वृत्त क्रमांक
नांदेड शहरातील श्री सूर्य गणेश मंडळ येथे लोकसंवादाचा जागर
• लोकसंवाद कार्यक्रमातून नागरिकांना दिली वैद्यकीय सहाय्यता व रोजगाराच्या संधींची माहिती
नांदेड (जिमाका), दि. 21 : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकसंवाद उपक्रमांतर्गत नांदेड शहरातील जुना मोंढा परिसरातील मागील 55 वर्षांपासून कार्यरत असलेल्या श्री सूर्य गणेश मंडळ येथे आज लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपलब्ध होणारे अर्थसहाय्य तसेच युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय ‘रोजगार महाकुंभा’बाबत यावेळी नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीची माहिती
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र रुग्णांना गंभीर व दुर्धर आजारांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची माहिती दिली. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे सादर करावा तसेच अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहिती कशी मिळवावी, याबाबत त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
गंभीर आजार, अपघात किंवा अन्य आरोग्यविषयक संकटामुळे कुटुंबावर अचानक आर्थिक भार पडल्यास पात्र रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळू शकते. नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना आर्थिक मदतीसाठी मुंबईला जावे लागू नये, यासाठी 1 मे 2025 पासून जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्ष कार्यरत करण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र रुग्णांना नांदेड जिल्ह्यातूनच आर्थिक मदतीसाठी अर्ज करता येत असून अर्जाच्या कार्यवाहीची माहितीही जिल्हास्तरावरील कक्षातून मिळू शकते.
नांदेड जिल्ह्यातील युवकांनी रोजगार महाकुंभाचा लाभ घ्यावा
युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नांदेड जिल्ह्यात मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यात 25 ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय ‘रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार महाकुंभामध्ये स्थानिक तसेच इतर ठिकाणच्या नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार आहेत.
या रोजगार महाकुंभामध्ये 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा (सर्व ट्रेड) तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी प्रवीण रुद्रकंठवार यांनी केले.
लोकसंवादाच्या माध्यमातून शासनाच्या योजना, सुविधा व उपक्रमांची माहिती नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन उपलब्ध योजनांची माहिती जाणून घ्यावी व पात्रतेनुसार शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे वैद्यकीय समन्वयक संभाजी लोंढे, कौशल्य विकास विभागाचे कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी विरेंद्र चव्हाण, श्री सूर्य गणेश मंडळाचे पदाधिकारी लड्डू पुरोहित, आकाश ठाकूर, श्रीकांत ठाकूर, दीपक ठाकूर, अशोक भागवत, राहुल भागवत, मुकुंद येरमवार, दैनिक प्रजावाणीचे गोवर्धन बियाणी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
***
No comments:
Post a Comment