वृत्त क्रमांक 277
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
जनऔषधी योजना दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
नांदेड दि. 10 मार्च :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागामध्ये मा. पंतप्रधान यांचे संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या जनऔषधी योजनेच्या दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू गोरगरीब व गरजू रुग्णांना माफक दरामध्ये दर्जेदार औषधी खरेदी करता यावीत. या योजनेचा प्रचार व प्रसार नागरिकांमध्ये होवून त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने करण्यात आला होता.
हा कार्यक्रम खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख हे उपस्थित होते. तर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे मराठवाडा विभागाचे प्रमुख डॉ. सचिन उमरेकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक , डॉ. विजयकुमार कापसे, सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजयकुमार मोरे, शरीरविकृतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. वाय.एच.चव्हाण तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्ण व रुग्णाचे नातेवाइकांची उपस्थिती होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनऔषधी योजनेविषयी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी माहिती दिली. प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमुळै गोरगरीब व गरजू रुग्णांस अत्यल्प दरात उत्कृष्ट औषधी मिळत आहेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटूंबाना आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले.
या योजनेद्वारे अत्यल्प दरात औषधांची उपलब्धतात असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब व गरजू रुग्णांना त्याचा मोठा लाभ घेता येतो. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथे पुढील दोन वर्षामध्ये कॅन्सर रुग्णालय आणि सुपरस्पेशालीटी रुग्णालय सुरु करण्यासाठी शासनस्तरावर यशस्वी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी यावेळी दिली. याचा लाभ नांदेड जिल्ह्यातील रुग्णांना होणार असून त्यांना उपचारासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्यांना याच ठिकाणी उत्कृष्ट उपचार व सुविधा प्राप्त होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment