Tuesday, June 9, 2026

 वृत्त क्रमांक 

जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नवीन सेवार्थ प्रणाली ई-बिल संदर्भात प्रशिक्षण 

नांदेड दि. 9 जून :- जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नवीन सेवार्थ प्रणाली e-bill संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण यांच्यासाठी बुधवार 10 जून 2026 रोजी सकाळी 11 वा. तसेच नांदेड वगळता सर्व तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी गुरुवार 11 जून 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन भवन नांदेड येथे करण्यात आले आहे. संबंधीत लेखा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती शोभा मुंडे यांनी केले आहे. 

या प्रशिक्षण कार्यक्रमात नवीन सेवार्थ प्रणालीच्या कार्यपदधती, अद्ययावत वैशिष्टये तसेच व्यवहारातील अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण श्रीमती वैशाली ताटापल्लेवार, अप्पर कोषागार अधिकारी व अप्पर कोषागार अधिकारी नामदेव राठोड तसेच नियुक्त मास्टर ट्रेनर  कनिष्ठ लेखापाल शंकर दुमाने, लेखा लिपीक प्रमोद शिंदे, बसवेश्वर वाळके, सुनिल संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार आहे. संबंधीत सर्व विभागांनी या प्रशिक्षणाचे लाभ घ्यावा व वेळेवर उपस्थित राहावे, असेही आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

ममता विविधकर यांच्या वारसदारांचा शोध; 15 दिवसांत संपर्क न केल्यास नोकरीचा दावा संपुष्टात

नांदेड, दि. 9 जून : किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील ममता रेखा विविधकर यांच्या खूनप्रकरणी त्यांच्या पात्र वारसदारांना शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत शासकीय अथवा निमशासकीय नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध असून, संबंधित वारसदारांचा शोध घेण्यासाठी समाज कल्याण विभागाने आवाहन केले आहे.

ममता रेखा विविधकर यांच्या खूनाची नोंद किनवट पोलीस ठाण्यात गु.रं.नं. 137/2024, दि. 28 मे 2024 रोजी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र. 214, दि. 20 नोव्हेंबर 2025 नुसार अशा प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याची तरतूद आहे.

या अनुषंगाने समाज कल्याण विभागाने मयत महिलेच्या वारसदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. विभागातील कर्मचाऱ्यांनी मारेगाव खालचे येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता, वारसदार राज्याबाहेर वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. मात्र ते नेमके कुठे आणि कोणत्या राज्यात राहतात, याबाबत गावातील सरपंच, पोलीस पाटील व नागरिकांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.

समाज कल्याण विभागाने मयत महिलेचे वारसदार, रक्ताचे नातेवाईक किंवा त्यांचा संपर्क असलेल्या व्यक्तींनी आवश्यक नातेसंबंधाची कागदपत्रे घेऊन पुढील 15 दिवसांच्या आत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. निर्धारित मुदतीत संपर्क न झाल्यास शासकीय नोकरीसंदर्भातील दावा संपुष्टात येऊ शकतो, असे समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक 

राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड 2026 मध्ये इयत्ता तिसरी ते बारावी मधील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 9 जून:- आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मा. पंतप्रधान महोदयांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. 

योगा दिनाच्या निमीत्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती अंगीकारणे, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण, योगा हा आपल्या भारतीय संस्कृती वारसाचा अविभाज्य घटक आहे.

आयुष मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड, योग विदया धाम, पतंजली योग समिती, जिल्हा योग संघटना,नांदेड, योग विद्येचा प्रसार करणाऱ्या स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी व विविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  21 जून, 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच NCERT आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 2016 पासून राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडचे आयोजन सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. यासंदर्भात 10 जून, 2026 पर्यंत इयत्ता तीसरी ते इयत्ता बारावी मधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून सहभाग घेता येणार आहे. 

नांदेड जिल्हयातून अधिकाधिक सहभाग होण्यासाठी प्राचार्य, डायट, सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) गटशिक्षणाधिकारी सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, विविध योग संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक व नागरीक यांनी सदर मेसेज आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील व केंद्रातील ग्रुपवर पाठवून विद्यार्थ्यांना पुढील लिंकवर नोंदणी करून सहभाग होण्यासाठी आवाहन करावे असे कळविले आहे.

🧘‍♀️ NCERT National  Yoga Olympiad 2026 Online Quiz

🎓 Participation: Students of Classes 3rd to 12th

✅ Free Registration

✅ Online Participation

🔗 Registration 

here: https://www.nyoncert.in/registration2026/register.php

🌐 For full details kindly visit: www.nyoncert.in

📢 Kindly registered and share

असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड दि. 9 जून :-  नांदेड जिल्ह्यात 11 जूनचे सकाळी 6 वाजेपासून ते 25 जून 2026 चे मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 11 जूनचे सकाळी 6 वाजेपासून ते 25 जूनच्या मध्यरात्रीपर्यत  शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना #शे...