Wednesday, September 12, 2018


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात गुरुवार 27 सप्टेंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 13 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000



राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 12 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.   
00000


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
  नांदेड, दि. 12 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी मंगळवार 18 सप्टेंबर 2018 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. परंतू सोमवार 17 सप्टेंबर 2018 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सुट्टी असल्यामुळे मंगळवार 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत
राज्याबाहेर गुजरात येथे शेतकरी अभ्यास दौरा संपन्न ;
जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यावसाय सुरु करण्यास वाव
Add caption
नांदेड, दि. 12 :-  जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (MACP) अंतर्गत स्थापित शेतकरी उत्पादक कंपनी यांचा राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौरा गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन, (अमूल) आनंद, गुजरात येथे 6 ते 10 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक आर. बी. चलवदे व कृषि उपसंचालक श्रीमती एम. आर. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला.
आनंद हे गाव अहमदाबाद पासुन 100 कि.मी. दुर असलेले एक छोटेसे शहर आहे. आनंद हे दुधाची राजधानी म्हणुन देशभरात प्रसिद्ध आहे. अमुल हे देशातील सर्वात मोठी डेअरी असुन त्याची स्थापना 1946 साली झालेली आहे.
सन 1930 साली पोलसन डेअरी द्वारे येथील शेतकऱ्यांचे दुध खरेदी करत होते. या डेअरीद्वारे देशातील शेतकऱ्यांचे शोन केले जायचे त्यामुळे राष्ट्रीय नेते सरदार पटेल व काही प्रगतशिल शेतकऱ्यांनी मिळुन पोलसन डेअरी विरुद्ध असहकार अंदोलन सुरु केले. त्याची फलनिशपत्ती म्हणुन 14 डिसेंबर, 1946 मध्ये अमूल इंडिया (आनंद सहकारी दुग्ध उत्पादक संघ) ची स्थापना झाली. अमूलचे संस्थापक व्हर्गीज कुरियन आहेत.
यामध्ये 750 कर्मचारी असुन 3.6 दशलक्ष दुग्ध उत्पादक शेतकरी सदस्य, 33 जिल्हे, 18 सदस्य संघटना व 18 हजार 554 गावांची संख्या आहे. सरासरी प्रति दिवस 18 दशलक्ष लिटर दुध संकलन केले जाते. एकुण दुध हाताळनी क्षमता प्रतिदिवस 32 दशलक्ष लिटर केले जाते. त्यापासुन दुध, दही, पनिर, तुप, ताक आदी 350 दुग्धजन्य पदार्थाची निर्मीती होते. विक्री व्यवस्थापनाकरीता देशभरामध्ये 56 कार्यालय असुन यामध्ये 10 हजार वितरक व 10 लाख किरकोळ विक्रेत्यामार्फत विक्री केली जाते. या दौऱ्याचे महत्व पाहता नांदेड जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यावसाय सुरु करण्यास खुप वाव आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी दिली आहे.
00000




साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे
उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे यांचा दौरा
      नांदेड, दि. 12 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे  (राज्यमंत्री दर्जा) हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
      सोमवार 17 सप्टेंबर 2018 रोजी रात्री 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
      मंगळवार 18 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10 वा. विश्रामगृह नांदेड येथे स्थानिक कार्यकर्त्या समवेत बैठक (वेळ राखीव). दुपारी 1.30 वा. विश्रामगृह नांदेड येथून शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.
00000


महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता
धनंजय मुंडे यांचा दौरा
      नांदेड, दि. 12 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
      गुरुवार 13 सप्टेंबर 2018 रोजी मुंबई येथून दुपारी 2.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथून शासकीय मोटारीने परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील.
000000


मतदार यादी तयार करताना बीएलओ
अत्यंत महत्वाचा व जबाबदार घटक 
- जिल्हाधिकारी अरूण डोंगरे
नांदेड,दि. 12 :- मतदार यादी तयार करताना बीएलओ अत्यंत महत्वाचा व जबाबदार घटक, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण मतदारसंघातील बीएलओची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आज पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी व तहसिलदार  किरण अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी बीएलओ यांच्याशी संवाद साधत पर्यवेक्षक, बीएलओ यांच्या कामाचा आढावा घेतला. काही प्रश्न विचारून बीएलओ यांच्या ज्ञानाची व त्यांच्या कामाची तपासणी ही केली. बीएलओ हे पद अत्यंत महत्वाचे असून त्यांनी स्वतःचे कर्तव्य, जबाबदारी व्यवस्थित पार पाडावीत. मतदार यादी अचूक, शुद्ध करण्यात मोलाची भूमिका निभवावी असाही संदेश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यानिमित्ताने दिला. यावेळी बीएलओ यांनी आपापल्या केंद्रात केलेल्या कामाची माहिती दिली.
ऑक्सफर्ड द ग्लोबल शाळेतील निवडणूक साक्षरता मंडळाच्यावतीने स्पर्धेतील सर्वोत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या शाळेचे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी कौतूक केले व असे उपक्रम ईलसी क्लब मार्फत सर्वस्तरावर राबविले जावेत, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात तहसिलदार किरण अंबेकर यांनी प्रशिक्षणाचा उद्देश सांगून मतदार यादी अद्यावतीकरणाच्या विविध पैलूंवरील प्रगतीची माहिती दिली.
यावेळी नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी सादरीकरणाद्वारे मतदार यादी अद्यावतीकरण, संविधानिक तरतूदी व कायदेशीर बाबीसह बीएलओ कोण, त्यांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य यासोबतच विविध अर्जाची माहिती सांगून पुर्नरिक्षण कार्यक्रमात करावयाचे कामकाज याबाबत प्रशिक्षण दिले. सुरुवातीला जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले.
याप्रसंगी दोन्ही मतदारसंघातील सर्व पर्यवेक्षक व 590 बीएलओ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन नायब तहसिलदार निवडणूक स्नेहलता स्वामी यांनी केले.
000000


विविध शैक्षणिक योजना, यशकथांचा समावेश
असलेला लोकराज्य सप्टेंबर अंक प्रकाशित
नांदेड दि. 12 :- लोकराज्य सप्टेंबर विशेषांकाचे जिल्हास्तरीय प्रकाशन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दिपाली मोतियेळे यांच्या हस्ते येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट हॉल येथे झाले.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख राजेश्वर डूडूकनाळे, दुरशिक्षण विभागाचे डॉ. राम जाधव, राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. डी. पवार, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे डॉ. कल्पना कदम, पीपल्स महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक सिद्धेवाड, छायाचित्रकार विजय होकर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकराज्य सप्टेंबर 2018 या विशेषांकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याविषयी विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये द्रष्टा राजर्षी,  शैक्षणिक क्रांतिचे जनक, गाव तेथे शाळा, सामाजिक समतेचा अधिष्ठाता अशा लेखांचा समावेश आहे.
शैक्षणिक योजनांची माहिती
या अंकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, शेतीपूरक कौशल्य प्रशिक्षण, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य प्रशिक्षण अभियान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ झाला अशा लाभार्थ्यांच्या प्रेरणादायी यशकथा हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. ही माहिती वाचकांना उपयुक्त ठरेल. अंकाची किंमत दहा रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.
प्रकाशन कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, विविध महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाचे श्रीमती अलका पाटील, काशिनाथ आरेवार, म. युसूफ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.     
00000


स्वा. रा. तीर्थ मराठवाडा विद्यापिठात लोकराज्य वाचक अभियान संपन्न
लोकराज्य अंक शासकीय योजनांच्या
माहितीसाठी उपयुक्त  - उपजिल्हाधिकारी मोतीयेळे 
नांदेड, दि. 12 :- राज्य शासनाचे मुख्यपत्र म्हणून ओळख असलेला लोकराज्य अंक शासकीय योजनांच्या माहितीसाठी उपयुक्त आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती दिपाली मोतीयेळे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रम येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट हॉल येथे घेण्यात आला. त्यावेळी श्रीमती मोतीयेळे बोलत होत्या.  

यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख राजेश्वर डूडूकनाळे, दुरशिक्षण विभागाचे डॉ. राम जाधव, राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. डी. पवार, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे डॉ. कल्पना कदम, पीपल्स महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक सिद्धेवाड, छायाचित्रकार विजय होकर्णे यांची प्रमुख उपस्थित होते.
श्रीमती मोतीयेळे म्हणाले, राज्य शासनाचे मुखपत्र म्हणून ओळख असलेला लोकराज्य अंक आता दर्जेदार स्वरुपात निघत असून या अंकातून विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला जातो. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वांनी लोकराज्य अंक नियमित वाचला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. 
कुलसचिव डॉ. मुलानी यांनी लोकराज्य अंकात नवीन बदल झाला असून विशेषांक स्वरुपात वाचकांना तो उपलब्ध होत आहे. लोकराज्य अंकाची नोंदणी करावी, असे आवाहन केले.
डॉ. सिद्धेवाड यांनी सप्टेंबर विशेषांकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीसह विविध योजनेची माहिती दिली आहे. विद्यालयाने लोकराज्य नोंदणीसाठी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा असे सांगितले. डॉ. जाधव यांनी लोकराज्य अंकाची किंमत कमी असून तो संग्रही ठेवण्यासारखा आहे, असे सांगितले.
प्रास्ताविकात छायाचित्रकार होकर्णे यांनी लोकराज्य अंक हा शासकीय संदर्भ म्हणून ओळखला जातो. विविध क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अंक उपयुक्त आहे. लोकराज्य अंकातील नवीन बदलाची तसेच लोकराज्य अभियानाविषयी त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. शिवराज बोकडे यांनी केले तर शेवटी विवेक डावरे यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, विविध महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे श्रीमती अलका पाटील, काशिनाथ आरेवार, म. युसूफ, बालनरसय्या अंगली  यांनी परिश्रम घेतले.
लोकराज्य अंकाचे प्रदर्शन व विक्री
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाच्या गेल्या चार वर्षातील अंकांचे प्रदर्शन मांडण्यात आले. अनेक संग्राह्य दुर्मिळ अंकाचा यात समावेश होता. या प्रदर्शनाला मान्यवरांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनचे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी भेट दिली. लोकराज्य अंक विक्री व वार्षिक वर्गणीदार नोंदणी करण्यात आली. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...