Monday, October 8, 2018


नवरात्र उत्सवात पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 8 :- जिल्ह्यात 10 ते 20 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत नवरात्र उत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर दुर्गादेवी, शारदादेवीची स्थापना व विसर्जन करण्यात येते. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणुन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 10 ते 20 ऑक्टोंबर 2018 च्या मध्यरात्रीपर्यंत वरील कलमान्वये पुढील अधिकार प्रदान केला आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तवणूक किंवा वागणुक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी, उपासनेच्यावेळी, कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35, 37 ते 40, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिर सभा, मोर्चे, मिरवणुक, निर्दशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्वपरवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावेत. सदर जाहीर सभा, मिरवणुक, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.
हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जारी केले आहेत.
00000


डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत
अर्ज सादर करण्यास 30 ऑक्टोंबर मुदतवाढ
नांदेड दि. 8 :- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2018-19 अंतर्गत जिल्‍हयातील अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या नोंदणीकृत मदरसांकडून प्रस्‍ताव मागविण्यास मंगळवार 30 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
इच्‍छुक मदरशांनी शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 मध्‍ये नमूद केलेल्‍या विहित नमुन्‍यातील परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रे जोडून जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मंगळवार 30 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी केले आहे.
ज्‍या मदरशांमध्‍ये फक्‍त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्‍यात येत आहे आणि ज्‍यांना आधुनिक शिक्षणाकरिता शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे अशा  नोंदणीकृत मदरशांकडून राज्य अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग अर्ज मागवित आहे.
सदर मदरसे धर्मदाय आयुक्‍त अथवा महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावेत. अशा मदरशानी शासन निर्णय, क्रमांक अविवि- 2010/प्र.क्र.152/10/का-6, दि.11 ऑक्‍टोबर, 2013 च्‍या तरतदीनुसार पुढील बाबींकरिता विहित नमुन्‍यात अर्ज करावेत.  विज्ञान, गणित, समाजशास्‍त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍याकरिता शिक्षकांना मानधन देणे.  पायाभूत सुविधासाठी व ग्रंथालयासाठी अनुदान राहील. शासन निर्णय दि. 11 ऑक्टोंबर 2013 च्‍या तरतूदीनुसार जास्‍तीतजास्‍त 3 डी.एड / बी.एड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाण 40:1 असे राहील. शिक्षणासाठी हिंदी/ इंग्रजी / मराठी / उर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करून त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे.
ग्रंथालयासाठी तसेच विद्यार्थ्‍यांकरिता शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी 2 लाख रुपये अनुदान देय आहे. यामध्‍ये मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्‍यवस्‍था करणे, प्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणे, विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर, मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणे, मदारसांच्‍या निवासी इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफटवेअर, प्रिंटर्स इ. तसेच प्रयोगशाळा साहित्‍य, सायन्‍स कीट, मॅथेमॅटीक्‍स कीट व इतर अध्‍ययन साहित्‍य. यासाठी किमान 3 वर्षापूर्वी नोंदणी केलेल्‍या व अल्‍पसंख्‍याक बहुल मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ह्या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
मंगळवार 30 ऑक्‍टोबर 2018 नंतर जिल्‍हाधिकारी कार्यालयास प्राप्‍त होणारे प्रस्‍ताव विचारात घेतले जाणार नाहीत. शासन निर्णय क्र-अविवि. 2010/प्र.क्र.152/10/का-6, दि. 11 ऑक्‍टोबर 2013 व अर्जाचा नमुना, आवश्‍यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 8 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 9 ऑक्टोंबर 2018 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.  
0000


विधानसभा विरोधी पक्षनेता
राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
नांदेड, दि. 8 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 10 ऑक्टोंबर 2018 रोजी यवतमाळ येथून मोटारीने सकाळी 9.30  वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. माहूर येथून मोटारीने यवतमाळकडे प्रयाण करतील.  
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...