Sunday, July 21, 2019


नांदेड तहसिल कार्यालयात
जप्त रेती साठ्याचा गुरुवारी लिलाव

नांदेड,दि. 21 :- नांदेड तालुक्यातील भणगी, गंगाबेट, रहाटी बु, सोमेश्वर, जैतापूर, नाळेश्वर, कोटीतीर्थ, नागापूर, वांगी व सिद्धनाथ येथील अंदाजे 4 हजार 890 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. ईटीएस मोजणीअंती या रेती साठ्याचा जाहीर लिलाव गुरुवार 25 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वा. उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे उपस्थितीत तहसिल कार्यालय नांदेड येथे करण्यात येणार आहे. या लिलावात भाग घेण्यास इच्छुकांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
0000

  


अर्धापूर न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न
न्यायिक कार्यात सक्षम राहून काम केल्यास
न्यायदानासाठी मोलाचे योगदान राहील
-         न्यायमुर्ती प्रसन्न वराळे
नांदेड,दि. 21 :- न्यायिक कार्यात सक्षम राहून काम केल्यास समाजाच्या न्यायदानासाठी मोलाचे योगदान राहील. यातून एकमेकांच्या सहकार्यातून न्यायदानाचे पवित्र कार्य पुढे जाणार असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती प्रसन्न वराळे यांनी अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक अ. धोळकिया हे होते. यावेळी अर्धापूर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती मयुरा यादव, अर्धापूर अभियोक्ता संघाचे अध्यक्ष किशोर देशमुख, आमदार श्रीमती अमिताताई चव्हाण आदिंची उपस्थिती होती.   
न्यायालयाच्या संख्येत वाढ म्हणजे सामाजिक प्रश्न वाढत असल्याचे सांगून न्यायमुर्ती वराळे म्हणाले, एखाद्या वादाचे निराकरण सामोपचाराने मिटत नसेल, तर अशा अपरिहार्य परिस्थितीत शोषित व्यक्ती न्याय मंदिरात प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी येतो.  या प्रकरणात जलद न्याय देण्याच्या प्रयत्नात लोकन्यायालय व ग्राम न्यायालयातून न्याय हा प्रभावीपणे व तात्काळ मिळतो. त्यातून पारंपारिक न्यायालयावरचा भार कमी होतो. लोकन्यायालयात जास्तीत-जास्त प्रकरणे यशस्वीपणे निपटारा होत आहेत, असेही सांगितले.  
न्यायमुर्ती वराळे पुढे म्हणाले, आपल्या संविधानाने न्याय व्यवस्था व समानता यांना एकासुत्रात आणले आहे. देशाची राज्यघटना ही मुलतत्व मानून न्याय व्यवस्था अधिक समाजाभिमूख होईल. राज्य घटनेच्या विधीद्वारे स्थापित व संचलित अशी स्वयंरचना घेऊन न्याय व्यवस्था कार्यान्वित आहे.  बदलणारे कायदे समाजातील बदलानुसार असल्याचे सांगून बदलते कायदे हे समाजातील अपेक्षांचे तसेच नव्याने होणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. युवा वकिलांनी नव्या कायद्‌याकडे लक्ष दयावे आणि सक्षम रहावे. तसेच मानवी व प्राण्यांचे हक्क, सामाजिक जबाबदारी व अधिकार याबाबत विचार मांडले. पर्यावरण, अपुरे पर्जन्यमान, पाणीसाठा याबाबत जागरुक राहून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचाही संदेश दिला.
प्रस्ताविकात प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया म्हणाले, न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात न्यायालय असावे. यातून अर्धापूर तालुक्यातील न्यायालयाची निर्मिती झाली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री गवई यांच्या हस्ते 25 एप्रिल 2009 रोजी या न्यायालयाची निर्मिती झाल्याची माहिती दिली. न्याय आपल्या दारी या उपक्रमामध्ये नांदेड जिल्ह्याला सृजनशील प्रयोग करण्याची संधी मिळाली आहे. राज्यात निवडक तालुक्यात  ग्रामन्यायालयाची निर्मिती झाली आहे. त्यात अर्धापूर तालुक्याला बहुमान मिळालेला होता. कासारखेडा येथे यशस्वीरित्या ग्रामन्यायालय संकल्पना यशस्वी झाली. आता तामसा येथे ग्रामन्यायालय चालू असल्याचे सांगून नांदेड जिल्हा दिवाणी व फौजदारी खटल्याच्या तडजोडीत निपटारा करण्यात आघाडीवर असल्याचे सांगितले. अर्धापूर येथील सुसज्ज या इमारतीचे बांधकाम 50 वर्षाच्या पुढचा विचार करुन नियोजनबध्द झाल्याचे सांगितले. प्रलंबित खटल्याचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी अभिवक्ता संघाच्या सदस्यांनी सहकार्य करण्याचे सूचविले, असे न्या. धोळकिया यांनी सांगितले.  
सुरुवातील अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अर्धापूर अभियोक्ता संघाचे किशोर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन गजानन पिंपरखेडे यांनी केले तर न्यायाधीश श्रीमती यादव यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, नागरिक आदींची उपस्थिती होती.
00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 23.15 मि.मी. पाऊस



नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यात  रविवार 21 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 23.15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 370.42 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 181.63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 19.19 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 21 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 23.75 (172.14), मुदखेड- 26.67 (239.67), अर्धापूर- 33.00 (174.32), भोकर- 30.25 (180.70), उमरी- 34.67 (210.45), कंधार- 25.17 (182.33), लोहा- 24.83 (149.54), किनवट- 26.43 (182.10), माहूर- 34.75 (236.09), हदगाव- 11.57 (135.27), हिमायतनगर- 12.67 (106.02), देगलूर- 2.00 (134.32), बिलोली- 29.20 (252.40), धर्माबाद- 12.00 (146.65), नायगाव- 31.60 (216.00), मुखेड- 11.86 (188.13). आज अखेर पावसाची सरासरी 181.63 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2906.13) मिलीमीटर आहे.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...