Monday, August 15, 2016

शेतकरी, उद्योजक विविध घटकांना सोबत
घेऊन जिल्ह्याचा विकास साधणार - राज्यमंत्री खोतकर
जलयुक्त मधील कामांचे कौतूक, जिल्हाधिकारी काकाणी यांचे अभिनंदन

नांदेड, दि. 15 :- शेतकऱ्यांपासून-उद्योजकांपर्यंत अशा विविध घटकांना सोबत घेऊन जिल्हा गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज मौजे गुंडेगाव येथे केले. जलयुक्त शिवार अभियानातील कामांचे जलपूजन, पशूधन विमा योजनेची सुरवात, महाराजस्व अभियान यानिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. गुंडेगाव शिवारात झालेल्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आमदार हेमंत पाटील, गुंडेगावच्या सरपंच सिंधुताई हंबर्डे, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष दासराव हंबर्डे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, तहसीलदार पी. के. ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, पशूसंवर्धन उपायुक्त पी. डब्लु. घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक भातलवंडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल सरपंच संघटनेच्यावतीने राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री. काकाणी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. मोटे, भुवैज्ञानिक गीता साळुंखे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, घटलेले भुजलस्तर, कमी पावसामुळे अलिकडच्या काळात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती पण जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातच वेगळे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांचे मनात विश्र्वास निर्माण करता आला. सरकारकडून शेतकऱ्यांचे हित जपण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच गावातील पाणी गावातच अडविता येईल, एकही थेंब राज्याबाहेर जाणार नाही, त्याद्वारे जलस्तर उंचाविण्याचा प्रयत्न आहे.
राज्यातील विकासाची विषमता संपविण्याचा, विभागीय समतोल राखण्यासाठीही प्रयत्न असल्याचे सांगतानाच राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, मुंबई-औरंगाबाद या अतीद्रूतगती (सूपर एक्स्प्रेस वे) मार्गाशी नांदेड जिल्हाही संलग्न करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यत आणि सर्वसामान्य जनतेचे जीवनस्तरही उंचाविता येणार आहे. विकासाच्या मार्गावर जिल्हा गतीने पुढे नेण्यासाठी अशा विविध घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी  त्यांनी जलयुक्त शिवार अभियानातील कामांसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, तसेच जलयुक्त शिवार अभियानासाठी राबविणाऱ्या विविध यंत्रणांचे कौतूक केले, तसेच अभिनंदनही केले.
आमदार पाटील यांनी यावेळी गुंडेगाव आणि परिसरातील वैशिष्ट्ये सांगतानाच, येथील विकास कामांतील लोकसहभागाचाही आवर्जुन उल्लेख केला व त्याचे कौतूक केले. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी गुंडेगावातील  नागरिकांच्या  पुढाकारालाही  दाद  दिली.
सुरवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. मोटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात महाराजस्व अभियानातील महिला सक्षमीकरणाचे पाऊल म्हणून गुंडेगावातील महिलांना कुटुंबप्रमुख म्हणून शिधापत्रिकांचे तसेच  सातबारांचे वितरणही राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परिसरातील उद्योजक सूरज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख रमेश पारसेवार यांचाही सत्कार करण्यात आला.
तत्पुर्वी गुंडेगाव ते गोदावरी नदी दरम्यानच्या नाल्याच्या साडेसात किलोमीटर नाला सरळीकरण-खोलीकरण कामामुळे साठलेल्या पाण्याचे राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच नाल्याच्या काठावर वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमासाठी गुंडेगाव परिसरातील नागरीक आदींची मोठी उपस्थिती होती.
पशूधन विमा पंधरवड्यातील विमा योजनेस प्रारंभ
पशुसंवर्धन विभागाच्या पशूधन विमा पंधरवडा योजनेतील विमा हप्त्यांसाठी अर्ज भरण्यासाठीही राज्यमंत्री खोतकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते पशुपालकांना अर्जांचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांनी या पशूधन विमा पंधरवडा योजनेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा व आपल्या पशूधनाला विमा संरक्षित करावे, असे आवाहनही राज्यमंत्री खोतकर यांनी केले. गोवंशातील पशूधनासाठी  शंभर टक्के विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...