Monday, September 7, 2026

वृत्त क्रमांक

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

सहा विभागांना याच महिन्यात भेटी 

विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

मुंबई, दि. ७ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. 

या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.

टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक

पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६

स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in


नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६

स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर

ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in


अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६

स्थळ : अमरावती

ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in


छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६

स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर

ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in


कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६

स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई

ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in


नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६

स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.


या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.

भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. 

0000

गजानन पाटील/विसंअ

वृत्त क्रमांक

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रबोधन आवश्यक

नियोजन भवन येथे एकदिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा संपन्न

नांदेड(जिमाका), दि. 7: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1989 व सुधारित अधिनियम, 2016 यांची प्रभावी अंमलबजावणी, कायद्यातील तरतुदी तसेच विविध यंत्रणांची भूमिका याबाबत अधिकारी, कर्मचारी, नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे एकदिवसीय प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बार्टीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड, तज्ज्ञ व्याख्याते ॲड. डॉ. भीमराव हाटकर तसेच समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे उपस्थित होते. 

बार्टीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, या कायद्याच्या अनुषंगाने विविध शासकीय यंत्रणांची भूमिका आणि आवश्यक कार्यवाही याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कायद्यातील तरतुदींची योग्य माहिती संबंधित यंत्रणांना असणे आणि पीडितांना वेळेत न्याय व आवश्यक मदत मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात तज्ज्ञ व्याख्याते ॲड. डॉ. भीमराव हाटकर यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील विविध कायदेशीर तरतुदी, त्यांची अंमलबजावणी आणि कायद्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या बाबी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विविध कायदेशीर बाबी समजून घेत मार्गदर्शकांशी संवाद साधला.

प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत मृत व्यक्तीच्या वारसांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात 34 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 20 वारसदारांना वर्ग-4 संवर्गातील शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील पोलीस विभागासाठी अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अनुषंगाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच संबंधित कार्यान्वित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच ‘नशामुक्त भारत अभियानाची’ शपथ घेण्यात आली. 

या कार्यशाळेस नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका समन्वयक अंजली नरवाडे यांनी केले.

**







वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात 'कुणबी प्रमाणपत्रा'साठी महसूल मंडळ स्तरावर 10 ते 17 सप्टेंबर दरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना आदेश

तलाठी, ग्रामसेवक व मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे होणार कार्यवाही

गावपातळीवर दवंडी व व्हॉट्सॲपद्वारे पूर्वप्रसिद्धी करण्याचे निर्देश

नांदेड (जिमाका), 07 : जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी 10 ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने या विशेष मोहिमेचे नियोजन केले आहे. या मोहिमेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

या विशेष मोहिमेअंतर्गत प्रत्येक महसूल मंडळात संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिराचा दिनांक, वेळ व ठिकाण याची माहिती नागरिकांना वेळेत मिळावी, यासाठी गावपातळीवर दवंडी देणे, ग्रामपंचायतीच्या नोटीस फलकावर सूचना प्रसिद्ध करणे तसेच स्थानिक व्हॉट्सॲप समूहांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेष शिबिरांमध्ये जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे तसेच परिपूर्ण अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करणे, याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. पात्र नागरिकांना प्रमाणपत्र जलदगतीने मिळावे, यासाठी आवश्यक पाठपुरावाही करण्यात येणार आहे.

शिबिरांच्या कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता राखण्यासाठी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांची जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिबिरांच्या कामकाजाचे दैनिक संनियंत्रण करण्यात येणार आहे.

ही मोहीम शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याची बाब असून, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी आपल्या स्तरावर तात्काळ सूक्ष्म नियोजन करून आदेशाची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी आपल्या क्षेत्रातील महसूल मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांना भेट देऊन या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संयुक्त पथकांद्वारे आयोजन: प्रत्येक महसूल मंडळात संबंधित तलाठी, ग्रामसेवक व मंडळ अधिकारी हे संयुक्तपणे या शिबिरांचे आयोजन करतील.

पूर्वप्रसिद्धी व जनजागृती: शिबिराचा दिनांक, वेळ आणि ठिकाण याची माहिती नागरिकांना आधीच मिळावी यासाठी गावपातळीवर दवंडी देणे, ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर सूचना लावणे आणि स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे.

जागीच पडताळणी व जलद वाटप : या शिबिरांमध्ये प्रामुख्याने जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी आणलेल्या पुराव्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारणे , आवश्‍यक कागदपत्रांची जुळवाजुळव आणि परिपुर्ण अर्ज भरण्‍यासाठी मदत व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना अत्यंत जलद गतीने प्रमाणपत्र वितरीत करणे अनुषंगाने पाठपुरावा करण्‍यात येणार आहे.

दैनिक संनियंत्रण :  शिबिरांमध्ये पारदर्शकता आणि वेग राखण्यासाठी उपजिल्हाधिकारी श्री. अजय शिंदे यांची जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

ही मोहीम शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याची बाब असून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून तात्काळ सूक्ष्म नियोजन करून या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी आपापल्या क्षेत्रातील महसूल मंडळाच्या शिबिराला भेट देऊन या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

****

 वृत्त क्रमांक

स्कूल बस सुरक्षिततेसाठी जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची १० सप्टेंबर रोजी बैठक

नांदेड (जिमाका), दि. ७ : जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती, नांदेडची सन २०२६-२७ मधील प्रथम बैठक गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे. बैठकीत जिल्ह्यातील स्कूल बस वाहतुकीच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये स्कूल बसची नियमित तपासणी, वाहनांची योग्यता (फिटनेस) स्थिती, चालक व वाहकांची पात्रता, स्कूल बस सुरक्षा नियमांचे पालन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित चढ-उताराची व्यवस्था, आपत्कालीन साधनसामग्री, अग्निशामक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग, वेग नियंत्रक आदी सुरक्षा उपाययोजनांचा समावेश आहे.

बैठकीत जिल्ह्यातील सर्व शाळांच्या स्कूल बसची सद्यस्थिती व सुरक्षितता तपासणीचा आढावा, वाहनांचे वैध फिटनेस सर्टिफिकेट, परमिट, विमा व पीयूसी यांची स्थिती, चालकांचे वैध वाहनचालक परवाने व आवश्यक पात्रता, चालकांची वैद्यकीय तपासणी व पोलीस पडताळणी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

तसेच स्कूल बसमध्ये आवश्यक प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्रणा व आपत्कालीन बाहेर पडण्याची सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित चढ-उतारासाठी शाळा परिसरातील वाहतूक व्यवस्था, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत नसल्याची खात्री, स्कूल बसचा वेग व वाहतूक नियमांचे पालन याबाबतही आढावा घेण्यात येणार आहे.

अपघातप्रवण ठिकाणे व शाळांच्या परिसरातील वाहतूक सुरक्षिततेच्या उपाययोजना, मागील बैठकीतील निर्णयांवर संबंधित विभागांनी केलेली कार्यवाही, तसेच शाळा व्यवस्थापन, पालक, स्कूल बस चालक-मालक व संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढविण्याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या अन्य उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात येणार आहे.

सदस्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे

जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीतील सर्व सदस्यांनी बैठकीस वेळेत उपस्थित राहावे. संबंधित विभागांकडे उपलब्ध असलेली स्कूल बस सुरक्षिततेसंबंधी आकडेवारी, तपासणी अहवाल, प्रलंबित कार्यवाही व आवश्यक कागदपत्रे तसेच आपल्या विभागाशी संबंधित कार्यवाही अहवालासह उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

***

वृत्त क्रमांक

प्रलंबित ई-चलान व वाहन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी १२ सप्टेंबरला लोकअदालत

वाहन चालक-मालकांनी सहभागी होऊन तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. ७ : नांदेड जिल्ह्यातील वाहन चालक व मालकांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित प्रलंबित प्रतिवेदने तसेच ई-चलान प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथील प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित वाहन चालक व मालकांनी आपल्या वाहनाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी दि. १२ सप्टेंबर रोजी आयोजित लोकअदालतीमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने जलद निपटारा करण्याची संधी वाहन चालक व मालकांना उपलब्ध झाली असून, संबंधितांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही प्रादेशिक परिवहन विभागाने कळविले आहे.

****

 वृत्त क्रमांक

युजीसी-नेट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 ९ व १० सप्टेंबर रोजी ३०० मीटर परिसरात निर्बंध

नांदेड(जिमाका), दि. ७ : विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET-2026) दि. ९ व १० सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयॉन डिजिटल झोन आयडीझेड, विष्णुपुरी, नांदेड या परीक्षा केंद्रावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत, शांततापूर्ण आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी, यासाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. 

पोलीस अधीक्षक, नांदेड डॉ. निलाभ रोहन यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार दि. ९ व १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत परीक्षा केंद्रापासून ३०० मीटर परिसरात परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही.

या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ३०० मीटर परिसरातील सार्वजनिक दूरध्वनी, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, प्रतिकृती यंत्र (फॅक्स), छायाप्रत यंत्र (झेरॉक्स), संदेशयंत्र (पेजर) तसेच ध्वनिक्षेपक यांचा वापर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस गणकयंत्र, रेडिओ, संगणक, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) किंवा तत्सम साहित्य घेऊन जाण्यास अथवा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्र परिसरात कोणताही गैरप्रकार, अनुचित प्रकार अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच परीक्षार्थींना शांततापूर्ण वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

परीक्षार्थी, पालक, नागरिक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

वृत्त क्रमांक

पावसाच्या खंड काळात पिकांना पाण्याचा ताण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजना कराव्यात

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. ७ : नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडानंतर सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडाही कोरडा गेला आहे. परिणामी, हलक्या मुरमाड व माळरानाच्या जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून सोयाबीन, मूग, उडीद या कमी कालावधीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कपाशी व तूर या दीर्घ कालावधीच्या पिकांवरही पाण्याच्या ताणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर पावसाच्या खंड काळात पिकांना पाण्याचा ताण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे : पिकांची वाढीची अवस्था तसेच जमिनीतील उपलब्ध ओलावा यांचे नियमित निरीक्षण करून त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात.

संवेदनशील अवस्थेतील पिकांना संरक्षित सिंचन द्यावे : उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन द्यावे. यामुळे पिकांना पाण्याच्या ताणापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होईल.

जलसंधारणावर भर द्यावा : कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारणाच्या सरी काढून भविष्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतात अडवून जमिनीत मुरविण्याचे नियोजन करावे.

तण नियंत्रणाला प्राधान्य द्यावे : तणांमुळे पिकांसाठी उपलब्ध असलेला ओलावा व अन्नद्रव्यांचा वापर होतो. त्यामुळे पावसाच्या खंड काळात तण नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे.

आंतरमशागती करून जमिनीतील ओलावा टिकवावा : आंतरमशागतीच्या माध्यमातून जमिनीतील भेगा बुजवाव्यात. यामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होऊन तो अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होते.

कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करावे : पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. जैविक निविष्ठांचा वापर करावा. आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कीड अधिक झाल्यानंतरच आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

आच्छादनाचा वापर करावा : जमिनीवर योग्य प्रकारचे आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा संरक्षित राहण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्ध साधनांनुसार आच्छादनाचा वापर करावा.

अन्नद्रव्यांची फवारणी करावी : पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी करावी. यामध्ये पोटॅशियम नायट्रेट १ ते २ टक्के तसेच ००:५०:३४ एक टक्का या अन्नद्रव्यांची दर ८ ते १० दिवसांनी फवारणी करावी. यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते. तसेच बायो एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा आदी जैविक निविष्ठांचा वापर केल्यास पिकांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

पावसाच्या खंड काळात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, जमिनीतील ओलावा संवर्धन आणि पिकांच्या गरजेनुसार व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी वरील अष्टसूत्री उपाययोजनांचा अवलंब करून पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

***

 वृत्त क्रमांक

गणेशोत्सव काळात नांदेड जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिमच्या वापरास प्रतिबंध

नांदेड(जिमाका), दि. ७ : गणेशोत्सवाच्या कालावधीत नांदेड शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) अन्वये जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिमच्या वापरास प्रतिबंध करणारा आदेश जारी केला आहे.

नांदेड शहर व जिल्ह्यात दहीहंडी, श्री गणेश स्थापना व श्री गणेश विसर्जन हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या कालावधीत डॉल्बी सिस्टिमचा वापर केल्यामुळे वृद्ध, गर्भवती महिला, लहान मुले तसेच आजारी नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते. डॉल्बीच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांच्या कानांवर, हृदयावर व आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरच जीवितासही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच गणेशोत्सव व अन्य उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

७ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ८ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिमचा वापर करण्यास अथवा चालविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. डॉल्बी सिस्टिम मालक, चालक तसेच अन्य कोणत्याही व्यक्तीस डॉल्बी सिस्टिम वापरण्यास किंवा चालविण्यास मनाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, दहीहंडी आदी उत्सवांच्या काळात डॉल्बी सिस्टिमच्या वापराबाबत पूर्वीही संबंधितांना नोटिसा देऊन तसेच बैठका घेऊन समज देण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी वाजविण्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) तसेच लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे गणेशोत्सव व आगामी विविध उत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात साजरे करण्यासाठी नागरिक, गणेश मंडळे, डॉल्बी सिस्टिम चालक व मालक यांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

 वृत्त क्रमांक

पावसाच्या खंड काळात पीक व्यवस्थावन व उपाययोजना

 उपलब्ध ओलावा, पाणी व चाऱ्याचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. 7: नांदेड जिल्ह्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. पावसाचे असमान वितरण, पावसातील खंड तसेच बदलत्या हवामान परिस्थितीमुळे पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन त्याचा पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर तसेच पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाच्या खंड काळात उपलब्ध जमिनीतील ओलावा, पाणी, अन्नद्रव्ये आणि चारा यांचे काटकसरीने व कार्यक्षम व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे

पिकांची वाढीची अवस्था, पानांची स्थिती, मुळांच्या परिसरातील ओलावा तसेच पिकांमध्ये पाण्याच्या ताणाची लक्षणे यांचे नियमित निरीक्षण करावे. हलकी, मध्यम आणि भारी जमीन यामध्ये उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण वेगवेगळे असल्याने सर्व शेतांसाठी एकसारखी उपाययोजना न करता जमिनीचा प्रकार व पिकाची अवस्था विचारात घ्यावी. सकाळच्या वेळी पाने कोमेजणे, पानांचा रंग बदलणे अथवा पिकांची वाढ मंदावणे यासारखी लक्षणे आढळल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक उपाययोजना करावी.

उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून संरक्षित सिंचनास प्राधान्य

सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम व काटकसरीने वापर करावा. संपूर्ण क्षेत्राला कमी प्रमाणात पाणी देण्यापेक्षा पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत संरक्षित सिंचनास प्राधान्य द्यावे. विशेषतः फुलोरा, शेंगा अथवा बोंडांची निर्मिती, दाणे भरणे आणि फळवाढ या अवस्थेत आवश्यकतेनुसार संरक्षित सिंचन दिल्यास पिकांना पाण्याच्या ताणापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ठिबक व तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम पद्धतींचा वापर करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्रासाठी उपयोग करावा.

पावसाचे पाणी शेतात अडवून जमिनीत मुरवावे

पावसाच्या खंडानंतर होणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असल्याने पावसाचे पाणी शेताबाहेर वाहून न जाता जास्तीत जास्त जमिनीत मुरेल, यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात. विशेषतः कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारणाच्या सऱ्या काढून पावसाचे पाणी अडवावे. परिस्थितीनुसार सरी-वरंबा, समतल आडव्या सऱ्या, बांधबंदिस्ती, शेततळे आदी उपायांचा अवलंब करावा. “पावसाचा प्रत्येक थेंब शेताच्या बांधात व जमिनीच्या पोटात” या दृष्टिकोनातून जलसंधारण करावे.

तण नियंत्रण व आंतरमशागतीकडे विशेष लक्ष द्यावे

पावसाच्या खंड काळात तणेही जमिनीतील उपलब्ध पाणी व अन्नद्रव्यांसाठी पिकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रणाला विशेष महत्त्व आहे. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आंतरमशागत, खुरपणी किंवा शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करावा. तणांचे वेळीच नियंत्रण केल्यास जमिनीतील उपलब्ध ओलावा पिकांना अधिक काळ उपलब्ध राहण्यास मदत होते.

पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी आंतरमशागत करावी. जमिनीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या भेगा बुजविल्यास बाष्पीभवनामुळे होणारा ओलाव्याचा ऱ्हास कमी होतो. आंतरमशागत करताना पिकांच्या मुळांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन करावे

पावसाच्या खंड काळात पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा पिकांची पाहणी करून किडींची संख्या, रोगांची लक्षणे आणि प्रादुर्भावाची तीव्रता तपासावी. शक्य तेथे जैविक निविष्ठा, जैविक नियंत्रण, पक्षीथांबे, चिकट सापळे व कामगंध सापळे यांचा वापर करावा.

कीड आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यानंतरच संबंधित पिकासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. अनावश्यक व अवाजवी कीटकनाशकांच्या फवारण्या टाळाव्यात.

आच्छादनाद्वारे जमिनीतील ओलावा टिकवावा

पिकांच्या ओळींमध्ये उपलब्ध पीक अवशेष, कडबा, गवत किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन केल्यास जमिनीच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होते. आच्छादनामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास, तणांची वाढ कमी होण्यास तसेच कालांतराने जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्धतेनुसार सेंद्रिय खते व जैविक निविष्ठांचा वापर करावा.

पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे

पावसाच्या खंड काळात जमिनीतील ओलावा कमी असल्याने मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण कमी होऊ शकते. त्यामुळे पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती लक्षात घेऊन अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. आवश्यकतेनुसार पोटॅशियम नायट्रेट 1 ते 2 टक्के किंवा 00:50:34 चे 1 टक्का द्रावण यांची फवारणी 8 ते 10 दिवसांच्या अंतराने करण्याची शिफारस करता येते. यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ शकते.

मात्र, अन्नद्रव्यांची निवड, मात्रा व फवारणीची वेळ निश्चित करताना पिकाची अवस्था, उपलब्ध ओलावा व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा आदी जैविक निविष्ठांचा वापर केल्यास जैविक व अजैविक ताण सहन करण्यास पिकांना मदत होऊ शकते.

पशुधनासाठी चारा नियोजन करावे

पावसाच्या खंडाचा परिणाम पिकांसोबतच पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या हिरव्या चाऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाणी व क्षेत्राचा विचार करून पशुधनासाठी चारा पिकांचे नियोजन करावे. शक्य असल्यास ज्वारी, मका, बाजरी, चारा गवत, बरसीम, लुसर्न तसेच स्थानिक परिस्थितीस अनुरूप चारा पिकांची निवड करावी. चारा पिकांची निवड करताना पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी आणि पशुधनाची संख्या विचारात घ्यावी.

उपलब्ध हिरवा चारा योग्य अवस्थेत कापून वाळवून वाळलेला चारा (हे) तयार करणे किंवा योग्य पद्धतीने मुरघास तयार करून साठवणे उपयुक्त ठरते. यामुळे पुढील पावसाच्या खंड काळात चाऱ्याची उपलब्धता राखता येते.

उपलब्ध चाऱ्याचा पौष्टिक व कार्यक्षम वापर करावा

चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता असल्यास उपलब्ध चाऱ्याचा अपव्यय टाळून त्याचा पौष्टिक व कार्यक्षम वापर करावा. कडबा किंवा वाळलेल्या चाऱ्याची योग्य आकाराची कुट्टी केल्यास अपव्यय कमी होऊन पशुधनाला चारा खाणे सुलभ होते. उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा आणि कडधान्यवर्गीय चारा यांचे संतुलित मिश्रण करावे.

गरजेनुसार पशुवैद्यकीय अथवा पशुपोषण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खनिज मिश्रण व आवश्यक पूरक खाद्य द्यावे. कमी पौष्टिक कडब्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया किंवा इतर चारा प्रक्रिया पद्धतींचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. चारा पावसापासून सुरक्षित, कोरड्या व हवेशीर ठिकाणी साठवावा.

फळबागांमध्ये विशेष पीक व्यवस्थापन करावे

पावसाच्या खंड काळात फळबागेतील झाडांवर पाण्याचा ताण येण्याची शक्यता अधिक असल्याने झाडांची व जमिनीतील ओलाव्याची नियमित पाहणी करावी. उपलब्ध असल्यास ठिबक सिंचनाचा कार्यक्षम वापर करून झाडांच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात आवश्यक तेवढेच पाणी द्यावे. शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी सिंचन करावे. तीव्र उष्णतेच्या काळात सिंचन टाळावे.

फळझाडांच्या आळ्यात पीक अवशेष, वाळलेले गवत, कडबा किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. मात्र, आच्छादन थेट झाडाच्या बुंध्याला चिकटून ठेवू नये. त्यामुळे बुंध्याजवळ जास्त आर्द्रता निर्माण होऊन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

पावसातील खंडानंतर आर्द्रता व तापमानातील बदलांमुळे काही रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे फळझाडांची नियमित पाहणी करावी. सुकलेल्या व रोगग्रस्त फांद्या आणि पाने काढून नष्ट करावीत. छाटणीच्या किंवा खोडावरील जखमांवर तसेच संबंधित बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असलेल्या भागावर कृषी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार योग्य प्रमाणात बोर्डोपेस्टचा वापर करावा. अनावश्यक रासायनिक फवारण्या टाळून एकात्मिक रोग व्यवस्थापनास प्राधान्य द्यावे.

फळबागेत अन्नद्रव्य व्यवस्थापन करून झाडांवरील ताण कमी करावा

पाण्याचा ताण असताना जास्त प्रमाणात रासायनिक खते जमिनीत देणे टाळावे. झाडांची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि अपेक्षित उत्पादन लक्षात घेऊन अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. आवश्यकतेनुसार व तज्ज्ञांच्या सल्ल्याने पर्णीय अन्नद्रव्यांची फवारणी करता येते. मात्र, पाण्याचा तीव्र ताण किंवा अतिउष्णतेची परिस्थिती असल्यास फवारणी न करता योग्य वेळ निवडावी.

पुढील पावसासाठी शेत सज्ज ठेवावे

पावसाचा खंड संपल्यानंतर कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. शेतातील बांध मजबूत करावेत. जलसंधारणाच्या सऱ्या, चर, शेततळे तसेच इतर जलसंधारणाच्या रचना सुस्थितीत ठेवाव्यात. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल, यासाठी योग्य नियोजन करावे.

पिकांची अवस्था व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच उपाययोजना करा

पावसाच्या खंड काळात कोणतीही एकच उपाययोजना सर्व पिकांसाठी किंवा सर्व शेतांसाठी लागू होत नाही. पिकाची वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा, सिंचनाची उपलब्धता, पिकाची सद्यस्थिती आणि स्थानिक हवामान परिस्थिती यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

विशेषतः अन्नद्रव्यांची फवारणी, कीटकनाशके, बुरशीनाशके, जैविक निविष्ठा, बोर्डोपेस्ट तसेच चारा प्रक्रिया यांचा वापर संबंधित पिकासाठी शिफारशीत पद्धतीने आणि कृषी अथवा पशुसंवर्धन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावा.

पावसाचा खंड म्हणजे केवळ संकट नव्हे; योग्य नियोजन, उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन, काटकसरीचे सिंचन, जलसंधारण, पीक संरक्षण, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पशुधनासाठी चारा नियोजन यांच्या माध्यमातून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर करून पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करावे आणि पिके व पशुधनाचे शाश्वत व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

**

 वृत्त क्रमांक

वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी एएफएमएस प्रणाली विकसित

वाहनधारकांनी वाहनांचे फिटनेस करण्यासाठी प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. 7: वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस प्रमाणपत्र) जारी करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सूचना केंद्र, नवी दिल्ली यांच्या वतीने ॲटोमेटेड फिटनेस मॅनेजमेंट सिस्टीम (एएफएमएस) ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे वाहनांची योग्यता तपासणी ऑनलाइन पद्धतीने करता येणार असून, पात्र वाहनांना योग्यता प्रमाणपत्रही ऑनलाइन जारी करण्यात येणार आहे. 

केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 62 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 45 अन्वये वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र जारी करण्याची तरतूद आहे. यापूर्वी वाहनांच्या योग्यता तपासणीसाठी वाहनधारकांना संबंधित कार्यालयात पूर्वनियोजित वेळ घेऊन वाहन तपासणी केंद्रावर आणावे लागत होते. या प्रक्रियेत वाहनधारकांचा वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होत असे.

आता एएफएमएस प्रणालीच्या संकेतस्थळावर https://staging.parivahan.nic.in/AFMS/# जाऊन नियमांनुसार वाहनाच्या प्रकारानुसार शुल्क भरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घेता येणार आहे. तीनचाकी व हलकी व्यावसायिक वाहने यासाठी 800 रुपये, तर मध्यम व अवजड मोटार वाहने यासाठी 1,200 रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर वाहनधारकाने संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ॲटोमेटेड टेस्टींग स्टेशन (एटीएस) येथे वाहन तपासणीसाठी आणावे. तपासणीत वाहन पात्र ठरल्यास त्याचे योग्यता प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने जारी केले जाईल. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ वाचण्यासोबतच फिटनेस तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व परिवहन वाहनधारकांनी वाहनांचे फिटनेस करण्यासाठी एएफएमएस प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

**

वृत्त क्रमांक

राज्यव्यापी रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी

रोजगार महाकुंभ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात 22 ठिकाणी रोजगार मेळावे

29 सप्टेंबर रोजी राज्यभर 500 ठिकाणी आयोजन; नोकरी इच्छुक उमेदवार व नियोक्त्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 7 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ या संकल्पनेनुसार ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमांतर्गत दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी, एकाच वेळी 500 ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार व नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात 22 ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. 

नांदेड जिल्ह्यात देगलूर महाविद्यालय, उदगीर रोड, देगलूर; श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनखेड, ता. लोहा; ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळाकोळी, ता. लोहा; श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शंकरनगर, ता. बिलोली; ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विष्णुपुरी, नांदेड; श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कंधार; ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेहरूनगर, कंधार; लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद; संत बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, कामठा, ता. अर्धापूर; हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर; श्री दत्त आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सिनियर कॉलेज, हदगाव; दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, भोकर; ग्रामीण एसीएस महाविद्यालय, वसंतनगर, मुखेड येथे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूस, गोकुंदा, ता. किनवट; बंदा बैरागी बंदासिंघजी बहादूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुदखेड; परमवीर चक्र विजेता कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नायगाव; संतकवी दासगणू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरी; हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथेही रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

नांदेड शहरातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पहिला मजला, शासकीय तंत्रनिकेतन, आनंदनगर रोड; श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था; शासकीय तंत्रनिकेतन, यशवंत कॉलेज रोड तसेच श्री हजूर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाफना टी-पॉईंट येथेही रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात येणार आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणी

रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बेरोजगार तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी जॉब सीकर रजिस्ट्रेशन फार्म (Job Seeker Registration Form) भरून आपली प्राथमिक माहिती अचूकपणे नोंदवावी.

जॉब सीकर रजिस्ट्रेशनच्या https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी. 

उद्योग व नियोक्त्यांसाठी ऑनलाइन नोंदणी

रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करू इच्छिणारे उद्योग, उद्योग समूह, एमएसएमई, आस्थापना व नियोक्त्यांनी एम्पलॉयर रजिस्ट्रेशनच्या https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6 या लिंकवर एम्प्लॉयर रजिस्ट्रेशन फॉर्म भरून आवश्यक माहिती अचूक व पूर्णपणे सादर करावी.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी तसेच विविध उद्योग, उद्योग समूह, एमएसएमई, आस्थापना व नियोक्त्यांनी या रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर, नांदेड. दूरध्वनी : 02462-251674, मोबाईल : 9272484161 व ई-मेल : nandedrojgar01@gmail.com यावर संपर्क साधावा. 

**

वृत्त क्रमांक भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद • सहा विभागांना याच महिन्यात भेटी  • विद्यार्थी, उमेद...