Saturday, November 16, 2024

वृत्त क्र. 1106

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक 2024

मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद

नांदेड दि. १६ नोव्हेंबर : लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 20 नोंव्हेंबर 2024 रोजी मतदान होत असून त्याची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थळी होणार आहे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व  निर्भयपणे व शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 142 (1) तरतुदीनुसार तसेच निवडणूक आयोगाच्या विविध निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ अनुज्ञप्ती मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  दिले आहेत.

निवडणूकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी नांदेड जिल्ह्यात मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यत 18 नोव्हेंबर 2024  सायंकाळी 6 वाजेपासून ते 20 नोंव्हेबर 2024 रोजी सांयकाळी 6 वाजेपर्यत किंवा मतदान संपेपर्यत तसेच मतमोजणीच्या दिवशी 23 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण दिवस मतमोजणी प्रक्रीया संपेपर्यत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अनुज्ञपती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे  आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई  करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
0000

 वृत्त क्र. 1105

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान जनजागृतीमध्ये दिव्यांगांचा पुढाकार

नांदेड, 16 नोव्हेंबर- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा मुख्य उद्देश लोकशाही बळकट करणे तसे मतदारांचा सहभाग वाढविणे हा आहे. विशेषतः दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

महापालिकेच्या स्पीप टीमच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना गृहभेटी देऊन त्यांना मतदान प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून, आज राजेश हाडोळे या बहुविकलांग नवयुवा मतदारास त्यांच्या घरी भेट देण्यात आली. दिव्यांग मतदारांच्या सहभागातून समाजात सकारात्मक संदेश व मतदानाचे पटवून देण्याचा उद्देश होता.

या गृहभेटीत स्पीप टीमचे कर्मचारी संजय ढवळे व संदीप लबडे यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांनीही दिव्यांग मतदारांच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे.

0000



 वृत्त क्र. 1104

निर्मिती नर्सिंग कॉलेज व गुरूकुल स्कूलतर्फे मतदानाचा जागर 

 87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाचा उपक्रम

नांदेड , दि. १६ नोव्हेंबर- निर्मिती नर्सिंग कॉलेज तसेच गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षातर्फे मतदानाचा जागर उपक्रम आज राबविण्यात आला.

 नांदेड दक्षिण विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीसाठी स्विप कक्षामार्फत आज गुरुकुल इंग्लिश स्कूल वजीराबाद येथे मतदान जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचा आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस यांना लाभ झाला. निर्मिती नर्सिंग स्कुल ,नांदेड, मुक्ता साळवे बहुउद्देशिय सामाजिक संस्था नांदेड, तसेच गुरूकुल ईंग्लीश मिडियम स्कूल ,वजिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी स्वीप कक्षाच्या कविता जोशी यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी निर्मिती नर्सिंग स्कूलच्या सौ. उज्वला भावसार,  नितिका बेंद्रे,  अरुणा लामतुरे, उमा मद्दे, गुरूकुलच्या संचालिका वैशाली कुलकर्णी, सचिव प्रकाश कुलकर्णी,सारिका आचमे यांचे बहुमोल योगदान लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार संजय भालके यांनी मानले.

०००००








वृत्त क्र. 1103

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी न्यायमुर्ती भूषण गवई 

नांदेड दि. 16 नोव्हेंबर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमुर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची निवड करण्यात आली आहे. 

अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी.एम. जज यांनी दिली. 

मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमुर्ती भूषण गवई यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले आहे, तसे राजपत्र देखील प्रसिध्द करण्यात आले आहे. विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 चे कलम 3 च्या 1 उपकलम (2) खंड (बी) द्वारे असलेल्या अधिकारानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

पुर्वीचे कार्यकारी अध्यक्ष, संजीव खन्ना यांची सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. नियमानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या ज्येष्ठ न्यायमुर्तीची या पदावर नियुक्ती केली जाते. सर्वाना विशेषत: उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना सुलभ आणि मोफत कायदेशीर मदत देण्याचे महत्वाचे काम या प्राधिकरणाला करावे लागते. देशातील कोणताही नागरिक आर्थिक किंवा सामाजिक कारणावरुन न्यायापासून वंचित राहणार नाही याची दक्षता या आयोगाकडून घेतली जाते. 

00000



 वृत्त क्र. 1102

रविवारी लोकसभा पोट निवडणूक उमेदवारांच्या खर्चाची तृतीय तपासणी

नांदेड, दि. 16 नोव्हेंबर :- लोकसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची  निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, नांदेड येथे रविवार 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत होणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.

या तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी असे निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे कक्ष प्रमुख डॉ. जनार्दन पक्वान्ने यांनी कळविले आहे.

00000

वृत्त क्र. 1101

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड दि. 16 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यात 18 नोव्हेंबर 2024 चे सकाळी  6 वाजेपासून ते 2 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 18 नोव्हेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 2 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्र. 1100

राजकीय जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी उद्याची शेवटची मुदत 

मंगळवार, बुधवारच्या जाहिरातींसाठी दोन दिवस आधी अर्ज करा

शेवटच्या 48 तासात फक्त प्रिंट माध्यमात जाहिरात देता येईल

शेवटच्या 48 तासात इलेक्ट्रॉनिक्स ,सोशल मीडियावर  प्रसिद्धी नाही

नांदेड, दि. १६ नोव्हेंबर : लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या मतदानाच्या एक दिवस आधी मंगळवार (दि.19) व मतदानाच्या दिवशी बुधवार (दि. 20) रोजी मुद्रित माध्यमामध्ये प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातीसाठी शनिवार (दि.16) व रविवार (दि.17) रोजी राज्य, जिल्हा स्तरावरील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करुन घेणे आवश्यक असल्याचे आवाहान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत  यांनी केले आहे. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहितेचे पालन करताना भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुका-2024 मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी मुद्रित माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. जाहिरातीमध्ये कोणते महापुरुषांचा किंवा आक्षेपार्ह चिन्हांचा, भाषेचा वापर करू नये. जाहिरात संहितेचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मीडियामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील जिल्हा माध्यम व प्रमाणिकरण संनियंत्रण समिती (एमसीएमसी)कडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

तसेच सोशल मीडिया, यू- ट्यूबर्स यांना प्रचाराच्या दिवसापासून मतदानापर्यंतच्या सर्व जाहिराती, मुलाखती आदींच्या प्रसारणासाठी प्रत्येक बाबींचे प्रमाणिकरण बंधनकारक आहे.

जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार 19 व 20 नोव्हेंबरला वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व-प्रमाणिकरणासाठी समितीकडे दोन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. प्रमाणिकरणाचे अर्ज मिडिया कक्षात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

सोशल मीडिया व यू-ट्यूबर्सना शेवटच्या 48 तासात प्रचार प्रसारास बंदी आहे. 48 तासापूर्वी दर दिवशी प्रमाणिकरण बंधनकारक आहे.

उमेदवारांची जाहिरात, मुलाखत तसेच निवडणूकसंदर्भातील कुण्या एका उमेदवारांबाबत विश्लेषण, त्यांची विधाने, चलचित्र आदींसाठी सोशल मीडिया, यू-ट्यूबर्स आदींना प्रत्येक बाबींचे दरदिवशी प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्रात प्रकाशित जाहिरातींसह अन्य बाबीदेखील अपलोड करण्यासाठी त्यांना परवानगी अर्थात प्रमाणिकरण करावे लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांप्रमाणेच प्रिंट माध्यमांमध्ये जाहिरात देताना जाहिरात संहितेचे पालन करण्यात यावे. कोणते महापुरुषांचे फोटो जाहिरातींमध्ये वापरू नये, तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शेवटच्या ४८ तासात अन्य कोणत्याही माध्यमांना जाहिराती देता येणार नाही. केवळ प्रिंट माध्यमांना ही परवानगी आहे, याचीही नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

वृत्त क्र. 1099

मतदात्यांना सिटी सिम्पनी हॉटेल तर्फे 15 टक्के सूट 

नांदेड, १६ नोव्हेंबर :- शहरातील प्रसिद्ध सीटी सिंफनी हॉटेलमध्ये मतदात्यांना प्रेरित करण्यासाठी 15 टक्के सूट जाहीर केली आहे . मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर हॉटेलच्या निवास व्यवस्थेवर आणि भोजन व्यवस्थेवर ही सुविधा जाहीर करण्यात आली आहे. 

नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शहरातील हॉटेल व्यवसायिकांची बैठक घेऊन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी त्यांना सवलत देण्याबाबत आवाहन केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील काही महत्त्वाच्या हॉटेल व्यवसायिकांनी सवलत देण्याबाबत संमती दर्शविली होती .त्यामध्ये काही हॉटेल व्यवसायिकांनी यापूर्वीच ही सवलत जाहीर केली होती. आता यामध्ये शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आणि प्रसिद्ध असलेले सिटी सिंफनी हॉटेल ने ही मतदात्यांसाठी ही सवलत जाहीर केली आहे .मतदान झाल्यानंतर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आणि सोबत पुरावा म्हणून बोटाला लावलेली शाई दाखवल्यानंतर एकूण बिलावर 15 टक्के सूट देण्यात येणार आहे असे या हॉटेलचे व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

०००००

वृत्त क्र. 1098

‘वाढवू तिरंग्याची शान, करू राष्ट्रासाठी मतदान’, - बाईक रॅलीद्वारे मतदारांमध्ये जागृती...

रॅलीत महापालिका आयुक्त यांचा सहभाग..नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड दि १६ नोव्हेंबर : ‘वाढवू तिरंग्याची शान.. करू राष्ट्रासाठी मतदान’, 'मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो', 'वोट करेगा वोट करेगा.. सारा नांदेड वोट करेगा' अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या सायकल व मोटरसायकल रॅलीला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीमध्ये जवळपास ५० सायकल व ५०० मोटरसायकल बाईक सहभागी होत्या.

मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी, लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरिता निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हास्तरीय स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतून ‘स्वीप’अंतर्गत भव्य सायकल व मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

या जनजागृती रॅलीस महानगरपालिकेचे आयुक्त तथा जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचे अतिरिक्त नोडल अधिकारी डॉ.महेशकुमार डोईफोडे, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, संजय जाधव, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी प्राथमिक सविता बिरगे, शिक्षणाधिकारी योजना दिलीपकुमार बनसोडे, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा फरहतउल्ला बेग, सदाशिव पतंगे, ८७-नांदेड दक्षिण मतदारसंघ स्वीप कक्षाचे प्रमुख रुस्तुम आडे, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासह नांदेड लॉयन्स क्लब, रोटरी क्लब व नांदेड सायकलिस्ट ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.

जुना मोंढा टॉवर परिसरातून महापालिका आयुक्तांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅली ची सुरुवात झाली. पुढे महावीर चौक - वजीराबाद मुथा चौक - कला मंदिर - शिवाजीनगर - आयटीआय कॉर्नर - श्रीनगर - वर्कशॉप कॉर्नर मार्गे - भाग्यनगर - आनंदनगर - नागार्जुना हॉटेल कॉर्नर - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक - यात्री निवास - चिखलवाडी कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचून सर्व सहभागी व्यक्तींनी मतदानाची शपथ घेतली व रॅलीचा समारोप झाला. 

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आयोजित रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीत अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध मान्यवर नागरिक, विद्यार्थी, महिला व सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी मतदानाबाबत विविध फलक व घोषणाद्वारे जनजागृती करण्यात आली. 

या रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे प्रलोभ कुलकर्णी, महानगरपालिकेचे वरिष्ठ सहाय्यक साईराज मुदिराज, स्विप कक्षाचे सुनील मुत्तेपवार, माणिक भोसले, सारिका आचमे यांनी परिश्रम घेतले.

00000












वृत्त क्र. 1106 लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक 2024 मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद नांदेड दि.  १६  नोव्हेंबर : लोकसभा पोट नि...