वृत्त क्रमांक 275
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाची साफसफाई व स्वच्छतेबाबत विशेष लक्ष
बालरोग अतिदक्षता विभागातील आरोप प्रकरणी प्रशासनाकडून सखोल चौकशी
रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम नाही, रुग्णालय प्रशासनाचे विशेष लक्ष नांदेड दि. 10 मार्च :- समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही व्हिडिओने विचलित न होता नागरिकांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरील आपला विश्वास कायम ठेवावा. गरीब, गरजू लोकांसाठी दर्जेदार ईलाजाचे केंद्र म्हणून पुढेही हे रुग्णालय काम करेल, अशी ग्वाही डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताने दिली आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग कक्ष 7 मध्ये झुरळ असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याच्या संदर्भात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी खुलासा केला आहे.
जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणाऱ्या व जनतेच्या इलाजासाठी सर्वात हक्काचे स्थान असणाऱ्या रुग्णालयाच्या संदर्भात शासन संवेदनशील असून या संदर्भातील चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी रुग्णालय प्रशासनामार्फत चौकशी समिती गठीत करण्यात आली असून याबाबत सखोल चौकशी सुरु आहे. रुग्णालयाच्या साफसफाई व स्वच्छतेबाबत वेळोवेळी उपाययोजना करुन विशेष लक्ष दिले जाते.
रुग्णालयातील झुरळ व इतर कीटक होऊ नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनामार्फत नियमितपणे बायोक्लिन पेस्ट कंट्रोल, बार्शी रोड, लातूर या कंपनीकडून पेस्ट कंट्रोलचे कामकाज केले जाते. संबंधित कंपनीला पुनश्च पेस्ट कंट्रोल करण्याच्या सूचनेनुसार संबंधित कंपनीने संपूर्ण रुग्णालयामध्ये पुनश्च पेस्ट कंट्रोल काजकाज केले जात आहे. या संस्थेतील शैक्षणिक तसेच रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम पडलेला नसून रुग्णसेवा उत्तम व सुरळीतपणे चालू आहे. रुग्णालयाच्या स्वच्छतेला रुग्णालय प्रशासनाकडून सर्वोच्च महत्व दिले जात असून स्वच्छतेसंबंधीत नियमितपणे तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहिती डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment