाजगी वृध्दाश्रम चालकांनी शासनासोबत चर्चा करण्याचे आवाहन

 लातूर, दि.20 (विमाका) : वृध्दापकाळ चांगल्या प्रकारे घालवता यावा याकरिता शासनाने फेब्रुवारी 1963 मध्ये राज्यातील वृध्दांसाठी मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदान तत्वावर वृध्दाश्रम चालविण्याची  योजना सुरू केली. त्याचबरोबर खाजगी संस्थांमार्फत सुध्दा विनाअनुदानित वृध्दाश्रम कार्यरत आहेत. लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील खाजगी विनाअनुदानित वृध्दाश्रमांनी त्यांच्या विविध मागण्यांबाबत शासनासोबत चर्चा (सहविचार) करण्याच्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अ.र. देवसटवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.अधिक माहितीसाठी  02385-255378 या क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

वृत्त क्र. 876

त्या 38 बालकांचा श्रवणयंत्रणामुळे

ऐकु येण्यासह द्विगुणित झाला आत्मविश्वास  

 

·   राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत श्रवण यंत्राचे वाटप

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- बालवयातच असलेल्या आजाराचे तात्काळ निदान व्हावे व त्यावर तात्काळ उपचार करून बालकांचे आरोग्य निरोगी व्हावे, त्यांच्यात असलेले व्यंग दूर व्हावे, आजार दूर व्हावेत या उद्देशाने शासनातर्फे राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. नांदेड जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक बालकांना याचा लाभ व्हावा असे निर्देश जिल्हाधिकरी अभिजीत राऊत यांनी आरोग्य विभागाला दिले. जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 87 हजार 83 बालकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येऊन यातील विविध गंभीर आजार आढळलेल्या मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. या तपासणीत तब्बल 65 मुलांमध्ये कर्णदोष आढळला. त्यांची तपासणी केल्यानंतर 38 बालकांचे कर्णदोष कानातील मशीनच्या सहाय्याने कमी होण्यासाठी त्यांना आज श्रवणयंत्र बहाल करण्यात आले.  

 

नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात आज हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते हे श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांची उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्ह्यात एप्रिल 2023 पासून सप्टेंबर 2023 पर्यंत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी मोहिम आयोजित करण्यात आली होती. यात एकुण 4 हजार 92 अंगणवाड्यांपैकी जिल्ह्यातील 3 हजार 345 अंगणवाड्यांच्या माध्यमातून वय वर्षे 0 ते 6 वर्षे या वयोगटातील सुमारे 2 लाख 87 हजार 83 बालकांची तपासणी करण्यात आली. यात कर्णदोषाचे सुमारे 65 बालके समोर आली. त्यांच्यासाठी पुन्हा 9 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा रुग्णालयात कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी वेगळी तपासणी करण्यात आली. यात 38 बालके पात्र झाली. या बालकांना आता ही श्रवणयंत्रे मिळाल्यामुळे त्यांना ऐकू येण्यासह आत्मविश्वासही द्विगुणित झाला.

 

कोणत्याही बालकाला एखादा आजार असेल तर त्याला तात्काळ वैद्यकिय सुविधा व उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध असून आरोग्य विभागामार्फत ही योजना राबविल्या जाते. नांदेड जिल्ह्यातील 61 मुले ही हृदयरोगाशी संबंधित आढळून आली होती. या मुलांवर एप्रिल ते आजपर्यंत हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. याचबरोबर इतर आजाराच्या 186 बालकांवर वेगवेगळ्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर्षी तीन बालके कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी पात्र झाली असून त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्याच्यादृष्टिने कुटुंबासमवेत समुपदेशन केले जात आहे.  

00000



वृत्त क्र. 875

 अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध उपक्रमाचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- अल्पसंख्याक हक्क दिवस दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या उपक्रमातंर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतीय संविधान व अल्पसंख्याक समाजाचे हक्क तसेच आव्हाने या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम क्रमांक कु. वैभवी गजानन राजेगोरे, द्वितीय क्रमांक उध्दव धोंडिबा गायकवाड व तृतीय क्रमांक कु. रुबिना सादिक सयद यांना मिळाला. विजेत्यांना कवी, वक्ते पत्रकार रविंद्रसिंग मोदी याच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देण्यात आले. अल्पसंख्याक प्रशिक्षणार्थ्यांना विविध प्रकारच्या योजना व हक्क, सुविधाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास हरप्रितसिंग लागरी, कौशल्य विकास विभागाच्या सौ. पाटील, प्राचार्य एस.व्ही. सूर्यवंशी, गटनिदेशका के.टी. दासवाड, एस.जी.खडसे व प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी मोहन कलंबरकर यांनी परिश्रम घेतले.   

0000

वृत्त क्र. 874

 22 डिसेंबर रोजी उमरी व धर्माबाद येथे

 सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतीसाठी मेळावा

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतर्गत 17 ते 30 डिसेंबर 2023 हा कालावधी गतीमानता पंधरवडा म्हणून घोषित केला आहे. या पंधरवड्या निमित्त सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 22 डिसेंबर 2023 रोजी उमरी व धर्माबाद येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा सकाळी 10 वा. पंचायत समिती सभागृहउमरी व पंचायत समिती सभागृहधर्माबाद येथे आयोजित केला आहे. धर्माबाद व उमरी तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन असे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्व समावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट- 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला आहे. या योजनेत सन 2023-2024 मध्ये नांदेड जिल्हयास एकूण 900 युवक युवतींना वित्तीय संस्थांच्या माध्यमातून लाभ देण्याचे लक्षांक आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजूरी प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे/मंजूरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्राचे व बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे वेबसाईटवरुन डाउनलोड करुन घ्यावीत. तसेच आधार कार्डपॅन कार्डरहिवासी दाखलाशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रदोन फोटोव्यवसायाचा प्रकल्प अहवालजातीचा दाखलाव्यवसायनुंषिक इतर परवाने इ. कागदपत्रासह या मेळाव्यास उपस्थित राहावे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी या योजनेच्या https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळास भेट द्यावीअसे जिल्हा उद्योग केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...