वृत्त क्रमांक
उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात
चारा साक्षरता अभियानाला वेग
नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अपेक्षेपेक्षा चारा उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय व कार्यक्षम वापर करून पशुधनास सकस व पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी, नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात व्यापक स्वरूपात ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज गोवंश सुधार प्रकल्प, मौजे घुंगराळा, ता. नायगाव येथे ‘निकृष्ट चारा सकस करणे’ या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. उपलब्ध सोयाबीन कुटारावर युरिया व मोलासेस (काकवी) प्रक्रिया करून चाऱ्याची पौष्टिकता, पाचकता व रुचकरता वाढविण्याची शास्त्रीय पद्धत पशुपालकांना प्रत्यक्ष करून दाखविण्यात आली.
चारा संवर्धन व काटकसरीच्या वापरावर मार्गदर्शन
उपलब्ध चाऱ्याचे योग्य संवर्धन, साठवणूक व व्यवस्थापन करून चारा टंचाईच्या काळात पशुधनासाठी त्याचा प्रभावी आणि काटकसरीने वापर कसा करता येईल, याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य व उत्पादनक्षमता टिकविण्यासाठी उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. प्रविणकुमार घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) अमित राठोड, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन मयूर अंदेलवाड, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोमय गणेशमूर्ती व विविध वस्तूंची भेट
यावेळी गोशाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा गोमयापासून निर्मित गणेशमूर्ती तसेच शेणापासून तयार केलेल्या विविध उपयुक्त वस्तू भेट देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून गोमय व शेणाच्या शाश्वत वापरासोबतच पर्यावरणपूरक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.
***

