Monday, August 15, 2016

विकास योजना लोकांपर्यंत पोहचविण्यात
लोकराज्यचे मोठे योगदान – राज्यमंत्री खोतकर
गुंडेगाव ठरले पहिले लोकराज्य ग्राम
नांदेड, दि. 15 :- सरकारच्या विकास योजना लोकांपर्यंत पोहचविण्यात लोकराज्यचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज मौजे गुंडेगाव येथे केले. जलयुक्त शिवार अभियानातील कामांचे जलपूजन, पशूधन विमा योजनेची सुरवात, महाराजस्व  अभियान  यानिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात त्यांच्या हस्ते गुंडेगावाच्या नागरिकांना  लोकराज्य मासिक समारंभपुर्वक सुपूर्त करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते. गुंडेगाव हे नांदेड जिल्ह्यातील पहिले लोकराज्य ग्राम ठरले आहे. 
गुंडेगाव शिवारात झालेल्या कार्यक्रमास आमदार हेमंत पाटील, गुंडेगावच्या सरपंच सिंधुताई हंबर्डे, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष दासराव हंबर्डे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी  पद्माकर केंद्रे, तहसीलदार  पी. के. ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, पशूसंवर्धन उपायुक्त पी. डब्लु. घुले, भुवैज्ञानिक गीता साळुंखे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू आदींची उपस्थिती होती.
गुंडेगावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत लोकराज्य मासिक पोहचविण्याच्या प्रयत्नाचे राज्यमंत्री खोतकर यांनी कौतूक केले. लोकराज्यमुळे सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोचविण्यात येतात. त्यामुळे गावांना या योजनांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल, त्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.
माहिती  व  जनसंपर्क  महासंचालनालयाकडून प्रकाशित राज्य शासनाच्या लोकराज्य या मुखपत्रासाठी वार्षिक वर्गणी शंभर रुपये आहे. गुंडेगाव ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत लोकराज्य पोहचविण्यासाठी वर्गणी भरली आहे. त्यामुळे हे गाव लोकराज्य ग्राम ठरले आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांचीही उपस्थिती होती.


शेतकरी, उद्योजक विविध घटकांना सोबत
घेऊन जिल्ह्याचा विकास साधणार - राज्यमंत्री खोतकर
जलयुक्त मधील कामांचे कौतूक, जिल्हाधिकारी काकाणी यांचे अभिनंदन

नांदेड, दि. 15 :- शेतकऱ्यांपासून-उद्योजकांपर्यंत अशा विविध घटकांना सोबत घेऊन जिल्हा गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज मौजे गुंडेगाव येथे केले. जलयुक्त शिवार अभियानातील कामांचे जलपूजन, पशूधन विमा योजनेची सुरवात, महाराजस्व अभियान यानिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. गुंडेगाव शिवारात झालेल्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आमदार हेमंत पाटील, गुंडेगावच्या सरपंच सिंधुताई हंबर्डे, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष दासराव हंबर्डे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, तहसीलदार पी. के. ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, पशूसंवर्धन उपायुक्त पी. डब्लु. घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक भातलवंडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल सरपंच संघटनेच्यावतीने राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री. काकाणी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. मोटे, भुवैज्ञानिक गीता साळुंखे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, घटलेले भुजलस्तर, कमी पावसामुळे अलिकडच्या काळात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती पण जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातच वेगळे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांचे मनात विश्र्वास निर्माण करता आला. सरकारकडून शेतकऱ्यांचे हित जपण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच गावातील पाणी गावातच अडविता येईल, एकही थेंब राज्याबाहेर जाणार नाही, त्याद्वारे जलस्तर उंचाविण्याचा प्रयत्न आहे.
राज्यातील विकासाची विषमता संपविण्याचा, विभागीय समतोल राखण्यासाठीही प्रयत्न असल्याचे सांगतानाच राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, मुंबई-औरंगाबाद या अतीद्रूतगती (सूपर एक्स्प्रेस वे) मार्गाशी नांदेड जिल्हाही संलग्न करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यत आणि सर्वसामान्य जनतेचे जीवनस्तरही उंचाविता येणार आहे. विकासाच्या मार्गावर जिल्हा गतीने पुढे नेण्यासाठी अशा विविध घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी  त्यांनी जलयुक्त शिवार अभियानातील कामांसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, तसेच जलयुक्त शिवार अभियानासाठी राबविणाऱ्या विविध यंत्रणांचे कौतूक केले, तसेच अभिनंदनही केले.
आमदार पाटील यांनी यावेळी गुंडेगाव आणि परिसरातील वैशिष्ट्ये सांगतानाच, येथील विकास कामांतील लोकसहभागाचाही आवर्जुन उल्लेख केला व त्याचे कौतूक केले. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी गुंडेगावातील  नागरिकांच्या  पुढाकारालाही  दाद  दिली.
सुरवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. मोटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात महाराजस्व अभियानातील महिला सक्षमीकरणाचे पाऊल म्हणून गुंडेगावातील महिलांना कुटुंबप्रमुख म्हणून शिधापत्रिकांचे तसेच  सातबारांचे वितरणही राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परिसरातील उद्योजक सूरज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख रमेश पारसेवार यांचाही सत्कार करण्यात आला.
तत्पुर्वी गुंडेगाव ते गोदावरी नदी दरम्यानच्या नाल्याच्या साडेसात किलोमीटर नाला सरळीकरण-खोलीकरण कामामुळे साठलेल्या पाण्याचे राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच नाल्याच्या काठावर वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमासाठी गुंडेगाव परिसरातील नागरीक आदींची मोठी उपस्थिती होती.
पशूधन विमा पंधरवड्यातील विमा योजनेस प्रारंभ
पशुसंवर्धन विभागाच्या पशूधन विमा पंधरवडा योजनेतील विमा हप्त्यांसाठी अर्ज भरण्यासाठीही राज्यमंत्री खोतकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते पशुपालकांना अर्जांचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांनी या पशूधन विमा पंधरवडा योजनेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा व आपल्या पशूधनाला विमा संरक्षित करावे, असे आवाहनही राज्यमंत्री खोतकर यांनी केले. गोवंशातील पशूधनासाठी  शंभर टक्के विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

000000

गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरुपांना प्रतिबंधासाठी
वैज्ञानिक क्षमताचाही पुरेपूर वापर व्हावा - राज्यमंत्री खोतकर
नांदेड पोलिस दलाच्या सायबर लॅब, आय-कार,
टुरीस्ट पोलीस उपक्रमांचे उद्घाटन संपन्न

नांदेड, दि. 15 :- गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरुपानुसार त्याला  प्रतिबंध  करण्यासाठी वैज्ञानिक क्षमतेचा पुरेपूर वापर करावा लागेल. त्यादृष्टीने नांदेड पोलीस दल सक्षम होत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे काढले. नांदेड पोलिस दलाच्या सायबर लॅबचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले. निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर  महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, उपमहापौर शफी कुरेशी, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, जग वेगाने बदलते आहे. तंत्रज्ज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे गुन्ह्यांच्या प्रकारात, स्वरुपातही बदल होत आहेत. त्यादृष्टीने राज्यात माहिती तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर लॅबची संकल्पना मांडली. या लॅबचे राज्यात एकाचवेळी उद्घाटन करण्यात येत आहे. बदलत्या जगात गुन्हेगारीचे प्रकारही बदलले आहेत. त्यामुळे पोलीस दलही बदलले पाहिजे. या गुन्ह्यांचा तपास प्रभावी आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या लॅबचा निश्चित वापर होणार आहे. ज्यामुळे गुन्ह्यांतील शिक्षेच प्रमाण वाढेल आणि गैरप्रकारांना जरब बसेल. नव समाज माध्यमांवर शांतता-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी नजर ठेवणे आवश्यक ठरू लागले आहे. त्यादृष्टीनेही या सायबर लॅब उपयुक्त ठरतील. पोलिस दलांला अद्ययावत ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ज्ञान उपलब्ध करून देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुरवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक ऐनपुरे यांनी प्रास्ताविकात सायबर लॅब, तसेच आय-कार आणि टूरीस्ट पोलीस व्हॅन या संकल्पनांबाबत माहिती दिली. श्री. देवराय यांनी सुत्रसंचालन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर राज्यमंत्री खोतकर यांनी पोलीस मुख्यालयातील सेफ सिटी-प्रोजेक्ट या वैशिष्ट्यपुर्ण प्रकल्पाचीही प्रत्यक्ष पाहणीद्वारे माहिती घेतली. हा प्रकल्प आणखी सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
फिरते न्यायवैधक तपास वाहन (फोरेन्सीक इन्व्हिस्टीगेशन कार) आय-कारचे उद्गघाटन
नांदेड जिल्हा पोलीस दलाकडे अत्याधुनिक अशी फिरते न्यायवैधक तपास वाहन मिळाले आहे. या वाहनाचे आय-कारचे राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वाहनात न्यायवैधक पुरावे गोळा करण्यासाठीच्या तेरा उपकरणांचे संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जेणेकरून घटनास्थळी पोहचून, शास्त्रोक्त आणि अचूक पद्धतीने न्यायवैधक पुरावे गोळा करता येणार आहेत. ज्यांचा वापर गुन्ह्यांच्या तपासात आणि दोषारोपपत्र प्रभावी करण्यासाठी करता येणार आहे. यामुळे गुन्हा शाबित करण्यात व त्याद्वारे शिक्षेचे प्रमाणही वाढणार आहे. नांदेड शहरात धार्मिक पर्यटक, तसेच विदेशी पर्यटकांचीही संख्या मोठी असते, या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, मदतीसाठी आणि प्रसंगी आपत्कालिन परिस्थितीवर मात करण्यासाठी टूरिस्ट पोलीस व्हॅन सूसज्ज करण्यात आली आहे. या व्हॅनचेही राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांसाठी पोलीस मुख्यालयातीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000
आपलं नांदेड या मोबाईल ॲपचे
राज्यमंत्री खोतकर यांचे हस्ते उद्घाटन संपन्न

नांदेड, दि. 15 :- जिल्ह्याची ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलीक माहितीसह 28 प्रकारच्या विविध विषयांची उपयुक्त माहिती असलेले आपलं नांदेड या मोबाईल अँड्राईड-ॲपचे उद्घाटन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी सभागृहात संपन्न झाले. जनतेला या मोबाईल ॲपमुळे सहज माहिती उपलब्ध होणार असल्याने जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम निश्चित चांगला आहे, असे गौरवोद्गार श्री. खोतकर यांनी काढले.
यावेळी आमदार सर्वश्री. डी. पी. सावंत, अमर राजूरकर, हेमंत पाटील तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर आदी अधिकारी , मान्यवर व्यक्ती, कर्मचारी उपस्थित होते.
आपलं नांदेड या मोबाईल ॲपच्या प्रथम आवृत्तीत नांदेड जिल्ह्याचा ऐतिहासिक मागोवा आणि भौगोलीक माहितीसह सर्वसामान्य नागरिकांना नेहमी लागणाऱ्या आवश्यक 28 प्रकारच्या विविध विषयांच्या माहितीचा अंतर्भाव केलेला आहे. भविष्यात यात आणखी उपयुक्त माहितीचाही समावेश केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिली.
जिल्ह्याचे एक स्वतंत्र मोबाईल ॲप जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (एनआयसी) श्री. पोटेकर यांच्या संघाने निर्मिती केल्याबद्दल श्री. पोटेकर  व विठ्ठल लादे यांना राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी या ॲप मागील भुमिका विषद केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधुनिकीकरण झालेल्या सामान्य शाखा व महसूल शाखा यांच्या कक्षाचे उद्घाटनही श्री. खोतकर यांच्या हस्ते  करण्यात आले.
000000



उज्ज्वल… नांदेड, समर्थ नांदेड घडविण्यासाठी प्रयत्न करूया
– राज्यमंत्री खोतकर
स्वातंत्र्यदिन ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ राष्ट्रभक्तीमय वातावतरणात संपन्न

नांदेड, दि. 15 :- उज्ज्वल नांदेड...समर्थ नांदेड घडविण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे केले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. याप्रसंगी ते शुभेच्छापर संदेशाच्या भाषणाच्या बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रभक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज वंदन संपन्न झाले. समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, निमंत्रित मान्यवर तसेच अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी निमंत्रितांमध्ये महापौर शैलजा स्वामी, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, उपमहापौर शफी कुरेशी, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय ऐनपूरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदींसह यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटुंबिय, माजी सैनिक तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
शुभेच्छापर भाषणात राज्यमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, संघटीत आणि एकजुटीने अस्मानी संकटाशीही झुंजण्याचे बळ मिळते. हे लोकसहभागाद्वारे जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करून, आपण सिद्ध केले आहे. महाराष्ट्राला टंचाईमुक्त आणि जलयुक्त करण्याचे हे अभियान नांदेड जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आले. जलपुनर्भरणस्तंभ आणि उगम ते संगम नाला पुनरूज्जीवन या संकल्पनेवर आधारीत कामांद्वारे नांदेडने राज्यात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. जल आणि मृद संधारणाशी निगडीत या अभियानामुळे नांदेड जिल्ह्यातील कृषि सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यात यश आले आहे. एवढेच नव्हे, टंचाईच्या बिकट परिस्थितीत ग्रामीण आणि शहरी भागातील पिण्याच्या पाण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांशी सांगड घालून, थेट इसापूर आणि येलदरी येथून पाणी आणण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठीचे जिल्हाधिकारी तसेच  विविध  यंत्रणांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच माझा महाराष्ट्र-स्वच्छ महाराष्ट्र हे महत्त्वाकांक्षी अभियान यशस्वी करण्यासाठी अठरा लाख गृहभेटी-स्वच्छ महाराष्ट्रासाठी हे संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वच घटकांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात सुरु असलेल्या डिजिटल शिधापत्रिका, वंचितांना शिधापत्रिका देणे, मुलींचा जन्मदरातील उल्लेखनीय वाढ, तसेच शोषखड्ड्यांचा उपक्रम, महाराजस्व अभियान, उज्ज्वल नांदेड तसेच आणि त्याअनुषंगे राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख प्रशासन या संकल्पनांचीही राज्यमंत्री खोतकर यांनी प्रशंसा केली. पशूसंवर्धन विभागाचा पशूधन विमा पंधरवडा यशस्वी करावा, पशुपालकांनी आपल्या पशुधनाचा विमा हप्ता भरावा, असे आवाहन करतानाच, राज्यातील गोवंश पशुधनाचा पुर्ण विमा शासनाकडूनच भरण्याचा प्रयत्न असल्याचेही श्री. खोतकर यांनी सांगितले.
समाधानकारक पाऊस आणि जलयुक्तमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्यांचा सजगतेने वापर करण्याची, त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचे नमूद करून राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकरी टप्प्या-टप्प्याने या अडचणीतून बाहेर पडेल, अशी आशा आहे. जिल्हा हिरवाईने नटू लागला आहे. नांदेडकडे पर्यटकांचाही ओढा मोठा असतो. जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही आता खुलून उठतील. गर्दीमुळे फूलू लागतील. सेवा,  व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातही चैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी कौशल्य विकास, उद्योग आणि व्यवस्थापनक्षेत्राने प्रयत्न करावेत आणि नांदेड जिल्ह्यातील तरुणांना संधी उपलब्ध होतील, अशी व्यवस्था निर्माण व्हावे अशी अपेक्षा आहे. शिक्षण, आरोग्याच्या सुविधा आणि कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी याद्वारे उज्ज्वल नांदेड आणि समर्थ नांदेड घडवता येईल, असा विश्वासही यावेळी राज्यमंत्री खोतकर यांनी व्यक्त केला.
            समारंभात राज्यमंत्री खोतकर यांनी ध्वजवंदनानंतर उपस्थित स्वातंत्र्यसैनिक तसेच नागरिकांशी संवाद साधला, त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची त्यांनी आस्थेवाईक विचारपूसही केली. 
कार्यक्रमात राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत यश मिळविल्याबद्दल अनिरुद्ध काबरा (ग्यानमाता विद्यामंदिर), आयआयएम लखनऊकडून सुवर्णपदक पटविल्याबद्दल अभिलाषा जाजू तसेच गुणवत्ता सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तरोडेकर यांना पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी, सुधीर रावळकर यांनी सुत्रसंचालन केले.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...