Monday, May 6, 2024

 वृत्त क्र. 409 

वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह,

ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

 

नांदेड दि. मे :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 6 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 6  7 मे 2024 हे दोन दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 6 व 7 मे 2024 ह्या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

 

या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

000

 वृत्त क्र. 408

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत  


नांदेड दि. मे :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी मे 2024 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवार 7 मे 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 






 लातूर लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या सात मे रोजी होत आहे. लातूर लोकसभा क्षेत्रामध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहे.आज पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रांवर सकाळी रवाना झाल्या. या संदर्भातील काही छायाचित्र व चित्रफिती माध्यम प्रतिनिधींच्या संदर्भासाठी..



















 लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 - निवडणुकीच्या कर्तव्यावर, मतदान पथकातील अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा संदेश...



महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...