Thursday, July 1, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित

तर 20 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 622 अहवालापैकी  7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 247 एवढी झाली असून यातील 88 हजार 632 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 117 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, नांदेड ग्रामीण 1 असे एकूण 7 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 20 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन, गृह विलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 7, खाजगी रुग्णालयातील 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 117 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  3, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 55, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 39, खाजगी रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 126, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 138 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 8 हजार 997

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 6 हजार 86

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 247

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 632

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.13 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-30

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-82

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-117

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2                       

00000

 

18 वर्षावरील सर्व व्यक्तींना लसीचे डोस उपलब्ध

जिल्ह्यातील 37 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 37 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 1 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 19 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), रेल्वे हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर शहरी दवाखाना हैदरबाग, सिडको या केंद्रावर कोव्हॅसीन लसीचे प्रत्येकी 80 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, मांडवी या 5 केंद्रावर कोविशील्ड लस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

ग्रामीण भागात हदगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव व बिलोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सगरोळी येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 30 जून पर्यंत एकुण 6 लाख 13 हजार 254 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 1 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 92 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 55 हजार 660 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 48 हजार 590 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

डिईसी, अलबेडाझॉल गोळ्याची एक मात्रा घ्यावी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

1 ते 15 जुलै दरम्यान हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत डीईसी + अलबेंडाझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य खात्यातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, अशा स्वयंसेविका व इतर स्वयंसेवक 1 ते 15 जुलै 2021 दरम्यान आपल्या घरी येणार आहेत. नागरिकांनी या गोळ्या जेवन करुन कर्मचाऱ्याच्या समक्ष घेऊन शासनाच्या मोहिमेस प्रतिसाद दयावा व हत्तीरोगापासून मुक्त रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्हा समन्वय समिती (हत्तीरोग) ची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

 

जिल्ह्यातील आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना डीईसी व अलबेंडाझॉल गोळ्याची एक मात्रा कर्मचाऱ्यांच्या समक्ष खाऊ घालण्याची कार्यवाही करावी. समिती सदस्य जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) व शिक्षणाधिकारी यांना अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य खात्यास सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्ह्यातील हत्तीरोग परिस्थितीचा आढावा व हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा आढावा डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी घेतला.

 

हत्तीरोग हा दिर्घ मुदतीचा व व्यक्तीची एकुणच शारिरीक व मानसिक क्षमता कमी करणारा आजार आहे. हा आजार वुचेरेरिया बॅक्रॉप्टाय व ब्रुगीया मलायी या नावाच्या कृमीमुळे होतो. याचा प्रसार क्युलेक्स क्विकिफॅसिएटस् या डासाच्या मादीपासुन होतो. हत्तीरोग झाल्यास रोग्यास अपंगत्व विद्रुपता येते. हाता-पायावर सुज, जननेंद्रीयावर व इतर अवयवावर कायमची सुज येऊन विद्रुपता येते. त्यामुळे रुग्णास सामाजिक उपेक्षेस तोंड द्यावे लागते, आर्थिक नुकसान होते, मुला-मुलींचे लग्न होत नाहीत त्यामुळे रुग्ण मनसिक दबावाखाली वावरतो. तसेच जन्मभर दु:ख वेदना सहन कराव्या लागतात.

 

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात 15 ते 31 ऑगस्ट 2020 हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम अहवालानुसार अंडवृद्धीचे 746 व हत्तीपायाचे 2 हजार 553 असे एकत्रित 3 हजार 299 हत्तीरोगाचे बाह्य लक्षणे युक्त रुग्ण आहेत. आपला जिल्हा हत्तीरोगासाठी जोखीमग्रस्त असल्याने तसेच आपल्या जिल्ह्यात हत्तीरोग जंतुचे संक्रमण चालु असल्याने यावर एकत्र उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ज्यांच्या शरिरात मायक्रोफायलेरीयाचे जंतु असोत किंवा नसोत, हत्तीरोगाचे लक्षणे असोत किंवा नसोत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना डिईसी व अलबेंडाझॉल गोळ्याची एक मात्रा वर्षातुन एकदा खाणे आवश्यक आहे. फक्त दोन वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रियांना व खूप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देण्यात येत नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...