Monday, March 10, 2025

वृत्त क्रमांक 278

दिग्रस बंधाऱ्यातून आज विसर्ग नदीकाठी सावधानतेचा इशारा 

नांदेड दि. 10 मार्च :  दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून उद्या दिनांक 11 मार्च रोजी सकाळी ६ वाजता पाणी  सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.   

दिग्रस बंधाऱ्यातून उद्याला सकाळी विसर्ग  राहणार आहे. दिग्रस बंधाऱ्या नंतर अंतेश्वर उच्च पातळी बंधारा व त्यानंतर नांदेड येथील विष्णुपुरी बंधारा अशी एकूण उतरण आहे. विष्णुपुरी बंधाऱ्यातून नांदेड शहराला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे 60 किलोमीटरचा प्रवास करून पाणी या बंधाऱ्यात येणार आहे. तरी दिग्रस ते नांदेड गोदावरी नदीकाठावर असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य व  इतर कोणतीही हानी होणार नाही, यासाठी नागरिकांनी सतर्क असावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील दिग्रस येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे शाखाधिकार्‍यांनी यासंदर्भात नांदेड जिल्हा प्रशासनाला सूचना केली आहे. त्यानुसार नांदेड जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

00000



   वृत्त क्रमांक 277

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

जनऔषधी योजना दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

नांदेड दि. 10 मार्च  :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागामध्ये मा. पंतप्रधान यांचे संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या जनऔषधी योजनेच्या दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू गोरगरीब व गरजू रुग्णांना माफक दरामध्ये दर्जेदार औषधी खरेदी करता यावीत. या योजनेचा प्रचार व प्रसार नागरिकांमध्ये होवून त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने करण्यात आला होता. 

हा कार्यक्रम खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी      डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख हे उपस्थित होते. तर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे मराठवाडा विभागाचे प्रमुख डॉ. सचिन उमरेकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक , डॉ. विजयकुमार कापसे, सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजयकुमार मोरे, शरीरविकृतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. वाय.एच.चव्हाण तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्ण व रुग्णाचे नातेवाइकांची उपस्थिती होती. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनऔषधी योजनेविषयी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी माहिती दिली. प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमुळै गोरगरीब व गरजू रुग्णांस अत्यल्प दरात उत्कृष्ट औषधी मिळत आहेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटूंबाना आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले. 

या योजनेद्वारे अत्यल्प दरात औषधांची उपलब्धतात असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब व गरजू रुग्णांना त्याचा मोठा लाभ घेता येतो. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथे पुढील दोन वर्षामध्ये कॅन्सर रुग्णालय आणि सुपरस्पेशालीटी रुग्णालय सुरु करण्यासाठी शासनस्तरावर यशस्वी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी यावेळी दिली. याचा लाभ नांदेड जिल्ह्यातील रुग्णांना होणार असून त्यांना उपचारासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्यांना याच ठिकाणी उत्कृष्ट उपचार व सुविधा प्राप्त होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

00000

  वृत्त क्रमांक 276

18 वर्षाखालील मुलींना रोजगारासाठी ठेवण्यास सक्त मनाई 

बालकामगार प्रतिबंध प्रतिज्ञापत्र

मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

नांदेड दि. 10 मार्च  :- नांदेड जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या घरी किंवा कार्यालयात तसेच कार्यालयातर्गंत असणाऱ्या संस्थामध्ये 18 वर्षाखालील मुलींना घरकाम व इतर कामासाठी प्रवृत्त केले जाऊ नये, तसेच कामावर ठेवण्यात येऊ नये. याबाबत कार्यालय प्रमुखांनी खात्री करावी व तशा पध्दतीने प्रतिज्ञापत्र जिल्हा महिला बाल विकास कार्यालयास सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. 

बालकामगार कायदा 1986, बालकामगार प्रतिबंध आणि नियमन सुधारणा कायदा 2016 अन्वये बालकांना सर्व प्रकारच्या रोजगारात कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अल्पवयीन मुलीना बालकामगार म्हणून ठेवण्यात आलेले नाही. याबाबत खात्री करण्यासाठी व बालकामगार कायद्याची जनजागृती होण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचे नियोजित आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व विभागा प्रमुखांना दिल्या आहेत. 

प्रतिज्ञापत्राचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, महिला बाल विकास भवन, गणेश नगर रोड, नांदेड या कार्यालयास तात्काळ सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.पी. रंगारी तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 275

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय 

महाविद्यालयाची साफसफाई व स्वच्छतेबाबत विशेष लक्ष 

बालरोग अतिदक्षता विभागातील आरोप प्रकरणी प्रशासनाकडून सखोल चौकशी

रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम नाही, रुग्णालय प्रशासनाचे विशेष लक्ष                                                                                                                                                                                    नांदेड दि. 10 मार्च  :- समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही व्हिडिओने विचलित न होता नागरिकांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरील आपला विश्वास कायम ठेवावा. गरीब, गरजू लोकांसाठी दर्जेदार ईलाजाचे केंद्र म्हणून पुढेही हे रुग्णालय काम करेल, अशी ग्वाही डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताने दिली आहे.

     डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग कक्ष 7 मध्ये झुरळ असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याच्या संदर्भात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी खुलासा केला आहे. 

        जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणाऱ्या व जनतेच्या इलाजासाठी सर्वात हक्काचे स्थान असणाऱ्या रुग्णालयाच्या संदर्भात शासन संवेदनशील असून या संदर्भातील चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी रुग्णालय प्रशासनामार्फत चौकशी समिती गठीत करण्यात आली असून याबाबत सखोल चौकशी सुरु आहे. रुग्णालयाच्या साफसफाई व स्वच्छतेबाबत वेळोवेळी उपाययोजना करुन विशेष लक्ष दिले जाते. 

रुग्णालयातील झुरळ व इतर कीटक होऊ नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनामार्फत नियमितपणे बायोक्लिन पेस्ट कंट्रोल, बार्शी रोड, लातूर या कंपनीकडून पेस्ट कंट्रोलचे कामकाज केले जाते. संबंधित कंपनीला पुनश्च पेस्ट कंट्रोल करण्याच्या सूचनेनुसार संबंधित कंपनीने संपूर्ण रुग्णालयामध्ये पुनश्च पेस्ट कंट्रोल काजकाज केले जात आहे. या संस्थेतील शैक्षणिक तसेच रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम पडलेला नसून रुग्णसेवा उत्तम व सुरळीतपणे चालू आहे. रुग्णालयाच्या स्वच्छतेला रुग्णालय प्रशासनाकडून सर्वोच्च महत्व दिले जात असून स्वच्छतेसंबंधीत नियमितपणे तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहिती डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे. 

00000


वृत्त क्रमांक 274

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

 ·         30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 10 मार्च  :- सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज समाजकल्याण आयुक्तालय,म.रा.पुणे यांचे स्तरावर 30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन पुणे समाज कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरीया यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पदव्युत्तर पदवी व संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएचडी) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. तथापि सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (QX World University Ranking) 200 च्या आतील परदेशात शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते. त्यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

00000

 क्रांतीज्योती #सावित्रीबाईफुले



 #अर्थसंकल्प२०२५

#महाराष्ट्रअर्थसंकल्प२०२५
#महाराष्ट्रअर्थसंकल्प
#Budget2025


 








  वृत्त क्रमांक 285 जिल्ह्यात  22 मार्च रोजी    राष्ट्रीय लोकअदालतीचे     आयोजन   नांदेड दि.   11   मार्च  :-   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकर...