Wednesday, October 14, 2026

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपासून खत खरेदीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली

• अनुदानित रासायनिक खत खरेदीसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य

• जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी

नांदेड (जिमाका), दि. 14 : शेतकऱ्यांना योग्य खत, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून रासायनिक खतांची नोंदणी, आरक्षण व विक्री ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) या डिजिटल प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे खतांची उपलब्धता, आरक्षण आणि वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ होण्यास मदत होणार आहे. अनुदानित रासायनिक खत खरेदीसाठी शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) अनिवार्य असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी ते तातडीने काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी द. रा. कळसाईत यांनी केले आहे.

एफएफएस प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवर जवळच्या कृषी सेवा केंद्रातील उपलब्ध खतसाठ्याची माहिती घेता येणार आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी दुकानांवर वारंवार जाण्याची गरज कमी होईल. स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य देणे, खतांची अनावश्यक जोडविक्री रोखणे, काळाबाजार व अनधिकृत विक्रीवर नियंत्रण ठेवणे आणि खत वितरणाचे अचूक नियोजन करणे यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. तसेच खत खरेदीचा डिजिटल इतिहास उपलब्ध राहणार असल्याने व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.

नांदेड जिल्ह्यात सुमारे 7 लाख 50 हजार खातेदार असून, त्यापैकी सुमारे 6 लाख म्हणजेच 80 टक्के खातेदारांनी ॲग्रीस्टॅकअंतर्गत फार्मर आयडी काढले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी एफएफएस प्रणाली सुरू होण्यापूर्वी आपले शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे, जेणेकरून अनुदानित रासायनिक खत खरेदी करताना अडचण येणार नाही.

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. तसेच एफएफएस ॲप मोबाईलमध्ये उतरवून त्यावर प्रवेश नोंदणी करावी. या प्रणालीद्वारे प्रत्यक्ष शेतजमिनीचे क्षेत्र आणि पिकांसाठी निश्चित केलेल्या शिफारशीत खत मात्रेनुसारच खत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. गावपातळीवर शेतकऱ्यांना एफएफएस ॲपच्या वापराबाबत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

जमिनीची सुपीकता, पिकांची गरज आणि शिफारशीत मात्रा लक्षात घेऊन खतांचा वापर करणे आवश्यक आहे. संतुलित खत वापरामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास, अनावश्यक खत वापर कमी करण्यास आणि उत्पादन खर्चात बचत करण्यास मदत होणार आहे. योग्य खत व्यवस्थापनामुळे पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासही हातभार लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी एफएफएस ॲपचा अधिकाधिक वापर करून डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा आणि वैज्ञानिक व पारदर्शक खत वितरण व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी द. रा. कळसाईत यांनी केले आहे.

**

वृत्त क्रमांक

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत लोहा, दुधडच्या संघांची बाजी

सहा वयोगटांत चुरशीच्या लढती; विजेत्या संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

नांदेड (जिमाका), दि. 14 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2026-27 उत्साहात संपन्न झाली. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात 12 व 13 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला. चढाई आणि पकडीच्या अटीतटीच्या लढतींमुळे स्पर्धेत चांगलीच रंगत निर्माण झाली.

या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त जनार्दन गुपीले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव अजगरअली पटेल, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, रामन बैनवाड, जिल्हा टेनिक्वॉईट संघटनेचे प्रतिनिधी शेनेवाड, जिल्हा पुरस्कारप्राप्त डॉ. राहुल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा गटवार निकाल पुढीलप्रमाणे  आहे. 

14 वर्षांखालील मुले : प्रथम - श्री संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालय, लोहा; द्वितीय - कै. गोविंदराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वझरा, ता. माहूर; तृतीय - माध्यमिक आश्रमशाळा, कमळेवाडी, ता. मुखेड.

14 वर्षांखालील मुली : प्रथम - शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दुधड, ता. हिमायतनगर; द्वितीय - माध्यमिक आश्रमशाळा, कमळेवाडी, ता. मुखेड; तृतीय - जयराम अंबेकर विद्यालय, अर्जापूर, ता. बिलोली.

17 वर्षांखालील मुले : प्रथम - माध्यमिक आश्रमशाळा, गांधीनगर, ता. कंधार; द्वितीय - आंतरभारती माध्यमिक विद्यालय, बिलोली; तृतीय - ग्रीनफिल्ड नॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, रामेश्वर, ता. धर्माबाद.

17 वर्षांखालील मुली : प्रथम - अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, साळवाडी, ता. भोकर; द्वितीय - माध्यमिक आश्रमशाळा, कमळेवाडी, ता. मुखेड; तृतीय - साधना हायस्कूल, देगलूर.

19 वर्षांखालील मुले : प्रथम - शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सारखणी, ता. किनवट; द्वितीय - पानसरे महाविद्यालय, अर्जापूर, ता. बिलोली; तृतीय - शासकीय आश्रमशाळा, दुधड, ता. हिमायतनगर.

19 वर्षांखालील मुली : प्रथम - शासकीय आश्रमशाळा, दुधड, ता. हिमायतनगर; द्वितीय - आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मनाठा, ता. हदगाव; तृतीय - श्री दत्त ज्युनिअर कॉलेज, नायगाव.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. शालेय खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव देणे, त्यांच्यातील क्रीडागुणांना प्रोत्साहन देणे आणि कबड्डी खेळाचा विकास साधणे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी अजगरअली पटेल, सबदर पटेल, जीवन पवार, पी. एस. चव्हाण, बन सर, रमन बैनवाड, नवनाथ पोटफोड, सफदर पटेल, पुरुषोत्तम पाटील, अशफाक, सिद्धांत कांबळे, सय्यद ईसा, साईनाथ नामवाडे, अरविंद, प्रियंका पालमवार, कृष्णा चप्पेवार, एस. कबीर आणि याकब अरसलान यांनी पंच म्हणून काम पाहिले.

जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धाप्रमुख बालाजी शिरसीकर, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवकांता देशमुख, चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपुल दापके, दत्तकुमार धुतडे, रोहिणी घंटेवाड यांच्यासह संजय चव्हाण, आनंद जोंधळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळ, यश कांबळे तसेच जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी व खेळाडूंनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. 

***

वृत्त 

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार

पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली नको - बँकांना निर्देश

मुंबई, दि. १४: राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करतानाच, या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी दिवाळीच्या तोंडावर दिलासा म्हणून त्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचा अग्रीम जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. 

शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये, अशी सक्ती ताकीद संबंधित सोसायट्यांपासून, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याच्या अवैध उपश्यावर कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचे आणि त्यासाठी सोळा हजार वीज जोडण्या तोडण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. 

राज्यात यापुर्वीच २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये आता आणखी ४० तालुक्यांचा समावेश करण्यात येत आहे. आता दुष्काळी तालुक्यांची संख्या ३०५ इतकी झाली आहे. या तालुक्यांमध्ये आता दुष्काळी उपाय योजना करण्यास प्राधन्य देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या समाविष्ट तालुक्यांध्ये दुष्काकाळाबाबत ट्रिगर एक लागू केला होता. आता नव्याने समाविष्ट तालुक्यांसह, या तालुक्यांमध्ये ट्रिगर लागू करण्याबाबतची कार्यवाहीला गती देण्यात येत आहे. 

दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.

जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत उपाययोजनांची चर्चा करण्यात आली. तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला. जिथे पाणी आहे, तिथे चाऱ्यांसाठीच्या पिकांची लागवड करण्यात यावी. तसेच रब्बीमध्येही ज्वारीसारख्या चारा देणारी पिके घेण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांकडून लागवड करण्यात आलेल्या चाऱ्याची शासन हमी भावाने खरेदी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीज पुरवठा मोफतच आहे. यातूनही वीज बिलासाठी कुणी तगादा लावत असेल, तर त्यांना तसे न करण्याबात सक्त सूचना देण्यात येतील. कर्ज वसुलीसाठीही शेतकऱ्यांना तगादा लावू नये, असे निर्देश सोसायट्या आणि जिल्हा बँकांना देण्यात आल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांवरही लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांनीही आततायी पणा करू नये असा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

0000



विशेष लेख

स्वच्छ हातात दम आहे!

जागतिक हात धुवा दिन विशेष लेख

दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. हातांची स्वच्छता ही केवळ आरोग्याची सवय नसून अनेक आजारांना प्रतिबंध करणारा सर्वांत सोपा, प्रभावी आणि स्वस्त उपाय आहे. साबणाने हात धुण्याची सवय प्रत्येकाने अंगीकारली, तर अतिसार, श्वसनसंसर्ग आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करता येतो. म्हणूनच, ‘स्वच्छ हातात दम आहे’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक शाळेपर्यंत आणि प्रत्येक गावापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

हातांची स्वच्छता म्हणजे आरोग्याचे संरक्षण

संयुक्त राष्ट्र संघ आणि जागतिक आरोग्य क्षेत्रातील विविध संस्था हातांच्या स्वच्छतेला विशेष महत्त्व देतात. स्वच्छता आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. आपल्या दैनंदिन जीवनात हातांचा वापर असंख्य कामांसाठी होतो. वस्तूंना स्पर्श करताना, खेळताना, प्रवास करताना, स्वयंपाक करताना किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना हातांवर अनेक प्रकारचे जंतू जमा होऊ शकतात. हे जंतू डोळ्यांना दिसत नसल्यामुळे हात स्वच्छ दिसले म्हणजे ते पूर्णपणे स्वच्छ झाले, असे समजणे चुकीचे आहे. दूषित हातांमधून हे जंतू अन्न-पाण्यात किंवा तोंड, नाक आणि डोळ्यांच्या संपर्कातून शरीरात प्रवेश करू शकतात.

मानवी विष्ठेतून पसरणारे रोगजंतू अतिसारासारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. दूषित हात, पाणी, अन्न आणि अस्वच्छ परिसर यांमुळे संसर्गाचा प्रसार होतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना अशा संसर्गाचा अधिक धोका असतो. त्यामुळे हातांची स्वच्छता ही वैयक्तिक सवय असली, तरी तिचा संबंध संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी आहे.

हात धुण्याच्या सवयीचे ऐतिहासिक महत्त्व

हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या डॉक्टर इग्नाझ सेमेलवाईस यांचे योगदान ऐतिहासिक आहे. १९व्या शतकात त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हात स्वच्छ धुण्याच्या सवयीवर भर दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयांमध्ये हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले. आजही आरोग्यसेवा क्षेत्रात हातांची स्वच्छता ही संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

कोरोना महामारीच्या काळात हात धुणे, सॅनिटायझरचा वापर आणि वैयक्तिक स्वच्छता यांविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जागृती झाली. मात्र, महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही ही सवय कायम राहणे आवश्यक आहे. एखाद्या संसर्गजन्य आजाराच्या काळापुरतीच नव्हे, तर दररोजच्या जीवनाचा भाग म्हणून हात धुण्याची सवय जोपासली पाहिजे.

साबणाने हात धुण्याची योग्य पद्धत

हात धुणे ही साधी गोष्ट वाटत असली, तरी अनेक जण घाईघाईने हात धुतात. त्यामुळे हातांच्या सर्व भागांची स्वच्छता होत नाही. हात धुताना तळवे, हातांच्या मागील बाजू, बोटांमधील जागा, अंगठे, नखांच्या आसपासचा भाग आणि मनगट स्वच्छ करणे आवश्यक आहे.

प्रथम स्वच्छ वाहत्या पाण्याने हात ओले करावेत. त्यानंतर साबण लावून दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासावेत. हातांच्या मागील बाजू, बोटांमधील जागा, अंगठे आणि नखांच्या टोकांभोवती व्यवस्थित घासावे. ही प्रक्रिया किमान २० सेकंद करावी. त्यानंतर स्वच्छ वाहत्या पाण्याने हात खळखळून धुवावेत आणि स्वच्छ टॉवेलने किंवा योग्य पद्धतीने हात कोरडे करावेत.

शौचालयाचा वापर केल्यानंतर, लहान मुलांची स्वच्छता केल्यानंतर, अन्न तयार करण्यापूर्वी, जेवण्यापूर्वी आणि खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात धुणे विशेष महत्त्वाचे आहे. केवळ पाण्याने हात धुण्यापेक्षा साबणाचा वापर अधिक प्रभावी ठरतो.

मुलांमध्ये रुजवा स्वच्छतेचे संस्कार

लहान मुले खेळताना माती, धूळ, खेळणी आणि विविध वस्तूंना स्पर्श करतात. त्यानंतर हात न धुता खाणे किंवा हात तोंडाला लावणे यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच मुलांना लहान वयापासून साबणाने हात धुण्याची सवय लावणे आवश्यक आहे.

शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी, परिपाठात, चित्रकला, घोषवाक्ये, प्रात्यक्षिके आणि विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगता येते. शिक्षकांनी स्वतः या सवयीचे पालन करावे आणि पालकांनीही घरी मुलांसमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवावा. मुले केवळ सांगितल्यामुळेच नव्हे, तर मोठ्यांचे अनुकरण करूनही शिकतात.

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यासारख्या संस्थांनी हातांच्या स्वच्छतेला संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधातील महत्त्वाचा घटक मानले आहे. २००८ पासून १५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून साबणाने हात धुण्याची सवय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.

स्वच्छ हात, निरोगी समाज

साबण, पाणी आणि हात धुण्याची योग्य पद्धत या तीन साध्या गोष्टी अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. यासाठी मोठा खर्च करण्याची आवश्यकता नाही; गरज आहे ती सातत्याची आणि जनजागृतीची. शाळा, ग्रामपंचायती, अंगणवाड्या, महाविद्यालये, महिला बचत गट आणि विविध सामाजिक संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.

जागतिक हात धुवा दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नागरिक, महाविद्यालयीन युवक, शालेय विद्यार्थी, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी या उपक्रमांत सहभागी होऊन नियमितपणे साबणाने हात धुण्याचा संकल्प करावा आणि आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे.

आरोग्याचे संरक्षण नेहमी मोठ्या उपाययोजनांनीच होते असे नाही. कधीकधी एक छोटीशी सवयही मोठा बदल घडवून आणते. साबणाने हात धुण्याची सवय ही अशीच एक प्रभावी सवय आहे. स्वतः स्वच्छ राहूया, कुटुंबाला सुरक्षित ठेवूया आणि निरोगी समाजाच्या निर्मितीत योगदान देऊया.

मिलिंद व्यवहारे

जिल्हा परिषद, नांदेड

९४२२१८८०९४

0000



वृत्त क्रमांक

वृक्षांच्या सावलीत ज्ञानाची पेरणी; मारतळा शाळेचे ‘वृक्ष वाचनालय’ ठरतेय प्रेरणादायी

• वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिनव उपक्रमाची चर्चा

• निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृतीची जोपासना

नांदेड (जिमाका), दि. 14 : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अवांतर वाचनाची गोडी लागावी आणि पर्यावरणप्रेमाची भावना रुजावी, या उद्देशाने लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मारतळा येथे सुरू करण्यात आलेले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वृक्ष वाचनालय’ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मार्च 2023 पासून सुरू असलेल्या या अभिनव उपक्रमातून शाळेने विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. 

थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांपासून प्रेरणा घेऊन सुरू केलेल्या या वाचनालयात विद्यार्थी शाळेच्या परिसरातील वृक्षांच्या सावलीत बसून गोष्टी, चरित्रे आणि प्रेरणादायी पुस्तके वाचतात. दर शनिवारी एक तास वाचनासाठी राखून ठेवण्यात येतो.

निसर्गाच्या सान्निध्यात वाचनाचा आनंद घेताना विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये, शब्दसंग्रह, कल्पनाशक्ती आणि चिंतनक्षमता विकसित होण्यास मदत होत आहे. वाचलेल्या साहित्याचे आकलन करून ते स्वतःच्या शब्दांत व्यक्त करण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. स्वतंत्र इमारतीऐवजी वृक्षांची सावली हेच या वाचनालयाचे ज्ञानमंदिर बनले असून, शिक्षण आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला जात आहे.

‘वाचणारा विद्यार्थी, विचार करणारा नागरिक आणि ज्ञानसमृद्ध समाज हे आमचे ध्येय आहे,’ असे मुख्याध्यापक रवी ढगे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना पुस्तकांशी मैत्री करता यावी, त्यांच्यात स्व-अध्ययनाची सवय निर्माण व्हावी आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वाचनालयामुळे वाचनाची आवड निर्माण झाली असून, दररोज काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी आकांक्षा शाहूजी येडे हिने व्यक्त केली. वृक्षांच्या सावलीत पुस्तकांशी मैत्री घडविणारा मारतळा शाळेचा हा उपक्रम वाचनसंस्कृतीच्या जोपासनेसह निसर्गप्रेमाची शिकवण देणारा ठरत आहे.

***








वृत्त क्रमांक

साबणाने हात धुण्याची सवय अंगीकारा- मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

• जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हाभरात जनजागृती उपक्रम

नांदेड (जिमाका), दि. 14 : जागतिक हात धुवा दिनानिमित्त 15 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हातांच्या स्वच्छतेविषयी विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी साबणाने हात धुण्याची सवय दैनंदिन जीवनात अंगीकारून स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य जपावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केले आहे.

साबणाने योग्य पद्धतीने हात धुतल्याने अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होते. या दिनानिमित्त शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतींमध्ये हात धुण्याची प्रात्यक्षिके घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच अन्न तयार करण्यापूर्वी साबणाने हात धुणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलांमध्ये हातांच्या स्वच्छतेची सवय रुजवून ती त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविणे गरजेचे आहे.

या जनजागृती उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. तालुकास्तरीय अधिकारी आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबवून हातांच्या स्वच्छतेचा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.

**




 वृत्त क्रमांक

माहूरमध्ये 23 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

•जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाची मोहीम; 9 हजार 600 रुपयांचा दंड वसूल

•तंबाखूमुक्त नांदेडसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

नांदेड (जिमाका), दि.14 : माहूर शहर व परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याच्या तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम, 2003 (कोटपा) कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने मंगळवार, दि. 13 ऑक्टोबर 2026 रोजी धडक मोहीम राबविली. या मोहिमेत विविध ठिकाणी अचानक तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 23 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 9 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे आणि नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. संजीवनी जाधव, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, समुपदेशक किरण चिरडे आणि एमजीव्हीएसचे मंगेश गायकवाड यांचा समावेश होता.

या मोहिमेसाठी माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सत्यपाल मडावी आणि होमगार्ड शेख असलम यांनी सहकार्य केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे, कायद्याच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सेवन किंवा साठवण होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी जिल्हा रुग्णालय, नांदेड येथील जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाकडे तक्रार नोंदवावी. तंबाखू नियंत्रण कायद्याचे पालन करून नांदेड जिल्हा तंबाखूमुक्त करण्याच्या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.

**




 वृत्त क्रमांक

राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंचे कौशल्य पणाला

•आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त 174 खेळाडूंचा सहभाग; नांदेडमध्ये स्पर्धेचा उत्साहात समारोप

नांदेड (जिमाका), दि. 14 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. जिल्हा क्रीडा संकुलातील आंतरगृह क्रीडागृहात 8 ते 11 ऑक्टोबर 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त 174 खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले. राष्ट्रीय व आशियाई स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनीही या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावले.

स्पर्धेतील गटवार विजेते पुढीलप्रमाणे :

14 वर्षांखालील मुले : प्रथम-आर्यन वाघमारे (मुंबई), द्वितीय-सोनी विवान (कोल्हापूर), तृतीय-लतीक राम (पुणे), चौथा-लिमये काविश (कोल्हापूर), पाचवा - कश्यप खाकरीया (कोल्हापूर).

14 वर्षांखालील मुली : प्रथम - घोलप प्रिशा (नाशिक), द्वितीय - मालती निर्मल (छत्रपती संभाजीनगर), तृतीय - गुप्ता हर्शी (अमरावती), चौथा - युघा बैजू (मुंबई), पाचवा - वेधा बैजू (मुंबई).

17 वर्षांखालील मुले : प्रथम - बोडाळे शैनक (नागपूर), द्वितीय - भुवान शितोळे (पुणे), तृतीय - अयान सोमाणी (पुणे), चौथा - तन्मय मोरे (मुंबई), पाचवा - राणे विराज (मुंबई).

17 वर्षांखालील मुली : प्रथम - निहीरा कौळ (पुणे), द्वितीय - रितीका गमे (नागपूर), तृतीय - बजाज श्रद्धा (नागपूर), चौथा - घाटे तन्मयी (कोल्हापूर), पाचवा - सई पाटील (पुणे).

19 वर्षांखालील मुले : प्रथम - ललित आदित्यनार (पुणे), द्वितीय - गायकवाड मानस (पुणे), तृतीय - घाडगे हर्ष (पुणे), चौथा - शरनार्थीक श्लोक (पुणे), पाचवा - पाटील जयवीर (मुंबई).

19 वर्षांखालील मुली : प्रथम - पाटील दिव्या (कोल्हापूर), द्वितीय - पाटील दिशा (कोल्हापूर), तृतीय - अनुष्का कुठवाल (पुणे), चौथा - श्रेया हिप्परागी (कोल्हापूर), पाचवा - सैनी देशपांडे (छत्रपती संभाजीनगर).

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात उपजिल्हाधिकारी हनुमंत कोळेकर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, देगलूरचे तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, लोहा येथील तालुका क्रीडा अधिकारी जयप्रकाश तपघाले, लातूर विभागीय क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी दत्तात्रय गडपल्लेवार, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव प्रा. डॉ. दिनकर हंबर्डे, आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे, तांत्रिक समितीचे सदस्य चंद्रप्रकाश होनवडजकर व निळकंठ श्रावण आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या पदाधिकारी आणि खेळाडूंनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, शिवकांता देशमुख, राहुल श्रीरामवार, विपुल दापके, लेखा लिपिक दत्तकुमार धुतडे, कनिष्ठ लिपिक रोहणी घंटेवाड यांच्यासह संजय चव्हाण, आनंद जोंधळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळ आणि यश कांबळे यांनी सहकार्य केले. 

**



 वृत्त  

प्रचाराच्या व्हिडिओमध्ये धार्मिक स्थळे, चिन्हांचा वापर करू नये

जाहिराती व व्हिडिओ तयार करताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, दि. २४ : निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवाराच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेणारे व्हिडिओ तयार करण्याची पद्धत सध्या प्रचलित आहे. मात्र, हे व्हिडिओ तयार करण्यापासून त्यांना आवश्यक प्रमाणन मिळविण्यापर्यंतची प्रक्रिया वेळखाऊ असू शकते. त्यामुळे प्रचाराचे व्हिडिओ तयार करतानाच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे. आयोगाच्या निर्देशांनुसार प्रतिबंधित बाबी टाळल्यास व्हिडिओच्या प्रमाणनाची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल, असे आवाहन ०५ - औरंगाबाद पदवीधर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

उमेदवारांच्या प्रचारासाठी वृत्तपत्रांमधील जाहिराती, प्रचाररथांवरील व्हिडिओ, समाजमाध्यमांवरील रील्स, रेडिओ व खासगी एफएम वाहिन्यांवरील जाहिराती, बल्क एसएमएस, ध्वनिमुद्रित ध्वनिसंदेश तसेच इंटरनेट संकेतस्थळांवरील जाहिराती अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो.

उमेदवारांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या संबंधित जाहिराती व व्हिडिओंचे नियमानुसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण यंत्रणेकडून पूर्वप्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रमाणनासाठी व्हिडिओ सादर करण्यापूर्वी त्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश करावा आणि कोणत्या बाबी टाळाव्यात, याची माहिती घेणे गरजेचे आहे. वृत्तपत्रांमधील जाहिरातींसाठी मतदानाच्या आधीच्या शेवटच्या दोन दिवसांत संबंधित नियमांनुसार पूर्वप्रमाणन घेणे आवश्यक आहे.

कार्यक्रम संहितेचे पालन आवश्यक

कार्यक्रम संहितेनुसार, प्रचाराच्या व्हिडिओमध्ये अभिरुचीहीन किंवा सभ्यतेच्या विरुद्ध असलेली दृश्ये, मित्रराष्ट्रांवरील टीका, धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारी दृश्ये अथवा आक्षेपार्ह शब्दांचा समावेश नसावा. तसेच अश्लील, बदनामीकारक किंवा जाणीवपूर्वक चुकीची अथवा अर्धसत्य माहिती देणारे चित्रण, हिंसेला प्रोत्साहन देणारी दृश्ये, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रसारण किंवा राष्ट्रविरोधी कृत्यांना प्रोत्साहन देणारी सामग्री वापरू नये.

न्यायालयाचा अवमान करणारे, राष्ट्रपती किंवा न्यायपालिकेच्या सचोटीविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेले अथवा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे प्रसारण टाळावे. नैतिक मूल्यांना बाधा आणणारी टीका, अंधश्रद्धा किंवा भोंदूगिरीला खतपाणी घालणारे चित्रण, महिलांचे विकृत चित्रण, बालकांसंदर्भातील संहितेचे उल्लंघन करणारे प्रसारण तसेच विशिष्ट भाषिक किंवा प्रादेशिक घटकांविषयी उपरोधिक अथवा निंदनीय वृत्ती दर्शविणारी दृश्ये किंवा शब्द यांचाही समावेश व्हिडिओमध्ये करू नये. याशिवाय, सिनेमॅटोग्राफ कायदा, १९५२ मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे प्रसारण टाळावे.

जाहिरात संहितेतील तरतुदींचे पालन करावे

जाहिरात संहितेनुसार कोणत्याही वंश, जात, वर्ण, पंथ किंवा राष्ट्रीयत्वाचा उपहास करणाऱ्या, भारतीय राज्यघटनेचा अवमान करणाऱ्या अथवा गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध आहे. हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या, कायद्याचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करणाऱ्या किंवा अश्लीलतेचे उदात्तीकरण करणाऱ्या जाहिरातीही प्रसारित करू नयेत.

स्वतःच्या फायद्यासाठी राज्यमुद्रा, राज्यघटनेतील तरतुदी, राष्ट्रीय नेते किंवा राज्यातील व्यक्तींच्या नावांचा अथवा प्रतिमांचा गैरवापर करू नये. महिलांचे चुकीचे किंवा अवमानकारक चित्रण करणाऱ्या जाहिरातींनाही परवानगी दिली जात नाही. तसेच सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि मादक पदार्थांच्या जाहिरातींवर प्रतिबंध आहे.

प्रचाराच्या व्हिडिओमध्ये कोणत्या बाबी टाळाव्यात ?

भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमविषयक निर्देशांनुसार प्रचारासाठी व्हिडिओ तयार करताना पुढील बाबी टाळाव्यात :

१. मंदिर, मशीद, गुरुद्वारा किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळांची दृश्ये वापरू नयेत.

२. इतर राजकीय पक्षांवर आरोप करण्याऐवजी उमेदवाराने स्वतः केलेल्या कामांची माहिती द्यावी.

३. एकमेकांच्या खासगी आयुष्याबाबत आरोप करू नयेत किंवा असभ्य भाषेचा वापर करू नये.

४. विरोधी पक्षांविरुद्ध आक्षेपार्ह टीका-टिप्पणी किंवा हेतुपुरस्सर आरोप करू नयेत.

५. सैन्याची किंवा सैन्य अधिकाऱ्यांची छायाचित्रे वापरू नयेत.

६. अन्य कोणत्याही देशाविरुद्ध आक्षेपार्ह आरोप करू नयेत.

७. विशिष्ट जात, धर्म किंवा पंथाविरुद्ध आरोप करणारा अथवा धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर वापरू नये.

८. कोणत्याही व्यक्तीची मानहानी किंवा अवहेलना होईल, अशी दृश्ये अथवा मजकूर वापरू नये.

९. न्यायालयाचा अवमान होईल, असा मजकूर किंवा चित्रण करू नये.

१०. देशाच्या सार्वभौमत्वाचा किंवा राष्ट्रीय एकात्मतेचा अवमान करणारी सामग्री वापरू नये.

११. कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊन तिच्यावर हेतुपुरस्सर आरोप करू नयेत किंवा तिचा अपमान करू नये.

१२. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. याठिकाणी आपण आपल्या जाहिराती प्रमाणीत करून घेऊ शकता.

प्रचारासाठी जाहिराती आणि व्हिडिओ तयार करताना भारत निवडणूक आयोगाच्या संबंधित नियमांचे व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले आहे.

***



वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यात 22 ऑक्टोबरपासून खत खरेदीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली • अनुदानित रासायनिक खत खरेदीसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य • ...