Saturday, April 21, 2018


कुलर वापरा पण जरा जपून

 

निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा

नांदेड, दि. 21:- उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घर, दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कुलरचा वापर करण्यात येतो. कुलरच्या माध्यमातून विजेचा धक्का बसल्यामुळे दरवर्षी अनेक दुर्घटना घडतात. त्या टाळण्यासाठी नागरीकांनी कुलर वापरताना योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे. निष्काळजीपणा जीवघेणाही ठरू शकतो त्यामुळे कुलर वापरताना काळजीपुर्वक वापर करावा असे आवाहन महावितरणच्या नांदेड परिमंडलाच्यावतीने करण्यात येत आहे. 

कुलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करावा. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कुलरचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा म्हणजे कुलरचा विजेशी काहीही संबंध राहणार नाही. पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून बाजूला जमिनीवर पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पाणी भरल्यानंतर प्लग पिन लावून स्वीच चालू करावे. त्यानंतर कुलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये. कुलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे. अर्थिंगची तपासणी करून घ्यावी. अर्थिंग व्यवस्थित असल्यास लिकेज करंट येत नाही. कुलरच्या आतील वायर पाण्यामध्ये बुडणार नाही याची काळजी घ्यावी. पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून नंतरच कुलरला हात लावावा. ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करू नये. 

लहान मुलांना नेहमी कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे आणि ती कुलरजवळ खेळणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरू नये यासाठी कुलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी; जेणेकरून कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरल्यास त्याचा धक्का बसणार नाही. कुलरमधील पाण्याचा पंप ५ मिनिटे सुरू आणि १० मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा. यामुळे विजेचीही मोठ्या प्रमाणावर बचत शक्य आहे. 

कुलरमधील माहिती नसल्यास कनेक्शन बदल करू नये. कुलरची दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग काढून नंतरच काम करावे. कुलरच्या प्लगला जोडलेली वायर खंडित वा जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावण्यात यावी. अनेकदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. मात्र चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे. कुलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी. कुलर पंप अधूनमधून बंद करावा. घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे. अशा प्रकारे कुलरचा वापर करताना काही पथ्ये पाळल्यास आणि काही बाबी टाळल्यास या तापमानामध्ये कुलरचा गारवा सुरक्षितपणे अनुभवता येईल.

****

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नांदेड स्थलांतरित

नांदेड,दि.21:- जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नांदेड हे कार्यालय सद्या उमरेकर बिल्डींग येथून दिनांक 23 एप्रिल, 2018 पासून श्रीमती बसंतीदेवी दायमा, दायमा निवास, विसावानगर, नांदेड येथे स्थलांतरित होत आहे. तरी सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी , असे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नांदेड यांनी कळविले आहे.

****

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार  सन 2017 साठी

प्रस्ताव  सादर  करावेत

---- जिल्हा क्रिडा अधिकारी

 

नांदेड,दि.21:- केंद्रशासनाच्या वतीने युवक कल्याण योजने अंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन 2017 करिता नामांकनाचे प्रस्ताव दिनांक 31 एप्रिल,2018 पर्यंत पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे.

            तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन 2017 करिता नामांकनाचे प्रस्ताव सादर करणा-या खेळाडूची खालील नमूद केलेली कामगिरी त्याबाबत आवश्यक ती सर्व माहिती, कागदापत्रे, प्रमाणपत्रे, कात्रणे इत्यादी सोबत जोडणे अत्यावश्यक आहे.

नामांकन सादर करणा-या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षामधील म्हणजे सन 2014, 2015, 2016 मधील असणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम हे जमिनीवरील, मुद्रावरील हवेमधील असणे आवश्यक आहे.खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक असून, त्याबाबतची माहिती दोन ते तीन पानांमध्ये हिंदी किंवा इंग्रजी या भाषेमध्ये देणे गरजेचे आहे. (सदर साहसी पुरस्कार हे केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजने अंतर्गत येत असल्याकारणाने हिंदी किंवा इंग्रजी या भाषेमध्ये आवश्यक) .

            तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन 2017 नामांकनाचे प्रस्ताव/ अर्ज दिनांक 31 एप्रिल, 2018 पूर्वी केंद्रशासनास सादर करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानूसार सदरील परीपुर्ण प्रस्ताव केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेची पुर्तता करुन दिनांक 22 ते 27 एप्रिल,2018 या कालावधीत विहित नमुन्यातील फॉर्म घेवून जावे परीपुर्ण प्रस्ताव सदर कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, स्टेडीयम परीसर,नांदेड येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे असे आवाहन श्री.चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांनी केले आहे.

****  

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...