Thursday, January 14, 2021

 

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी

20 जानेवारीला बैठकीचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यातील माजी सैनिकांचे व सेवारत सैनिकांचे कुटुंबातील सदस्यांचे अडीअडचणी सोडविण्यासाठी व विविध विभागात प्रलंबित असलेल्या प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार 20 जानेवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11.30 वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माजी सैनिकांनी त्यांच्याकडील प्रलंबित अर्जांची  एक  प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे सोमवार 18 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावी, असे आवाहन नांदेडचे  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर  यांनी  केले आहे. या प्रलंबित प्रकरणांचा वेळेत व तातडीने निपटारा करण्यात यावा यासाठी याबैठकीचे आयोजन प्रत्येक महिन्याच्‍या तिसऱ्या बुधवारी करण्यात येते.                   00000

25 कोरोना बाधितांची भर तर  

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 14 :- गुरुवार 14 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 25 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 859 अहवालापैकी 827 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 984 एवढी झाली असून यातील 20 हजार 853 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 352 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 12 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 578 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 18, देगलूर कोविड रुग्णालय 2, मुखेड कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, माहूर तालुक्यांतर्गत 6, हदगाव कोविड रुग्णालय 2, नायगाव तालुक्यांतर्गत 2, खाजगी रुग्णालय 4 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.85 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 8, किनवट तालुक्यात 1, उमरखेड 1, हदगाव 1, मुदखेड 1 असे एकुण 12 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 3, बिलोली तालुक्यात 2, माहूर 1, नायगाव 1, किनवट 4, उमरी 2 असे एकुण 13 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 352 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 27, मुखेड कोविड रुग्णालय 12, हदगाव कोविड रुग्णालय 5, महसूल कोविड केअर सेंटर 28, किनवट कोविड रुग्णालय 4, देगलूर कोविड रुग्णालय 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 130, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 53, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, खाजगी रुग्णालय 38 आहेत.   

गुरुवार 14 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 164, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 66 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 93 हजार 646

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 67 हजार 502

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 984

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 853

एकुण मृत्यू संख्या-578

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.85 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-398

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-352

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-12.           

00000


 

भवानी चौक वाडी बु ते लिंबगावचा रस्ता

सकाळी 6 ते 9 यावेळेत जडवाहनास प्रतिबंध

नांदेड, (जिमाका)दि. 14 :- भवानी चौक (निळा जंक्शन) वाडी बु. नांदेड पासून ते लिंबगाव पर्यंतचा रस्ता 15 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत सकाळी 6 ते 9 यावेळेत सायकलींगसाठी अत्यावश्यक सेवेची वाहने, प्रवासी वाहने, शासकिय वाहने वगळता इतर सर्व चारचाकी व जडवाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्गमीत केले आहेत. 

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टिने सायकलींगसाठी हा रस्ता 15 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2021 या 29 दिवसासाठी सकाळी 6 ते 9 या कालावधीत अत्यावश्यक सेवेची वाहने, शासकीय प्रवासी वाहने व शासकीय वाहने वगळता इतर सर्व चारचाकी व जडवाहनास प्रतिबंधीत केला आहे. या मार्गावरुन केवळ हलकी वाहने (एलएमव्ही) वगळता उर्वरित सर्व जडवाहनास पुर्णपणे प्रतिबंध करण्यात आले आहे. प्रतिबंधीत करण्यात आलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्ग लिंबगाव-नाळेश्वर-वाघी-नांदेड असा राहिल. या कालावधीत पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करावे. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

 

सण-उत्सवात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत

नांदेड (जिमाका) दि. 14 :- ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2021 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे. 

या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 173 / 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन 1 मे, दिवाळी (लक्ष्मीपूजन), ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबरसाठी एक दिवस. तर गणपती उत्सव 2 दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव 3 दिवस (पहिला दिवस, अष्टमी व नवमी ), उर्वरित 3 दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल.

 

या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील.

 

ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना आदेश 13 जानेवारी 2021 रोजीपासून नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे, असेही अधिसूचनेत नमुद केले आहे.

0000

 

मतदान व मतमोजणी क्षेत्रातील

भरणारे आठवडी बाजार राहतील बंद   

नांदेड (जिमाका) दि. 14 :-जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी निवडणूक हद्दीत व मतमोजणीच्या दिवशी सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी असलेल्या गावी / ठिकाणी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्टर, 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. 

अशा गाव / ठिकाणांचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशीचे आठवडी बाजार शनिवार 16 जानेवारी 2021 रोजी तर मतमोजणीच्या दविशी मतमोजणी असलेल्या गावी / ठिकाणाचे आठवडी बाजार मंगळवार 19 जानेवारी 2021 रोजी भरविण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.

0000

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी

नदीपात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 14 :-मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बुधवार 20 जानेवारी 2021 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जानेवारी 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 फेब्रुवारी 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

0000

 

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी

आधार सिडींग, मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी

नांदेड (जिमाका) दि. 14 :-जिल्ह्यात रास्‍तभाव दुकानदार यांच्‍यामार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्‍यांनी ई-पॉसवर ज्‍या सदस्‍यांच्‍या नावासमोर आधार नंबर दिसत नाही अशा सदस्‍यांनी रविवार 31 जानेवारी 2021 पर्यंत ई-पॉस मशीनद्वारे eKYC करुन आधार सिडींग व मोबाईल क्रमांकाची नोंदणी रास्‍तभाव दुकानदारामार्फत करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्‍हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे. 

राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्‍यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग शंभर टक्के पूर्ण करण्‍याच्‍या केंद्र शासनाच्‍या सूचना आहेत. राज्य शासनाच्या अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आधार सिडींग करण्याबाबत कळविले आहे. सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत अधिक पारदर्शकता येण्‍यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्‍याचे आधार व मोबाईल सिडींग सुधारणे आवश्‍यक आहे. रास्‍तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणामधील eKYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्‍यात यावे. यासाठी रविवार 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्‍येक रेशनकार्डमध्‍ये लाभार्थ्‍यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्‍याचे उद्दीष्‍ट दिले आहे. 

धान्‍याचे मासिक वाटप करतांना ई-पॉस उपकरणाद्वारे रास्‍तभाव दुकानदार यांच्‍यामार्फत ज्‍या शिधापत्रिकेतील लाभार्थ्‍यांच्‍या नावासमोर आधार नंबर दिसत नाही अशा लाभार्थ्‍यांची ई-पॉसद्वारे eKYC करून आधार सिडिंग व मोबाईल क्रमांकाचे सिडींग ही रविवार 31 जानेवारी पर्यंत करावी. या मुदतीत आधार सिडींग न झालेल्‍या लाभार्थ्‍यांचे अनुज्ञेय धान्‍य पुढील महिन्‍यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्‍यात येईल. सर्व लाभार्थ्‍यांनी आपले eKYC करून आधार सिडिंग व मोबाईल क्रमांकाचे सिडींग ही 31 जानेवारी पर्यंत करावे, असेही आवाहन केले आहे.

0000

 

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील

कामगार / कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे त्याक्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  सर्व उद्योग व्यवसाय आस्थापना चालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी सुट्टी / 2 तासाची सवलत देण्यात यावी. कर्मचाऱ्याच्या वेतनातून वेतन कपात केल्यास ते जिल्ह्यातील जिल्हा कामगार कार्यालयास तक्रार नोंदवू शकतात. खाजगी क्षेत्रातील आस्थापनामधील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी मतदान करावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन अ. सय्यद यांनी केले. 

राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशाद्वारे व शासन परिपत्रकातील परिशिष्ट १ व परिशिष्ट २ नुसार राज्यातील ३४ जिल्ह्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकासाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरीत सर्व जिल्ह्यात शुक्रवार दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम समाविष्ट आहे. शासनाने या मतदानासाठी भरपगारी सुट्टी कामगारांसाठी जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी सर्व खाजगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स व्यापारी संकुल इत्यादी ठिकाणी काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपागारी सुट्टी द्यावी व त्यांच्या वेतानातून वेतन कपात करण्यात येवू नये तसेच सवलतीस पात्र असलेल्या आस्थापनांना ही सवलत देणे बंधनकारक आहे. 

राज्य शासनाच्या १३ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील (उदा. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, ओद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी) तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीतकमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांना संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे निर्देश दिले आहेत.

000000

 

जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतींच्या

निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकांची जिल्हा प्रशासनातर्फे संपुर्ण तयारी झाली असून याअनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. या निवडणुका खेळीमेळीच्या आणि सौहार्दपुर्ण वातावरणात व्हाव्यात यासाठी त्यांनी आवाहन केले असून मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे असे सांगितले. 

सोळा तालुक्यातील एकूण 1 हजार 13 ग्रामपंचायतीसाठी निवडणूका कार्यक्रम जाहिर झाला होता. यापैकी 106 ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने 907 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 2 हजार 853 मतदार केंद्र तयार करण्यात आले असून सुमारे 11 हजार 412 शासकीय कर्मचारी व निवडणूक अधिकारी यासाठी जबाबदारी पार पाडतील. जिल्ह्यात एकूण 13 लाख 21 हजार 296 मतदार या निवडणूकीत आपला हक्क बजावणार असून यात 6 लाख 32 हजार 138 महिला मतदार तर 6 लाख 89 हजार 146 पुरुष मतदार मतदान करणार आहेत.

0000

जिल्ह्यातील 17 हजार 19 नोंदणी असलेल्या

हेल्थ वर्करना कोरोना लसीची उपलब्धता

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

जिल्ह्यात कोरोना लसीचे स्वागत

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :-कोरोना प्रादुर्भावातून नवसंजीवन देणाऱ्या कोविड लसीची उपलब्धता नांदेड जिल्ह्यासाठी झाली असून लसीकरणाच्या पहिल्या फेरीत सुमारे 17 हजार 19 हेल्थ वर्करना आपण हा डोस येत्या 16 तारखेपासून देत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. आज जिल्हा परिषदेच्या औषध भांडार येथे या लसी शितकरणाच्या पेटीमध्ये अत्यंत सुरक्षितरित्या पोहचल्या. या लसी स्विकारण्यासाठी आर्वजून आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक व इतर अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

आरोग्य विभागाच्या संपूर्ण टिमने कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात अंत्यंत शर्थीचे प्रयत्न करुन कोरोना बाधितावर उपचार केले. समाजाचे स्वास्थ सुदृढ ठेवण्यात ज्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी योगदान दिले त्यांच्यापासून लसीकरणाची ही मोहिम टप्याटप्याने सर्व लोकापर्यंत उपलब्ध होईल असे डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यासाठी सुमारे 17 हजार लसी उपलब्ध झाल्या असून एका लसीच्या मात्रेमध्ये जवळपास 10 डोस उपलब्ध होऊ शकतात. हे लक्षात घेता लसीची कसलीही कमतरता जिल्ह्यासाठी कमी न पडता सहज उपलब्ध होईल यासाठी जिल्हा शासकीय यंत्रणा सिद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

00000




  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...