वृत्त क्रमांक
चारा साक्षरतेतून चारा टंचाईवर मात
उपलब्ध चाऱ्याचे पौष्टिक मूल्यवर्धन करण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, यंदा अपेक्षेपेक्षा चारा उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय व कार्यक्षम वापर करून पशुधनास सकस व पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर ‘चारा साक्षरता अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत आज पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मौजे नांदेड तालुक्यातील सायाळ येथील प्रक्षेत्रावर ‘निकृष्ट चारा सकस करणे’ या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये सोयाबीन कुटारावर युरिया व मोलासेस (काकवी) प्रक्रिया करून चाऱ्याची पौष्टिकता, पाचकता व रुचकरता वाढविण्याची शास्त्रीय पद्धत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आली.
पर्यायी चारा स्रोतांचा वापर करण्याचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. उपलब्ध चाऱ्याचे पौष्टिक मूल्य वाढविण्यासोबतच अझोला, हायड्रोपोनिक चारा यांसारख्या पर्यायी चारा स्रोतांचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले. चारा व्यवस्थापनासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास उपलब्ध चाऱ्याचा अधिक कार्यक्षम वापर करता येईल, असे त्यांनी सांगितले.
‘जलतारा’ योजनेचा शुभारंभ
यावेळी जलसंवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण ‘जलतारा’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रक्षेत्रावरील एकात्मिक कृषी प्रकल्पास भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली व त्याबाबतची माहिती घेण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय कळसाइत, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, डॉ.नीलकुमार ऐतवडे, कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी येथील शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
No comments:
Post a Comment