Friday, June 12, 2026

वृत्त क्रमांक 

जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली ; दोन अल्पवयीन मुलांची सुटका 

नांदेड दि. 13 जून : जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त शुक्रवार 12 जून रोजी कामगार विभागामार्फत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ कार्यालय परिसरातून करण्यात आला. सहाय्यक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती रॅलीस प्रारंभ करण्यात आला. 

यावेळी कामगार विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे प्रतिनिधी, महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते तसेच इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रॅलीपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विविध आस्थापना, हॉटेल्स, व्यावसायिक प्रतिष्ठाने व मॉल्स यांना भेटी देण्यात आल्या. बालकामगार न ठेवण्याबाबत संबंधित आस्थापनांकडून हमीपत्रे घेण्यात आली तसेच बालकामगार प्रतिबंधक संदेश असलेले स्टिकर्स लावून जनजागृती करण्यात आली. 

अभियानादरम्यान ढवळे कॉर्नर परिसरातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार कामगार विभागाने पोलिस विभागाच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करून संबंधित अल्पवयीन मुलांची सुटका (Rescue) केली. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 

बालकामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा अधिनियम 2016 नुसार 14 वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात अथवा प्रक्रियेत कामावर ठेवणे दंडनीय गुन्हा आहे. तसेच 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक व्यवसायांमध्ये रोजगार देण्यास मनाई आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नियोक्त्यांवर कारावास व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. 

कामगार विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही बालकामगार आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ कामगार विभाग, पोलिस विभाग किंवा संबंधित प्रशासनाला द्यावी. बालकामगारमुक्त समाज निर्मितीसाठी सर्व घटकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सहायक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांनी  नमूद केले.

00000



 

वृत्त क्रमांक 

ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणच्‍यावतीने मान्‍सून पूर्व रंगीत तालीम संपन्‍न

नांदेड, दि. 12 जून : नांदेड ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालयाच्‍यावतीने ज‍िल्‍हास्‍तरीय मान्‍सून-2026 पूर्व तयारी- पूर परिस्‍थीतीमध्‍ये करावयाचे शोध व बचाव कार्याबाबत रंगीत ताल‍िम सराव सत्र काळेश्‍वर घाट व‍ि‍ष्‍णुपुरी नांदेड येथे आज संपन्न झाले. ज‍िल्‍हाध‍िकारी तथा ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणचे अध्यक्ष राहुल कर्ड‍िले यांच्‍या आदेशानुसार न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी तथा ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणचे मुख्‍य कार्यकारी अध‍िकारी किरण अंबेकर यांच्‍या मार्गदर्शन व प्रमुख उपस्‍थ‍ितीत सदर रंगीत तालीम सराव सत्र संपन्‍न झाले. 

या रंगीत तालीममध्‍ये पूर परि‍स्‍थ‍ितीमध्‍ये शोध व बचाव कार्य कसे करायचे, काय पुर्व तयारी करायची, आयआरबी बोट कशी असेंबल करायची तसेच  पुर परिस्‍थ‍ितीमध्‍ये शोध व बचाव कार्यास आवश्‍यक साह‍ित्‍य पर‍िचय तसेच ते साह‍ित्‍य कशाप्रकारे हाताळायचे याबाबत प्रश‍िक्षण व प्रत्‍यक्ष हाताळण्‍याबाबत सराव देण्‍यात आले. सदर रंगीत ताल‍िमेत प्रश‍िक्षण हे ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय, नांदेड, नांदेड वाघाळा शहर महानगरपाल‍िका नांदेड अंतर्गत असलेले अग्‍नीशमन दल, नांदेड पोलीस श‍िघ्र प्रत‍िसाद दल, ज‍िल्हा शल्‍य च‍िकित्‍सक कार्यालयाचे वैद्यकीय पथक, तहस‍िल कार्यालय नांदेड यांच्याकडुन संयुक्‍त समन्‍वयातून देण्‍यात आले.

यावेळी नांदेड शहर महानगरपाल‍िकेच्‍यावतीने अग्‍नीशमन अध‍िकारी केरोजी दासरे यांच्‍यासोबत उपअग्‍नीशमन अध‍िकारी न‍िलेश कांबळे यांनी आयआरबी बोट कशी असेंबल करायची व पूर परिस्‍थ‍ितीमध्‍ये शोध व बचाव कार्य कसे करायचे व त्‍याकरीता कोणती साह‍ित्‍य वापरायची याबाबत सखोल मार्गदर्शन केले, पोल‍िस व‍िभागाच्‍यावतीने उप‍अध‍िक्षक श‍िंदे साहेब यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत पीआय दर्शने यांच्‍यासह क्‍युआरटीचे ज्ञानोबा चोंडे यांनी पोल‍िस श‍िघ्र प्रत‍िसाद दला कडून मागील वर्षी करण्‍यात आलेल्‍या शोध व बचाव कार्याबाबतची माहिती द‍िली तसेच ज‍िल्‍हा शल्‍य च‍िकित्‍सक कार्यालयामार्फत डॉ. सुनील कुलकर्णी व सच‍िन कोताकोंडावार यांनी स‍िपि‍आर बाबत सखोल माहिती द‍िली व प्रत्‍यक्ष सराव प्रात्‍याक्षीक करुन घेतले.

यावेळी न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी किरण अंबेकर यांनी मागील वर्षी शोध व बचाव कार्य चांगल्‍या पध्‍दतीने केल्‍याबद्दल सर्व संबंधीत यंत्रणांचे कौतुक केले. यावर्षी सर्वानी प्रश‍िक्षीत होऊन एकमेंकाच्‍या समन्‍वयातून आपण मान्‍सून 2026 करीता चांगल्‍या पध्‍दतीने तयारी करु या सज्‍ज राहुया असे मनोगत व्‍यक्‍त केले.  व‍िठ्ठल परळीकर तहस‍िलदार लोहा, संजय वारकड तहस‍िलदार नांदेड यांनी मागील वर्षीचे पुर शोध व बचाव कार्याबाबतचे अनुभव मांडले तसेच यावर्षीच्‍या मान्‍सून करीता आपण सर्व तयारीन‍िशी सज्‍ज राहावे असे मनोगत व्‍यक्‍त केले. तर तालुका आरोग्‍य अध‍िकारी डॉ.जगदीश कांबळे व डॉ.प्रवीण मुंडे  यांनी मान्‍सून मध्‍ये आरोग्‍याची कशी दक्षता घ्‍यावी, पाणी शुध्‍दीकरण व पूर पर‍िस्‍थ‍िती नंतर घ्‍यावयाची काळजी बाबत तसेच गरोदर मह‍िलाबाबत काय दक्षता घ्‍यावी याबाबत मार्गदर्शन केले, सदर रंगीत तालि‍म प्रश‍िक्षणाचे समन्‍वाची भुमिका किशोर कु-हे ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी यांनी पार पाडली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसि‍लदार सुन‍िल माचेवाड यांनी केले तर प्रास्‍तवीक गौरव त‍िवारी डीडीएमएस, आभार प्रदर्शन बारकुजी मोरे महसूल सहायक यांनी केले. यावेळी नांदेड ज‍िल्‍हयातील सोळा तहस‍िल कार्यालय, पंचायत समिती, कृषी, आरोग्‍य, नगरपाल‍िका, पोल‍िस व‍िभागातील जवळपास अडीचशे ते त‍िनशे अध‍िकारी कर्मचारी यांनी या प्रश‍िक्षणात सक्रीय सहभाग घेतला. सदर रंगीत ताल‍िम यशस्‍वी करण्‍याकरीता ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड व तहस‍िल कार्यालय नांदेडच्‍या अध‍िकारी कर्मचारी यांनी पर‍िश्रम घेतले.

000000





















वृत्त क्रमांक 

नांदेड तालूक्यात आपले सरकार सेतू चालक यांची बैठक संपन्न

नांदेड दि 12 जून :- महसूल विभागामार्फत देण्यात येणारे दाखले व इतर सेवा शासनाच्या विविध योजना बाबत शासन निर्णयानुसार  व सेवांच्या प्रक्रियेचे  सुलभीकरण Goverance Process Re-engineering (GPR) ,अंतर्गत  कार्यवाही राबविणे व सुलभता आणणे बाबत नांदेड तालूक्यातील  आपले सरकार  सेतू चालक व ग्राम पंचायत आपले सरकार सेतू चालक तसेच प्रमाणपत्र संबंधित अधिकारी व कर्मचारी  यांची संयुक्त बैठक आज रोजी तहसिल कार्यालय नांदेड येथे दु  1 वा आयोजित करण्यात आली होती. 

बैठकीत नांदेडचे उपविभागिय अधिकारी डाॅ.सचिन खल्लाळ  व तहसिलदार नांदेड संजय वारकड यांनी GPR अनुषंघाने शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात यावी  व सेतू केंद्रांत दर्शनी भागात भाव फलक लावणे,ग्राम पंचायत सेतू केंद्रातून महसूलचे विविध दाखले सेवा देणे,अर्जदार यांना प्रमाणपत्र मुदतीत वितरण करणे अशा सुचना दिल्या.

यावेळी नायब तहसिलदार सुनिल माचेवाड,स्वप्निल दिगलवार,आपले सरकार सेतू  जिल्हा समन्वयक केदार चोपडे व तालूक्यातील  आपले सरकार  सेतू चालक अदि उपस्थित होते.

०००००



वृत्त क्रमांक 

संत भगवानबाबा वसतिगृह प्रवेशासाठी ऊसतोड कामगारांच्या पाल्यांनी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 12 जून : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी समाज कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. समाज कल्याणच्यावतीने नांदेड जिल्ह्यात मुखेड व कंधार या तालुक्यातील संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृहा शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा ऊसतोड कामगाराच्या पाल्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सतिगृहा संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील मुखेड व कंधार या तालुक्यात 100 क्षमतेची मुलांसाठी एकूण 2 वसतिगृहे सुरू करण्यात आले असून यामुळे दुर्गम भागातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे. प्रवेशीत सर्व विद्यार्थ्यांना निवास, भोजनाची व्यवस्था मोफत दिली जाईल. तसेच शालेय पुस्तके आणि स्टेशनरीचे विनामूल्य वाटप करण्यात येईल. 

प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या दरमहा 500 रुपये भत्ता थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याकरीता विद्यार्थ्यांचे आई-वडील अधिकृत ऊसतोड कामगार असणे आवश्यक आहे. चालू शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या पात्र विद्यार्थी मुखेड, कंधार या तालुक्यातील संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वस्तीगृहे या ठिकाणी थेट संपर्क साधून आपले अर्ज सादर करावेत, असेही आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने 

ऑनलाईन योग सत्रामध्ये सहभागी होऊन गिनीज बुकमध्ये जागतिक विक्रम करण्याबाबत 

ऑनलाईन योग सत्र 14 जून रोजी सकाळी 6.15 ते 7.15 पर्यंत 

नांदेड दि. 12 जून:- आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत योगाचा प्रसार, जनजागृती तसेच नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर ऑनलाइन योग सत्र 14 जून, 2026 रोजी सकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत आयोजित करण्यात येणार असून, या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस असल्याचे या उपक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, भारत सरकार व हॅबिल्ड हेल्थटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.

सदर योग सत्राचे प्रक्षेपण आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्युब प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे. उपक्रमामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी टोल फ्री क्रमांक 1800-315-7008 वर मिस्ड कॉल देऊन पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सहभागीस सत्राची लिंक व आवश्यक सूचना संदेशाद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार प्रत्येक सहभागीने स्वतःच्या स्वतंत्र डिजिटल उपकरणावरून (मोबाईल / लॅपटॉप/ टॅब) सत्रात लॉग-इन करणे आवश्यक राहील. नोंदणीकृत प्रत्येक उपकरणाची स्वतंत्र सहभाग नोंद ग्राह्य धरण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयातील विविध क्रीडा संघटनेचे खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, पदाधिकारी, विद्यापीठे, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था व इतर संबंधित यंत्रणांना तसेच, योगविषयक जनजागृती, प्रचार व प्रसार कार्यामध्ये कार्यरत विविध संस्था, संघटना, शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), नेहरू युवा केंद्रे, स्वयंसेवी संस्था तसेच औद्योगिक आस्थापना यांना आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याबाबत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

00000

वृत्त क्रमांक 

अन्न व औषध प्रशासनाने बारड येथील दुध संकलन केंद्रावर केली तपासणी 

नांदेड दि. 12 जून :- अन्न व औषध प्रशासनाचे अन्न  सुरक्षा आयुक्त म. राज्य  तुकाराम मुंडे यांचे आदेशाने व अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (अन्न), छत्रपती संभाजी नगर श्रीकांत करकाळे यांचे मार्गदर्शनाखाली 11 जून रोजी नांदेड कार्यालयाचे  सहायक आयुक्त (अन्न ) रा.मा. भरकड व अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, अविनाश गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, नमुना सहायक बालाजी सोनटक्के यांनी बारड ता.मुदखेड जि.नांदेड या गावी  पहाटे ५ ते ७ चे दरम्यान एकूण 7 विविध दुध संकलन केंद्राची तपासणी करून एकून 13 दुध व दुग्धजन्य पदार्थाचे नमुने घेवून  ते तपासणीस्तव  प्रयोगशाळेत  पाठविण्यात आले  आहेत.  तपासणीस्तव घेण्यात आलेले एकून 13  नमुने पैकी गायीचे दुधाचे -5 नमुने, म्हशीचे दुधाचे - 6 नमुने, पनीर- 1 नमुना व दही - 1 नमुना  आहेत.

तसेच तपासणी  दरम्यान एका पेढीकडे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने त्या पेढीस नोंदणी प्रमाणपत्र  प्राप्त होईपर्यंत व्यवसाय  बंद करणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहेत अशी माहिती, सहायक आयुक्त (अन्न ) रा.मा. भरकड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

00000

वृत्त क्रमांक 

"समाधान समारोह" अंतर्गत होणाऱ्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीमध्ये 

आपली प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याचे शरदजी देशपांडे यांचे पक्षकारांना अवाहन

नांदेड दि. 12 जून : मा. सर्वोच्च न्यायालय यांच्यावतीने "समाधान समारोह" ची सुरूवात 21 एप्रिल 2026 पासून झाली आहे. त्यामध्ये दिनांक 21, 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे "विशेष लोकअदालत" चे आयोजन करण्यात आले असून मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात येणार आहेत.

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचे व पैशाचे महत्त्व लक्षात घेता या विशेष लोकअदालतीमध्ये प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे ज्यांची प्रकरणे प्रलंबित असतील त्यांनी आपला अमुल्य वेळ व पैसा वाचविण्यासाठी दोन्ही बाजुंच्या पक्षकारांनी थोडीसी माघार घेवून आपसात तडजोड घडवून आणन्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच त्यांचा अमुल्य वेळ व पैसा वाचेलच तसेच त्यांचा वाद त्यांच्या दोघांच्या सहमतीने मिटल्यामुळे आपसी हितसंबंध कायम राहण्यास मदत होईल.

अशी प्रकरणे मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व नरेन्द्र के. ब्रह्मे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली शरद जी. देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांचे निजीकक्षात सदरील प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याबाबत पूर्व बैठकिची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

त्यानुषंगाने या पूर्व बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांस आवाहन करण्यात येत असून मा. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय परिसर नांदेड या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा पुढे दिलेल्या गुगल लिंकद्वारे आभासी पध्दतीने उपस्थित राहून आपली प्रकरणे आपल्या जिल्हयातूनच मिटविण्यासाठी आलेल्या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शरद जी देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांनी केले आहे. 

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड तसेच जवळच्या न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधावा. आभासी पध्दतीने व्हिडीओ कॉलद्वारे प्रकरणात सहभागी होण्यासाठीची गुगल लिंग https://meet.google.com/ myt-niru-ghp  उपलब्ध करुन दिली आहे.

000000

वृत्त क्रमांक 

स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी

नांदेड दि. 12 जून : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना कार्यरत आहे. सदरहू योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील नियम व अटी शर्तीची पुर्तता करुन अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज परीपुर्ण भरुन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या कार्यालयास सादर करण्यात यावा.

प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडुन स्वत: मंजुर करुन घेणे आवश्यक आहे. प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वः हिस्सा कर्ज खात्यात जमा करणे बंधनकारक राहील. प्रकल्प किंमतीच्या 15 टक्के मार्जिन मनी कर्ज खात्यात शासनाकडुन एनईएफटी/आरटीजीएसद्वारे जमा करण्यात येते. ज्या प्रकल्पासाठी या योजनेचा लाभ घेण्यात आला आहे, त्याच प्रकल्पावर सदरची रक्कम खर्च करणे बंधनकारक आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील सुशिक्षीत बेरोजगार यांच्याकडुन सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत असून सदरचा ऑफलाईन अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. सुशिक्षीत बेरोजगार यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केली आहे.

000000

वृत्त क्रमांक 

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती त्रैमासिक आढावा बैठक संपन्न

नांदेड दिनांक १२ जून :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नाकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे यांनी २०२५-२६ तसेच एप्रिल-मे २०२६ मध्ये जिल्ह्यात झालेल्या कामाचा सर्व निर्देशकांनुसार अहवाल सादर केला.

यामध्ये एचआयव्ही तपासणी, एआरटी नोंदणी, तालुकानिहाय पॉझिटिव्हिटी, गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी, टीबी रुग्णांची एचआयव्ही तपासणी तसेच राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत सामाजिक संस्थांचा आढावा घेण्यात आला. तसेच 'मिशन एड्स सुरक्षा' अंतर्गत जिल्ह्यातील ९५-९५-९९ यांचा आढावा आणि ते लक्ष्य साध्य करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाअंतर्गत केले जाणारे कार्य उपस्थितांसमोर सादर केले.  अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार लक्ष्य साध्य करण्यासाठी पुढील रूपरेषा निश्चित करण्यात आली. याकरिता डीसीआरजी (DCRG) समूहातील सदस्यांनी पुढाकार घेऊन मदत करण्याबाबत आवाहन करण्यात आले. 

तसेच जिल्ह्यातील वाहतुकीच्या रस्त्यांचे जाळे मोठे असल्या कारणाने अतिजोखमीच्या गटांपैकी एक असलेल्या ट्रकर्स/ड्रायव्हर्स यांच्याकरिता विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याबाबत सामाजिक संस्थांना सूचित करण्यात आले. सदर बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, आरोग्य अधिकारी मनपा डॉ. गजानन रिठे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी एआरटी डॉ. प्रदिप जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी, माहिती अधिकारी श्रीमती अलका पाटील, जिल्हा आरसीएच अधिकारी, डीसीआरजी सदस्य, अशासकीय संस्थांचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

0000



वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यातील रुग्णालयांचे अंगीकरण होण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक संपन्न

नांदेड, दि. 12 जून : सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने आज रुग्णालयांचे अंगीकरण होण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे स्वीय सहाय्यक डॉ. आनेराव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.  

यावेळी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना यांचा एकत्रित लाभ मिळावा, यासाठी अधिकाधिक खाजगी रुग्णालयांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील 10 व त्यापुढील बेड क्षमतेच्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत राज्य आरोग्य सोसायटी, वरळी (मुंबई) येथील सहाय्यक संचालक डॉ. रवींद्र शेटे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध आरोग्य सेवांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी सांगण्यात आले की, या योजनांमुळे पात्र आणि गरजू रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध होत असून त्यामुळे त्यांच्यावर होणारा आर्थिक ताण कमी होण्यास मदत होते. तसेच काही उपचारांसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात सध्या एकूण 256 रुग्णालये असून त्यापैकी 142 रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत. बाकी 114 रुग्णालये अद्याप या योजनांशी संलग्न नाहीत. त्यामुळे संबंधित रुग्णालयांनी या योजनांमध्ये सहभागी होऊन अधिकाधिक रुग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीदरम्यान उपस्थित अंगीकृत रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी आणि सूचना देखील मांडल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे स्वीय सहाय्यक डॉ. आनेराव, जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, राज्य आरोग्य सोसायटीचे सहाय्यक संचालक डॉ. रवींद्र शेटे, जिल्हा समन्वयक आयुष्मान भारत डॉ. दीपक वाघमारे, महानगरपालिकेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रिटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी तसेच नांदेड जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

00000




वृत्त क्रमांक 

वर्ल्ड योगा चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेता श्रेयस मार्कंडेय यांचा नांदेड जिल्हा प्रशासनाकडून गौरव

नांदेड, दि. १२ जून : अहमदाबाद येथे आयोजित वर्ल्ड योगा चॅम्पियनशिप 2026 मध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविणाऱ्या नांदेड येथील श्रेयस मार्कंडेय यांचा जिल्हा प्रशासन नांदेड व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे,  विविध योग समितीचे योगाचारी उपस्थित होते. 

अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी श्रेयस मार्कंडेय यांचे अभिनंदन करताना सांगितले की, जिद्द, समर्पण, सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट योगकौशल्याच्या बळावर त्यांनी भारतासह महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांचे हे यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

श्रेयस मार्कंडेय यांनी कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे अनेक युवा योगसाधकांना नवी प्रेरणा मिळणार असून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसही नवी दिशा मिळेल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने श्रेयस मार्कंडेय यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

0000



वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ; ३ लाख ८८ हजार ५२६ बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट

जिल्हा टास्क फोर्स व सुकाणू समितीची आढावा बैठक संपन्न; 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबवणार जनजागृती मोहीम

नांदेड दि. 12 जून:- आगामी २८ जून २०२६ रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या आणि स्टॉप डायरिया कॅम्पेन २०२६' (STOP Diarrhoea Campaign 2026) च्या पूर्वतयारीसाठी जिल्हा कार्य बल गट (टास्क फोर्स) व जिल्हा सुकाणू समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम शंभर टक्के यशस्वी करणे, ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आणि आरोग्य विभागाच्या इतर विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बुटे यांच्यासह जिल्हा सुकाणू समिती आणि कार्य बल गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

पोलिओ मोहिमेचे उद्दिष्ट व सूक्ष्म नियोजन (नांदेड जिल्हा):

बैठकीत आगामी २८ जून रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या उद्दिष्टांचे अधिकृत सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात एकूण ३,८८,५२६ बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २,४८,७२८, शहरी भागातील ४६,९४३ आणि महानगरपालिका (मनपा) क्षेत्रातील ९२,८५५ अपेक्षित लाभार्थ्यांचा समावेश आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात खालीलप्रमाणे चोख नियोजन करण्यात आले आहे.

 एकूण पोलिओ बूथ संख्या: २,८४३ (ग्रामीण: २,२८३, शहरी: २७५, मनपा: २८५)

 अपेक्षित एकूण मनुष्यबळ: ७,४३१ कर्मचारी

 एकूण पर्यवेक्षक (Supervisors): ६४३

 *गृहभेटीसाठी निश्चित केलेली घरे (IPPI): ७,५५,३७९ घरे

 गृहभेटीसाठी आवश्यक टीम: १,४१५ टीम्स

 ट्रान्झिट टीम (रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेकपोस्ट): २७७ टीम्स

 मोबाईल टीम (दुर्गम व स्थलांतरित भागांसाठी): १८७ टीम्स

'STOP Diarrhoea Campaign 2026' व व्यापक जनजागृती मोहीम:

राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत 'स्टॉप डायरिया कॅम्पेन' राबविले जाणार असून, १ ते १५ जून दरम्यान त्याची पूर्वतयारी केली जात आहे. ५ वर्षांखालील बालकांमध्ये अतिसारामुळे (डायरिया) होणारे बालमृत्यू शून्य करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेवकांमार्फत घराघरांमध्ये ओआरएस (ORS) आणि झिंक गोळ्यांचे वाटप केले जाईल. या मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भिंतीपत्रके, दवंडी, सोशल मीडिया आणि मेळाव्यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी यांनी दिली आहे. 

इतर आरोग्य विषयांचा आढावा:

पल्स पोलिओ व अतिसार मोहिमेसोबतच बैठकीत नियमित लसीकरण (Routine Immunization), आयडीएसपी (IDSP-एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम), एचपीव्ही (HPV-गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लस) आणि एचआयव्ही (HIV) प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गायकवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वय ठेवून सूक्ष्म आराखड्यानुसार काम करण्याचे आणि रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेकपोस्टवर ट्रान्झिट टीमच्या माध्यमातून एकही बालक डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व माता-पित्यांनी आपल्या ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना २८ जून रोजी पोलिओ बूथवर नेऊन डोस पाजावा व राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी केले आहे .

00000





वृत्त क्रमांक 

नांदेड येथे पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ

नागरिकांनी सर्वेक्षणास सहकार्य करावे – अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड

नांदेड, दि. 12 जून : सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय (MoSPI), भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत MahaSTRIDE प्रकल्पांतर्गत राज्यात जून २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) राबविण्यात येणार आहे. 

या सर्वेक्षणांच्या कामाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन करून करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, सांख्यिकी अधिकारी श्रीमती प्रज्ञा पांढरे तसेच अन्वेषक आणि पर्यवेक्षक उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या धर्तीवर अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन या सर्वेक्षणात सहभागी होत आहे. या सर्वेक्षणातून मिळणारी आकडेवारी शासनाच्या विविध योजना आणि धोरणे तयार करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

PLFS सर्वेक्षणातून रोजगार-बेरोजगारी, महिला कामगारांचा सहभाग, स्वयंरोजगार आणि असंघटित रोजगार याबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध होणार आहे.

ASUSE सर्वेक्षणातून उत्पादन (Manufacturing), व्यापार (Trade) आणि सेवा (Services) क्षेत्रातील (बांधकाम क्षेत्र वगळून) असंघटित उद्यमांची संख्या, रोजगाराचे प्रकार (पगारी/स्वयंरोजगारी), कार्यरत कामगारांची संख्या, प्रति कामगार व प्रति उद्यम स्थूल मूल्यवृद्धी (GVA), उत्पादकता आणि वेतन यांसारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक निर्देशकांची माहिती प्राप्त होणार आहे.

या माहितीच्या आधारे राज्य व जिल्हा उत्पन्नाचा अंदाज बांधणे तसेच शासनाच्या नियोजन व धोरणनिर्मितीस मदत होणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांना सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सर्वेक्षणासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत Ipsos Research Private Limited या संस्थेने नियुक्त केलेले अन्वेषक व पर्यवेक्षक निवडक नमुना पद्धतीने निवडलेल्या कुटुंबे आणि उद्योगांना भेट देऊन मुलाखतीद्वारे माहिती संकलित करणार आहेत. संकलित करण्यात येणारी वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य व परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे आणि जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने सांख्यिकी अधिकारी श्रीमती प्रज्ञा पांढरे यांनी केले आहे.

00000






वृत्त क्रमांक 

इस्लापूर येथे नव्या अप्पर तहसिल कार्यालय स्थापनेचा प्रस्ताव ;

नागरिकांकडून 15 दिवसांत हरकती मागविल्या

नांदेड, दि. 12 जून : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात इस्लापूर येथे नव्याने अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून, यासंदर्भात शासनाचे पत्र दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र शासनाचे सह सचिव यांच्या 11 जून 2026 च्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी यांनी या प्रस्तावाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर 15 दिवसांची जाहीर सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रस्तावानुसार नव्याने स्थापन होणाऱ्या अप्पर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात इस्लापूर, जलधारा आणि शिवणी मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या ही मंडळे तहसिल कार्यालय किनवट अंतर्गत कार्यरत आहेत.

या प्रस्तावाबाबत संबंधित नागरिकांना काही हरकत अथवा उजर असल्यास, त्यांनी ही हरकत बातमी प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट येथे कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. असे सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक   पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे देगलूर येथे आयोजन   नांदेड दि. 6 जुलै :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगा...