Wednesday, October 14, 2026

वृत्त क्रमांक

रब्बी हंगामात अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळा

जमिनीतील ओलावा व पाण्याची उपलब्धता पाहून पीक निवडीचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. १४ : नांदेड जिल्ह्यात परतीच्या मान्सूनचा पुरेसा पाऊस झालेला नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून भूजल पातळीत सरासरी २.५ मीटरने घट झाली आहे. आगामी रब्बी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी ऊस, गहू, मका, चिया यांसारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी पीक निवड करताना जमिनीचा प्रकार, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे प्रमाण यांचा विचार करावा. जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नसल्यास पेरणीची घाई करू नये. संभाव्य एल निनोच्या अंदाजावर पूर्णपणे अवलंबून न राहता प्रत्यक्ष पर्जन्यमान व उपलब्ध पाण्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करूनच रब्बी पिकांची निवड करावी.

कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य

मध्यम काळी जमीन, मर्यादित पाणी उपलब्धता तसेच जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन स्थानिक कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे करडई, हरभरा आणि रब्बी ज्वारी या पिकांना प्राधान्य द्यावे. कोरडवाहू क्षेत्रासाठी शिफारस केलेल्या वाणांचीच निवड करावी.

करडई : कमी पाण्यात घेता येणारे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून करडईचा विचार करावा. मराठवाड्यासाठी परभणी सुवर्णा (PBNS-154), परभणी कुसुम (PBNS-12) तसेच विद्यापीठाच्या अधिकृत शिफारशींनुसार पीबीएनएस-८६ (पूर्णा) या वाणांचा विचार करता येईल.

रब्बी ज्वारी : खोल काळ्या जमिनीत चांगला अवशिष्ट ओलावा उपलब्ध असल्यास रब्बी ज्वारीला प्राधान्य द्यावे. स्थानिक शिफारशींनुसार परभणी सुपर मोती (SPV-2407), परभणी मोती (SPV-1411) आणि पीकेव्ही क्रांती या वाणांचा विचार करावा.

हरभरा : जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध असलेल्या क्षेत्रात हरभरा हे महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. विजय, दिग्विजय, आकाश आणि जाकी-९२१८ यापैकी स्थानिक परिस्थिती, पीक कालावधी, कोरडवाहू क्षेत्रातील अनुकूलता तसेच विद्यापीठाच्या शिफारशी विचारात घेऊन योग्य वाणाची निवड करावी.

पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक

संभाव्य एल निनोचा प्रभाव, पावसातील अनिश्चितता आणि आगामी रब्बी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. पाणी उपलब्धतेपेक्षा अधिक पाण्याची गरज असलेले पीक घेणे टाळून उपलब्ध ओलावा आणि पाण्याच्या क्षमतेनुसार पीक नियोजन करावे, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सांगितले.

जमिनीतील ओलावा, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक शिफारशी यांचा ताळमेळ साधूनच रब्बी पिकांची निवड करावी. पेरणीपूर्वी परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करणे हीच संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची दिशा आहे,असे आवाहन त्यांनी केले आहे.

****

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करा उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून झाडांवरील ताण कमी करण्याचे आवाहन नांदेड(जिमाका),...