Saturday, November 16, 2024

वृत्त क्र. 1100

राजकीय जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी उद्याची शेवटची मुदत 

मंगळवार, बुधवारच्या जाहिरातींसाठी दोन दिवस आधी अर्ज करा

शेवटच्या 48 तासात फक्त प्रिंट माध्यमात जाहिरात देता येईल

शेवटच्या 48 तासात इलेक्ट्रॉनिक्स ,सोशल मीडियावर  प्रसिद्धी नाही

नांदेड, दि. १६ नोव्हेंबर : लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या मतदानाच्या एक दिवस आधी मंगळवार (दि.19) व मतदानाच्या दिवशी बुधवार (दि. 20) रोजी मुद्रित माध्यमामध्ये प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातीसाठी शनिवार (दि.16) व रविवार (दि.17) रोजी राज्य, जिल्हा स्तरावरील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करुन घेणे आवश्यक असल्याचे आवाहान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत  यांनी केले आहे. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहितेचे पालन करताना भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुका-2024 मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी मुद्रित माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. जाहिरातीमध्ये कोणते महापुरुषांचा किंवा आक्षेपार्ह चिन्हांचा, भाषेचा वापर करू नये. जाहिरात संहितेचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मीडियामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील जिल्हा माध्यम व प्रमाणिकरण संनियंत्रण समिती (एमसीएमसी)कडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

तसेच सोशल मीडिया, यू- ट्यूबर्स यांना प्रचाराच्या दिवसापासून मतदानापर्यंतच्या सर्व जाहिराती, मुलाखती आदींच्या प्रसारणासाठी प्रत्येक बाबींचे प्रमाणिकरण बंधनकारक आहे.

जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार 19 व 20 नोव्हेंबरला वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व-प्रमाणिकरणासाठी समितीकडे दोन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. प्रमाणिकरणाचे अर्ज मिडिया कक्षात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

सोशल मीडिया व यू-ट्यूबर्सना शेवटच्या 48 तासात प्रचार प्रसारास बंदी आहे. 48 तासापूर्वी दर दिवशी प्रमाणिकरण बंधनकारक आहे.

उमेदवारांची जाहिरात, मुलाखत तसेच निवडणूकसंदर्भातील कुण्या एका उमेदवारांबाबत विश्लेषण, त्यांची विधाने, चलचित्र आदींसाठी सोशल मीडिया, यू-ट्यूबर्स आदींना प्रत्येक बाबींचे दरदिवशी प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्रात प्रकाशित जाहिरातींसह अन्य बाबीदेखील अपलोड करण्यासाठी त्यांना परवानगी अर्थात प्रमाणिकरण करावे लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांप्रमाणेच प्रिंट माध्यमांमध्ये जाहिरात देताना जाहिरात संहितेचे पालन करण्यात यावे. कोणते महापुरुषांचे फोटो जाहिरातींमध्ये वापरू नये, तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शेवटच्या ४८ तासात अन्य कोणत्याही माध्यमांना जाहिराती देता येणार नाही. केवळ प्रिंट माध्यमांना ही परवानगी आहे, याचीही नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1210 लोकसभा उमेदवारांची आज खर्चाच्या पुनर्मेमेळाची बैठक नांदेड दि. 18 डिसेंबर :- लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवार...