Monday, August 15, 2016

उज्ज्वल… नांदेड, समर्थ नांदेड घडविण्यासाठी प्रयत्न करूया
– राज्यमंत्री खोतकर
स्वातंत्र्यदिन ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ राष्ट्रभक्तीमय वातावतरणात संपन्न

नांदेड, दि. 15 :- उज्ज्वल नांदेड...समर्थ नांदेड घडविण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे केले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. याप्रसंगी ते शुभेच्छापर संदेशाच्या भाषणाच्या बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रभक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज वंदन संपन्न झाले. समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, निमंत्रित मान्यवर तसेच अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी निमंत्रितांमध्ये महापौर शैलजा स्वामी, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, उपमहापौर शफी कुरेशी, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय ऐनपूरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदींसह यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटुंबिय, माजी सैनिक तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
शुभेच्छापर भाषणात राज्यमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, संघटीत आणि एकजुटीने अस्मानी संकटाशीही झुंजण्याचे बळ मिळते. हे लोकसहभागाद्वारे जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करून, आपण सिद्ध केले आहे. महाराष्ट्राला टंचाईमुक्त आणि जलयुक्त करण्याचे हे अभियान नांदेड जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आले. जलपुनर्भरणस्तंभ आणि उगम ते संगम नाला पुनरूज्जीवन या संकल्पनेवर आधारीत कामांद्वारे नांदेडने राज्यात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. जल आणि मृद संधारणाशी निगडीत या अभियानामुळे नांदेड जिल्ह्यातील कृषि सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यात यश आले आहे. एवढेच नव्हे, टंचाईच्या बिकट परिस्थितीत ग्रामीण आणि शहरी भागातील पिण्याच्या पाण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांशी सांगड घालून, थेट इसापूर आणि येलदरी येथून पाणी आणण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठीचे जिल्हाधिकारी तसेच  विविध  यंत्रणांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच माझा महाराष्ट्र-स्वच्छ महाराष्ट्र हे महत्त्वाकांक्षी अभियान यशस्वी करण्यासाठी अठरा लाख गृहभेटी-स्वच्छ महाराष्ट्रासाठी हे संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वच घटकांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात सुरु असलेल्या डिजिटल शिधापत्रिका, वंचितांना शिधापत्रिका देणे, मुलींचा जन्मदरातील उल्लेखनीय वाढ, तसेच शोषखड्ड्यांचा उपक्रम, महाराजस्व अभियान, उज्ज्वल नांदेड तसेच आणि त्याअनुषंगे राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख प्रशासन या संकल्पनांचीही राज्यमंत्री खोतकर यांनी प्रशंसा केली. पशूसंवर्धन विभागाचा पशूधन विमा पंधरवडा यशस्वी करावा, पशुपालकांनी आपल्या पशुधनाचा विमा हप्ता भरावा, असे आवाहन करतानाच, राज्यातील गोवंश पशुधनाचा पुर्ण विमा शासनाकडूनच भरण्याचा प्रयत्न असल्याचेही श्री. खोतकर यांनी सांगितले.
समाधानकारक पाऊस आणि जलयुक्तमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्यांचा सजगतेने वापर करण्याची, त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचे नमूद करून राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकरी टप्प्या-टप्प्याने या अडचणीतून बाहेर पडेल, अशी आशा आहे. जिल्हा हिरवाईने नटू लागला आहे. नांदेडकडे पर्यटकांचाही ओढा मोठा असतो. जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही आता खुलून उठतील. गर्दीमुळे फूलू लागतील. सेवा,  व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातही चैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी कौशल्य विकास, उद्योग आणि व्यवस्थापनक्षेत्राने प्रयत्न करावेत आणि नांदेड जिल्ह्यातील तरुणांना संधी उपलब्ध होतील, अशी व्यवस्था निर्माण व्हावे अशी अपेक्षा आहे. शिक्षण, आरोग्याच्या सुविधा आणि कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी याद्वारे उज्ज्वल नांदेड आणि समर्थ नांदेड घडवता येईल, असा विश्वासही यावेळी राज्यमंत्री खोतकर यांनी व्यक्त केला.
            समारंभात राज्यमंत्री खोतकर यांनी ध्वजवंदनानंतर उपस्थित स्वातंत्र्यसैनिक तसेच नागरिकांशी संवाद साधला, त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची त्यांनी आस्थेवाईक विचारपूसही केली. 
कार्यक्रमात राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत यश मिळविल्याबद्दल अनिरुद्ध काबरा (ग्यानमाता विद्यामंदिर), आयआयएम लखनऊकडून सुवर्णपदक पटविल्याबद्दल अभिलाषा जाजू तसेच गुणवत्ता सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तरोडेकर यांना पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी, सुधीर रावळकर यांनी सुत्रसंचालन केले.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...