Friday, February 13, 2026

वृत्त क्रमांक

इयत्ता १२ वी परीक्षेसाठी 112 केंद्रांवर झूम वेबकाससह 16 फेब्रुवारीपासून ड्रोनद्वारे छायाचित्रण

नांदेड, दि. १३ फेब्रुवारी:- जिल्ह्यात इयत्ता 12 वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाल्या असून इयत्ता 10 वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहेत. इयत्ता 12 वीच्या 112 परीक्षा केंद्रांवर 10 फेब्रुवारीपासून झूम वेबकास्टद्वारे परीक्षा काळात थेट प्रक्षेपण केले जात आहे. हे प्रक्षेपण बैठे पथकाच्या माध्यमातून करण्यात येत असून गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार आता परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी 16 फेब्रुवारी 2026 रोजीच्या इयत्ता 12 वीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरपासून जिल्ह्यातील परीक्षा केंद्र परिसराचे ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यात येणार आहे.

भारतीय न्याय संहिता कलम 163 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा काळात परीक्षा केंद्र परिसरात अनधिकृत व्यक्तींनी प्रवेश करू नये किंवा कोणत्याही प्रकारे नकला देण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी सहकार्य करून परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ooooo

 वृत्त क्रमांक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत

नांदेड, दि. 13 फेब्रुवारी :- महिला व बालविकास विभागाच्या 6 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यापैकी काहींनी कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित/कायम/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत नसल्याबाबत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नसल्याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा 31 मार्च 2026 पर्यंत https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार 31 मार्च 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत दुरुस्तीची संधी दिली जाणार नाही, याची संबंधित लाभार्थींनी नोंद घ्यावी.
ई-केवायसीमधील चुका दुरुस्त करण्याची ही अंतिम संधी असल्याने पात्र लाभार्थी महिलांनी निर्धारित मुदतीपूर्वी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
०००००



 वृत्त क्रमांक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 13 फेब्रुवारी :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोहरादेवी जि. वाशिमकडे प्रयाण करतील. पोहरादेवी वाशिम येथून सायं. 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव 14 व 15 मार्च रोजी होणार

पूर्वतयारीची बैठक संपन्न

नांदेड दि. १३ फेब्रुवारी : - नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव 14 व 15 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून, त्याअनुषंगाने ग्रंथोत्सव 2025 साठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात पूर्वतयारीची बैठक आज संपन्न झाली.

या बैठकीत विविध क्षेत्रातील साहित्यिक, प्रकाशक व ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता. दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध विषयांवरील परिसंवाद, साहित्य चर्चा, पुस्तक प्रदर्शन, लेखक- वाचक संवाद तसेच इतर सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी ग्रंथोत्सवाची सविस्तर रूपरेषा मांडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.


बैठकीस जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हंबिरे, मसापचे सचिव महेश मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिदास बस्वदे, प्रकाशन संघटनेचे निर्मलकुमार सुर्यवंशी तसेच संजय पाटील, राणा मेटकर, संतोष देशमुख, पुंडलिक कदम, जगदीश धोंड, गोविंद वडगावकर, स्वप्नाली पाठक, ललिता गोणारकर, गंगाधर गोणारकर, गजानन देवसरकर, शिवाजी सुर्यवंशी, अजय वट्टमवार आदी उपस्थित होते. प्रताप सुर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
००००००





वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यातील १० विद्यार्थ्यांची ‘इस्त्रो’ अभ्यास दौर्‍यासाठी निवड

नांदेड, दि. १३ फेब्रुवारी:-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजाभज आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा दौरा बेंगलूरु, तिरुवनंतपुरम आणि कन्याकुमारी येथे 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडणार आहे.

राज्यभरातून परीक्षेद्वारे एकूण 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 3 आश्रमशाळांमधील 10 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील हे विद्यार्थी या शैक्षणिक दौर्‍यासाठी रवाना होणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पुढीलप्रमाणे —

स्व. संगीता देवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दहेली तांडा ता. किनवट
कु. संजीवनी शिवाजी चव्हाण

म. फुले मा. व. उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वाघाळा ता. नांदेड
चि. जाधव अमेय प्रेम
चि. हेळगिरे दत्ता बालाजी

विद्यानिकेतन (पब्लिक स्कूल), कमळेवाडी ता. मुखेड जि. नांदेड
चि. आयुष अशोक पोफाळे
चि. करण राम किशन चौगुले
कु. कालेकर आश्विनी निवृत्ती
कु. निकिता धोंडीबा केंद्रे
कु. दुर्गा दत्ता खांडरे
कु. दिक्षा जीवन चव्हाण
चि. राहुल संभाजी शिरसाट

इस्त्रोसारख्या राष्ट्रीय दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, ही बाब नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
०००००

 वृत्त क्रमांक

उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. 13 फेब्रुवारी :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. दमट वातावरण बुरशी च्या वाढीसाठी अनूकूल असते. अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

 

 

भगर खाताना काय काळजी घ्यावी

 

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली  किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्यात ठेवाजेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बूरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.  शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी  खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच  दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटीमळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्ती नुसार मर्यादेतच करावे. भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.

 

भगर विक्रेत्यांसाठी सूचना

 

विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेटपोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र.पॅकींग दिनांकअंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खुले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.

 

अन्न व औषध प्रशासनाच्यवतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

  वृत्त क्रमांक     पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे सोमवारी धर्माबाद येथे आयोजन नांदेड, दि. 6 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार...