Thursday, June 4, 2026

 वृत्त क्रमांक 

अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी

उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि. 4 जून : महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या "अमृत पर्यटन" उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी सुरु असून लाभार्थी हा अमृतच्या लक्षित गटाचा असावा अशी महत्वाची सूचना जिल्हा व्यवस्थापक सौरभ संतोष माळहिप्परगेकर यांनी दिली आहे. 

अमृत पर्यटन हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने व पर्यटन व्यवसायांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, या क्षेत्रात व्यवसाय विस्तार, रोजगार निर्मिती व आर्थिक प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा आणि त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये प्राप्त व्हावीत, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायिक, टुरिस्ट गाईड, कुक आणि केटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात.

कार्यक्रमादरम्यान सहभागी उद्योजकांना व्यवसाय उभारणी व विस्तारासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रभावी व्यवसाय नियोजन, आधुनिक विपणन तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नवीन व्यावसायिक संधी तसेच शासनाच्चे विविध उपक्रम व सहाय्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

तसेच अनुभवी तज्ज्ञ व क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असून, सहभागी उद्योजकांना पर्यटन व्यवसाय अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन मिळणार आहे.

अमृत पर्यटन अंतर्गत पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमाचा लाभ पर्यटन क्षेत्रातील संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक आणि इच्छुक युवक-युवतीनी घ्यावा असे आवाहन आयोजनकांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी अमृत नांदेड जिल्हा कार्यालय, अष्टविनायक नगर, कॅनाल रोड, तरोडा नाका नांदेड (7391065472/8600240032/7083868522) वर संपर्क साधावा असेही कळविले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026

3 उमेदवारा निवडणूक रिंगणात

5 उमेदवारी अर्ज मागे

नांदेड दि. 4 जून : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक- 2026 साठी तीन उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. तर 5 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. 

निवडणूक लढविणारे उमेदवारांचे नाव व पक्ष पुढीलप्रमाणे आहेत. 

1) श्री. अमरनाथ राजूरकर- पक्ष- भारतीय जनता पार्टी

2) श्री. कृष्णा नागेश पाटील, पक्ष- अपक्ष

3) श्री. प्रशांत विराज इंगोले, पक्ष-अपक्ष 

उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 

1) श्री. पवार माधवराव निवृत्तीराव, मु.पो. जवळगाव ता. हिमायतनगर जि. नांदेड

2) श्री. चिखलीकर प्रवीण प्रतापराव , मु.पो. चिखली ता. कंधार जि. नांदेड 

3) श्री. ज्योतिबा जयरामजी खराटे, वार्ड क्र. 2 रामलीला निवास मु.पो.अंजनखेड ता. माहूर जि. नांदेड

4) श्री. पंकज माणिकराव गायकवाड, गायकवाड गल्ली, मुखेड ता. मुखेड जि. नांदेड

5) श्री. रामदास शिवराज पाटील, फरांदे पार्क टाऊनशिप नांदेड 

00000




 वृत्त क्रमांक 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा;                  ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. ४ जून : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी (दि. ४) पहाटे १.३० वाजता पिंपळगाव निमजी येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई केली. या कारवाईत दोन बोटी, २० तराफे जाळून नष्ट करण्यात आले असून सुमारे १२५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजित किंमत ३० लाख रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.

अचानक केलेल्या पाहणीत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तत्काळ तहसीलदार संजय वारकड यांना माहिती दिली. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली. यावेळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

कारवाईदरम्यान नदीच्या दुसऱ्या बाजूने हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर यांनाही सतर्क करण्यात आले. संयुक्त पथकाने दोन बोटी व २० तराफे नष्ट करून मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली.

दरम्यान, कारवाईनंतर परतत असताना शहर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहनेही पकडण्यात आली. ही वाहने पुढील कारवाईसाठी वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली. तसेच घटनास्थळी आढळलेल्या चार मजुरांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या मोहिमेत तहसीलदार संजय वारकड, पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण ओमकांत चिंचोलकर, श्री केंद्रे, श्री मठवाड पोलीस उपनिरीक्षक, श्रीकृष्ण येलमटे, सय्यद मोहसीन मंडळ अधिकारी, सर्व तलाठी माधव भिसे , सरपे ,मारुती श्रीरामे , वानोळे, डॉ.जोशी मारुती कदम, राजेश बरोडा, कोतवाल बालाजी सोनटक्के इत्यादींनी सदरील कारवाई केली आहे. पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी सहभाग घेतला.

अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध प्रशासनाची कारवाई यापुढेही सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.

00000





 वृत्त क्रमांक 

लिंबगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

नांदेड, दि. ४ जून : ‘एक दिवस मुक्काम खेड्यामध्ये’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल रात्री ३ जून रोजी नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथे भेट देऊन मुक्काम केला. यावेळी त्यांनी गावातील विविध कामांची पाहणी करत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी परिसरातील वृक्षारोपण, घरकुल लाभार्थी, संजय गांधी व इंदिरा गांधी निराधार योजनेचे लाभार्थी तसेच अंत्योदय योजनेतील कुटुंबांना प्रत्यक्ष भेट दिली. गावातील विविध समस्या आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठक  घेण्यात आली. यामध्ये स्थानिक प्रश्नांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री.देशमुख, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार व सुनील माचेवाड, पोलीस उपनिरीक्षक सय्यद, मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे, तलाठी अंजुषा जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन संशोधन, पीककर्ज आणि पीकविमा योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे ग्रामस्थांना आपले प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळाली. त्यांच्या भेटीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.

०००००














  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ : #कर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाराष्ट्रशासन