Monday, September 21, 2026

वृत्त  

शेकडो सूचनांचा पाऊस ! विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रस्तावावर सखोल आढावा घेणार

परीक्षा व भरती प्रक्रियेत सुधारणांसाठी  टास्क फोर्सचा २४७ विद्यार्थ्यांशी थेट संवाद ! 

निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेची सुरक्षितता व पारदर्शक तपासणीची मागणी

परीक्षा केंद्रांच्या सुविधा व तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्यावर भर

छत्रपती संभाजीनगर, दि. २१ (विमाका) :- राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सने छत्रपती संभाजीनगर विभागातील २४७ विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात थेट संवाद साधला. यावेळी परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तपासणी, पदसंख्या, परीक्षा केंद्रे, निकाल, नियुक्ती, प्रतीक्षा यादी व तक्रार निवारण यासह विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सूचना मांडल्या.

टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस समितीचे सदस्य तथा पोलीस महासंचालक सदानंद दाते, सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, सदस्य तथा नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे समितीचे सदस्य तथा संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले आणि सदस्य तथा आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे सहभागी झाले. या संवाद कार्यक्रमात सातही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांतून विद्यार्थी ऑनलाइन सहभागी झाले होते.

आज सकाळपासून विद्यार्थ्यांनी विविध गटात भेटी देत अनेक सूचना केल्या. टास्क फोर्स सदस्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सूचनाला गांभीर्याने ऐकून घेतले. विद्यार्थ्यांनी परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक निश्चित करून त्याचे पालन करावे, परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमात वारंवार बदल करू नयेत आणि बदल आवश्यक असल्यास पुरेशी पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी केली. विविध संवर्गांतील रिक्त पदांची संख्या वेळेत जाहीर करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जलसंपदा, वैद्यकीय व दंत वैद्यकीय अधिकारी यांसह अन्य पदांची नियमित भरती करावी, अशी सूचनाही करण्यात आली. एकाच उमेदवाराची अनेक पदांवर निवड झाल्यास पदनिवड व पदाचा त्याग (ऑप्टिंग आऊट) याबाबत स्पष्ट धोरण असावे. तसेच रिक्त पदांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रश्नपत्रिका निर्मितीपासून छपाई, वाहतूक व वितरणापर्यंतची प्रक्रिया अधिक सुरक्षित करावी, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीलाही परीक्षेचे स्वरूप व प्रश्नपत्रिकेची माहिती मिळणार नाही, अशी व्यवस्था विकसित करावी आणि प्रश्नपत्रिका फुटीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना विद्यार्थ्यांनी केली. प्रश्नपत्रिकांतील चुका व भाषांतरातील त्रुटी टाळण्यासाठी विषयतज्ज्ञांची मदत घ्यावी. राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची ठेवावी, प्रश्नांची काठिण्याची पातळी विद्यापीठीय अभ्यासक्रमाशी सुसंगत असावी आणि गट-ब व गट-क परीक्षांतील भाषा विषय पात्रता स्वरूपाचे ठेवावेत, अशा सूचनाही मांडण्यात आल्या.

उत्तरपत्रिका तपासणी व गुणांकनासाठी समान निकष निश्चित करून परीक्षकांची गुणवत्ता व पात्रता तपासावी, अशी मागणी करण्यात आली. उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत, प्राथमिक व अंतिम उत्तरतालिका तसेच आदर्श उत्तरे उपलब्ध करून द्यावीत आणि आवश्यकतेनुसार फेरतपासणीची सुविधा द्यावी, अशी सूचना करण्यात आली. कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२३ व राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील उत्तरपत्रिका तपासणी, गुणदान व गुणांतील फरकाबाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. चुकीचे प्रश्न व परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी पुराव्यासह लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन व्ही. राधा यांनी केले.

ऑनलाइन परीक्षांबाबतही विद्यार्थ्यांनी विविध सूचना केल्या. संगणकाधारित परीक्षा घ्यायची असल्यास ती एकाच सत्रात घ्यावी, विविध सत्रांतील गुणांचे समायोजन टाळावे आणि सीसीटीव्ही चित्रीकरण व जैवमितीय पडताळणीसह प्रभावी नियंत्रण व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. सुरक्षित यंत्रणा उपलब्ध होईपर्यंत ऑफलाइन, ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्याची सूचनाही करण्यात आली. पुढील एक वर्ष ऑनलाइन परीक्षा न घेता ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे व्ही. राधा यांनी स्पष्ट केले. ओएमआर परीक्षांसाठी प्रमाणित नियमावली तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षा केंद्रांवर स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व योग्य बैठक व्यवस्था असावी, उमेदवारांनी अर्ज केलेल्या जिल्ह्यातच, शक्य असल्यास, परीक्षा केंद्र द्यावे आणि केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. उमेदवारांच्या तक्रारी व हरकतींसाठी केंद्रीकृत ऑनलाइन व्यवस्था सुरू करून त्यांचे वेळेत निराकरण करावे, अशी सूचना करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत मदत कक्ष व मार्गदर्शक व्हिडिओ उपलब्ध करून द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली.

तांत्रिक पदांसाठी किमान एक वर्षाचा अनुभव, पशुधन पर्यवेक्षकांच्या ३२२ पदांची जाहिरात व अभ्यासक्रम तातडीने प्रसिद्ध करावा, तसेच मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, औषध निरीक्षक व अन्य तांत्रिक पदांच्या प्रश्नपत्रिकांचा दर्जा सुधारावा, अशी मागणी करण्यात आली. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार अधिक संधी द्याव्यात. अभियांत्रिकी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पदांसाठीच्या पात्रता अटींचा पुनर्विचार करावा, अशी सूचनाही करण्यात आली. कृषी सेवा गट - अ, गट - ब व गट - क पदांची एकत्रित जाहिरात तसेच गट - ब व गट - क संवर्गांसाठी सामायिक परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली.

शिक्षक भरतीच्या परीक्षेत बालमानसशास्त्राला प्राधान्य देण्यात यावे, विषयानुसार स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करावी आणि उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना करण्यात आली. कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व विभागीय पोलीस उपनिरीक्षक पदांच्या परीक्षा नियमितपणे घ्याव्यात आणि संभाव्य रिक्त पदांची माहिती वेळेत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. पोलीस भरतीतील १ हजार ६०० मीटर धावण्याच्या चाचणी पद्धतीचा पुनर्विचार करून मृत्यू झालेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.

आरक्षण, प्रमाणपत्रे व विविध योजनांबाबतही सूचना करण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणातील अडचणी दूर कराव्यात, खेळाडू प्रवर्गातील प्रमाणपत्रांची काटेकोर पडताळणी करावी आणि सारथी, बार्टी, महाज्योती व टीआरटीआयच्या योजनांमध्ये पारदर्शकता वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. सीईटीमार्फत अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जात पडताळणी प्रमाणपत्राच्या विलंबामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचनाही करण्यात आली. प्राध्यापक भरतीतील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे व्ही. राधा यांनी सांगितले.

एमपीएससीचे मनुष्यबळ, तांत्रिक क्षमता व संस्थात्मक रचना बळकट करावी, अध्यक्ष व सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि परीक्षा, निकाल व नियुक्तीची प्रक्रिया निश्चित वेळेत पूर्ण करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तमिळनाडू व गुजरात लोकसेवा आयोग तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी उपयुक्त सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे व्ही. राधा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सूचनांसोबत तज्ज्ञांची मते विचारात घेऊन परीक्षा प्रक्रियेची गुणवत्ता, सुरक्षितता व विश्वासार्हता वाढविण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या भरती परीक्षा प्रणालीचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा सुचविणे हे टास्क फोर्सचे उद्दिष्ट आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विभागांतील रिक्त पदे पुनरुज्जीवित करून नियमित भरती करण्यासोबतच जाहिरातीपासून नियुक्तीपर्यंतची प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याची मागणी केली. प्रश्नपत्रिकांतील चुका व संदिग्ध प्रश्न टाळण्यासाठी स्वतंत्र छाननी व्यवस्था, उत्तरतालिकेतील पारदर्शकता, तक्रारींच्या निवारणासाठी अपीलीय प्राधिकरण आणि प्रश्नपत्रिका गळतीच्या तक्रारींची सीसीटीव्ही चित्रीकरणासह सखोल चौकशी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. विविध तांत्रिक पदांच्या पात्रता अटींचा पुनर्विचार, आरक्षणातील अनुशेष भरणे, जात व खेळाडू प्रमाणपत्रांची काटेकोर पडताळणी, तसेच ऑनलाइन परीक्षांतील तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ९ ते १८ सप्टेंबरदरम्यान भरती परीक्षा सुधारणांसंदर्भात ३ हजार ६९४ निवेदने व ९ हजार ६९४ ई-मेल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सुमारे ३ हजार ४३२ ई-मेलला प्रशासनाकडून उत्तरे देण्यात आली आहेत. प्राप्त सूचना व निवेदनांचे ६० विषयांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, त्याआधारे सादरीकरण तयार करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, नुकतेच उत्तीर्ण झालेले उमेदवार व नवनियुक्त कर्मचाऱ्यांकडूनही सूचना घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., सह आयुक्त मंजुषा मिसकर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****








वृत्त क्रमांक 

महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमांतर्गत महिला शेतकऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावी

नांदेड (जिमाका), दि. 21: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलांना अधिकृत ओळख मिळावी आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे, यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्राची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील पात्र महिला शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्राद्वारे शेती किंवा शेतीशी संबंधित कामामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलेला अधिकृत महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्यात येते. महिलेच्या नावावर जमीन असणे हा एकमेव निकष नसून, शेती व संलग्न कृषी कार्यातील प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व देण्यात आले आहे. पीक उत्पादन व लागवड, बीज उत्पादन, फलोत्पादन, फुलशेती, भाजीपाला उत्पादन, पशुपालन व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, गांडूळखत व कंपोस्ट निर्मिती, अळंबी उत्पादन, कृषीमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन यासह विविध शेतीपूरक उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलांचा यामध्ये समावेश होऊ शकतो.

महिला शेतकरी म्हणून अधिकृत नोंदणी झाल्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजना व सुविधांमध्ये महिला शेतकऱ्यांची ओळख सुलभ होण्यास मदत होणार आहे. कृषी कर्ज, पीकविमा, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण, विस्तार सेवा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरू शकते. तथापि, संबंधित योजनांच्या स्वतंत्र पात्रता व नियम लागू राहतील.

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कृषी विभागाच्या  https://share.google/7YBWuuFb4rGtmQ4gG या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्जासाठी अप्लाय नाऊ हा पर्याय निवडून आधार क्रमांक व ओटीपीद्वारे पडताळणी करावी. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल क्रमांक, कृषी कार्याचा प्रकार आदी वैयक्तिक व कृषीविषयक माहिती भरावी. उपलब्ध असल्यास कुटुंबातील सदस्याचा फार्मर आयडी जोडून आवश्यक पडताळणी करावी. भरलेली माहिती तपासून अर्ज सबमिट करावा.

गावातील शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व पात्र महिला भगिनींनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करून घ्यावी. महिलांचा शेतीतील सहभाग अधिकृतपणे नोंदविण्यास तसेच भविष्यातील कृषीविषयक सुविधा व योजनांशी जोडले जाण्यास ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. अर्ज करताना चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ नये. अर्जासंदर्भात अडचण किंवा मार्गदर्शन आवश्यक असल्यास संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

***










वृत्त  

भरती परीक्षांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी शिफारशी देणार - व्ही. राधा

आतापर्यंत पुणे, नागपूर व अमरावती येथे सुमारे १,७५० विद्यार्थ्यांशी संवाद !

छत्रपती संभाजीनगर, दि. २१ (विमाका)- राज्यातील शासकीय भरती परीक्षा  प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाला समिती शिफारशी सादर करेल. परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, परीक्षा केंद्रे, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण, पेपर तपासणी, सामान्यीकरण, निकाल, न्यायालयीन प्रकरणे आणि नियुक्ती प्रक्रिया अशा विविध मुद्यांचा  अभ्यास करून ह्या शिफारशी समिती सुचवेल, अशी माहिती भरती परीक्षा उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षा तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली.

भरती परीक्षा सुधारण्यासाठी गठित उच्चस्तरीय समितीने छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी समितीचे सदस्य तथा पोलीस महासंचालक सदानंद दाते, सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी आणि सदस्य तथा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते.

श्रीमती व्ही. राधा यांनी पत्रकारांना माहिती दिली की, समितीने आतापर्यंत पुणे, नागपूर आणि अमरावती येथे विद्यार्थी व उमेदवारांशी संवाद साधला आहे. पुण्यात सुमारे ६००, नागपुरात ३५० आणि अमरावतीत ८००, अशा सुमारे १ हजार ७५० विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच समितीला २० हजारांहून अधिक ई-मेल प्राप्त झाले असून, समितीने दिलेल्या ई-मेलवर १ हजार ४०० हून अधिक जणांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून निवेदने दिली आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतींचे निश्चित वेळापत्रक असावे, अशी प्रमुख मागणी केली आहे.

परीक्षा पद्धतीत सातत्य असावे आणि बदल आवश्यक असल्यास उमेदवारांना पुरेसा अवधी द्यावा, एकदाच नोंदणी व शुल्क आकारणी करावी, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, उत्तरतालिका आणि पेपर तपासणी अधिक पारदर्शक असावी, अशा सूचना विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. परीक्षा केंद्रांसाठी किमान सुविधा व निकष, पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण, निकाल व नियुक्ती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, तसेच एमपीएससीशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे आणि भरती प्रक्रियेतील अडचणींचाही अभ्यास करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत.

परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने घेतली तरी गैरप्रकारांना प्रतिबंध करणारी सुरक्षित व्यवस्था असावी. प्रश्नपत्रिका गळती रोखण्यासाठी विविध राज्ये आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतींचा अभ्यास केला जाईल. परीक्षा केंद्रांसाठी किमान सुविधा, पर्यवेक्षकांची निवड व प्रशिक्षण, प्रश्नपत्रिका वितरण आणि परीक्षा संचालनासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतही विचार करण्यात येणार आहे. विविध सत्रांतील परीक्षांसाठी सामान्यीकरणाची पद्धत स्पष्ट असावी, यासाठी संबंधित संस्थांच्या पद्धतींचा अभ्यास केला जाईल.

परीक्षा रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती असावी आणि निवड झालेल्या उमेदवारांचे हित सुरक्षित राहावे, याचाही विचार केला जाणार आहे. निकाल, प्रतीक्षा यादी आणि नियुक्त्या वेळेत पूर्ण करण्यासोबतच परीक्षा प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी उपाययोजनांचा अभ्यास केला जाईल. परीक्षा वेळेत न झाल्यामुळे वयोमर्यादेच्या दृष्टीने उमेदवारांचे नुकसान होत असल्यास त्याबाबतही विचार करण्यात येणार आहे.

श्री. सदानंद दाते म्हणाले, विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सर्व सूचनांचे दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही राज्य शासनासाठी महत्त्वाची संस्था असून, विद्यार्थ्यांच्या भावना व सूचना एकत्रितपणे विचारात घेऊन परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास केला जाईल. प्राप्त सूचनांच्या आधारे शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.

श्री. डॉ. एन. रामास्वामी यांनी सांगितले, उमेदवारांच्या पात्रतेचे निकष स्पष्ट असावेत. परीक्षा केंद्रांची किमान गुणवत्ता, पर्यवेक्षकांची निवड व प्रशिक्षण, प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता तसेच परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षितता यावर लक्ष देणे आवश्यक आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, परीक्षा केंद्रांचे ऑडिट आणि पेपर तपासणीची कार्यपद्धती अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याबाबतही विचार केला जात आहे.

श्री. प्रवीण गेडाम म्हणाले, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, संगणकाधारित व ऑफलाइन परीक्षा पद्धती, वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्रांवरील सुविधा, वेटिंग लिस्ट, ऑडिट तसेच पेपर तपासणीबाबत अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यात येतील.

पुढील परीक्षेसाठी सुमारे १२ लाख उमेदवारांनी अर्ज केले  असल्याने आवश्यक पायाभूत सुविधा व मनुष्यबळाचा आढावाही घेतला जाणार आहे. समितीचा विभागनिहाय दौरा  येत्या ३० सप्टेंबरला पूर्ण होईल त्यानंतर तीन महिन्यांत अहवाल पूर्ण करण्यात येणार असून, विद्यार्थी, पालक व तज्ज्ञांकडून प्राप्त सूचनांचा अभ्यास करून भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह, कार्यक्षम आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला अभ्यासपूर्ण शिफारशी सादर करण्यात येतील, असे व्ही. राधा यांनी सांगितले.

याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जी.श्रीकांत , जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी उपस्थित होते 

***



वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘येलो अलर्ट’ 

वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ; 

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. २१ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

२१, २२ व २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच २३ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट यांसह मुसळधार पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुन्हे यांनी केले आहे.

विजा चमकत असताना घ्यावयाची काळजी

विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास जवळच्या सुरक्षित इमारतीचा आश्रय घ्यावा. सुरक्षित इमारत उपलब्ध नसल्यास सखल जागी जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये.

घरातील विद्युत उपकरणे बंद करून शक्य असल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करावा. तारांचे कुंपण, विद्युत खांब तसेच इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. पाण्यात असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी बाहेर पडावे.

या गोष्टी टाळाव्यात

विजा चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर, शॉवरखाली अंघोळ करणे, नळ अथवा पाण्याच्या पाइपलाइनला स्पर्श करणे तसेच विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू असताना लोखंडी सांगाड्याच्या तंबूत किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नये.

उंच झाडांच्या खाली थांबू नये. धातूच्या उंच मनोऱ्यांजवळ उभे राहू नये. घरात असताना उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये. या काळात नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून सुरक्षित ठिकाणी राहावे, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.

****

  वृत्त क्रमांक   नांदेड शहरातील श्री सूर्य गणेश मंडळ येथे लोकसंवादाचा जागर • लोकसंवाद कार्यक्रमातून नागरिकांना दिली वैद्यकीय सहाय्यता व रोज...