Sunday, September 23, 2018


महाराष्ट्र विधान परिषद
विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 23 :- महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 24 सप्टेंबर 2018 रोजी परळी वैजनाथ येथून सकाळी 10 वा. श्री गुरु गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.50 वा. श्री गुरु गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथून Trujet 2T-413  या विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000


"आयुष्यमान भारत" योजना वंचित गरिबांसाठी
लाभदायक ; आरोग्य सुविधेचा मोफत लाभ घ्यावा 
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 23 :- आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना वंचित गरिबांसाठी लाभदायक असून यात मोफत आरोग्य उपचार मिळणार आहेत. या आरोग्य सुविधेचा गरीब पात्र कुटुंबांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.    
सर्वांना आरोग्य चांगले मिळावे यासाठी आज देशभरात आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते झारखंड राज्यातील रांची येथे करण्यात आला. या योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, श्री. धनगे, संतोष बोडलेवार, पंचायत समिती सभापती मायाताई राठोड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, केंद्र शासनाने आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1 हजार 349 आजारांचे उपचार निश्चित केले आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 971 आजारांचा या उपचारात समावेश केला आहे. या दोन्ही योजनेतील उपचारांचा आढावा घेऊन यादी तयार करण्यात आली आहे. ई-कार्डद्वारे लाभार्थी कुटुंबाना या योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. एका कुटुंबाला प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी 5 लाख रुपये विमा संरक्षण राहणार आहे. योजनेंतर्गत त्या कुटुंबाला ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात मोफत उपचार घेता येतील. आरोग्य व शिक्षण चांगले राहिले तर गावाचा विकास होतो, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसात तालुका, गाव व वार्डनिहाय सर्व लाभार्थ्यांना ई-कार्ड देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.  
जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांनी आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आरोग्य उपचाराचा मोफत लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.    
 झारखंड रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ केला. त्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील 10 लाभार्थ्यांना ई-कार्डचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.    
प्रास्ताविकात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास सर्जे यांनी या योजनेसाठी जिल्ह्यातील 2 लाख 77 हजार 999 कुटुंब पात्र आहेत अशी माहिती दिली. तर सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी व उपजिल्हा रुग्णालय मुखेड या दोन रुग्णालयात या योजनेत उपचार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गादास रोडे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आशा कार्यकर्ती, आरोग्य मित्र, नागरिक उपस्थित होते. 
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...