Friday, March 17, 2023

वृत्त क्रमांक 126

 स्थूलपणा निदान व उपचार शिबिराचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 17  :- राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे विविध व्याधींचे प्रतिबंधात्मक उपाय व उपचार याबाबत जनजागृती व उपचार अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय नांदेड येथे कायचिकित्सा विभागाअंतर्गत स्थूलपणा निदान व उपचार शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. मंजुषा पाटील, डॉ. विश्वास गोगटे, अध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.   

 

या शिबिराद्वारे स्थूलता निदान व उपचारासाठी निश्चित मोठा लाभ होईल असा विश्वास अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील यांनी व्यक्त केला. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी देऊन स्थूलते बद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावेत व विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करून स्थूलता निवारणा विषयी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा. डॉ. पी. डी. डोंगरे यांनी केले.  

000000

वृत्त क्रमांक 125

 पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे किनवट येथे भव्य आयोजन 

 

·  विविध कंपन्यांचे प्रतिनिधी करणार युवकांची निवड

·  सुमारे 2 हजार युवक-युवतींना मिळणार रोजगार  

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शनिवार 18 मार्च 2023 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय आयटीआय किनवट येथे सकाळी 11 वा. करण्यात आले आहे. उपआयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता औरंगाबाद व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

 

नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी  मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवीआयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त अर्ज करावेत. याबाबत अडचण असल्यास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधवा.

 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर  रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरी साधक (जॉब सिकर) म्हणून नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोकरी साधक (जॉब सिकर) या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित ऑनलाईन रोजगार मेळावा-5 दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील.

 

दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून I Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या Apply बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल अशी माहिती रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी दिली.

00000

वृत्त क्रमांक 124

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी

नवीन अर्ज करण्यास 25 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 साठी पात्र विद्यार्थ्यांना नविन अर्ज करण्यासाठी 25 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांनी आपला अर्ज http://www.syn.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रत (प्रिंट) 25 मार्च 2023 पर्यत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळेसमोरनमस्कार चौक नांदेड येथे कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर नांदेड यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

 

लाभाचे स्वरूप या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे आहे. भोजन भत्ता 28 हजार रुपयेनिवास भत्ता 15 हजार रुपयेनिर्वाह भत्ता 8 हजार रुपयेप्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार रुपयेवरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल. 

 

अर्जाचा नमुनाआवश्यक कागदपत्रे व संकेतस्थळ- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना या  http://www.syn.mahasamajkalyan.inसंकेतस्थळवर उपलब्ध आहे. गरजू विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून सदर अर्जाची एक प्रत सहाय्यक आयुक्त कार्यालयातील स्वाधार शाखेकडे जमा करावीअसेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 123

 कला प्राविण्यासाठीच्या वाढीव गुणाबाबत

प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्च 2023 च्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास 20 मार्च 2023 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

शासन निर्णयानुसार इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत कळविले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे निर्धारीत करण्यात आलेल्या वाढीव मुदतीत माध्यमिक शाळांना अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव सादर करता आले नसल्याने तसेच कोणताही पात्र विद्यार्थी अतिरिक्त गुणांपासून वंचित राहू नये म्हणून 20 मार्च 2023  पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असेल यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. या मुदतीत सर्व विभागीय मंडळ व सर्व माध्यमिक शाळांनी कार्यवाही करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंडळाने दिले आहेत.

00000   

वृत्त क्रमांक 122

 मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

▪️सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मराठवाड्यातील मान्यवरांचा होणार गौरव
▪️अर्जापूर येथे हुतात्मा पानसरे यांच्या अभिवादनाने
होणार शुभारंभ
▪️खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली
आढावा बैठकीत नियोजन
नांदेड (जिमाका) दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षाला साजेशा विविध उपक्रमांचे आयोजन भव्य प्रमाणात हाती घेतले असून याचा प्रातिनिधीक शुभारंभ अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून केला जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते येत्या 31 मार्च, 1 एप्रिल या कालावधीत हा शुभारंभ व बंदाघाट येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हाती घ्यावयाच्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित करण्यासाठी उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, समिती सदस्य संपादक शंतनू डोईफोडे, प्रवीण साले, सुनिल नेरलकर, लक्ष्मण संगेवार, आनंदी विकास, प्रा. निवृत्ती कौसल्ये , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, डॉ. सान्वी जेठवाणी आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते विचारविनिमय करून कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात आली.
मराठवाडा मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्ह्याचे योगदान हे अपूर्व आहे. यात उमरी येथील लढा असो, कल्लाळी येथील संघर्ष असो, नांदेड येथील झेंडा सत्याग्रह असो, ताडी झाडासाठी प्रातिनिधीक अंदोलन असो, या सर्व प्रत्येक घटना मराठवाड्याच्या मुक्तीसाठी मोलाचा टप्पा ठरलेल्या आहेत. या योगदानाला अधोरेखित करण्यासह हुतात्म्यां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जिल्हा पुढे सरसावेल असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
असे असतील कार्यक्रम
बंदाघाट येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम
महिना अखेरीस अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंदाघाट येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लोकधारा व लोकपरंपरा यांना अधोरेखीत करणारा हा भव्य कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक घटनांची संक्षिप्त माहिती असणारी टेबलटॉप दर्शिका प्रकाशित केली जाणार जाईल. याचबरोबर ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांचे व्याख्यान शासनाच्या विविध संकेतस्थळावरुन प्रसारीत केले जाणार आहे. याचे प्रातिनिधीक विमोचनही या कार्यक्रमात प्रस्तावित करण्यात आले.
जिल्ह्यातील मान्यवरांचा सन्मान
मराठवाड्याच्या मुक्तीनंतर खऱ्या अर्थाने अमृत महोत्सवी वाटचालीत अनेकांनी विविध क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आहे. शेती, ग्रामविकास, सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य, संगीत आदी क्षेत्रात अनेकांनी नांदेड जिल्ह्याचा गौरव वृद्धींगत केला आहे. या प्रातिनिधीक मान्यवरांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हा गौरव त्या-त्या क्षेत्रानुसार आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात केला जाईल.
उमरी, टेळकी, अर्जापूर, इस्लापूर, नांदेड येथे होणार ऐतिहासिक जागर
मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात उमरी येथील रेल्वे, बँक, पोलीस स्टेशनचा लढा व्यापक आहे. ही लुटीतील प्रत्येक पैशाचा हिशोब अंदोलनकर्त्यांनी देऊन सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा ही आदर्श सर्वांपुढे ठेवला. इस्लापूर येथील पोलीस स्टेशनच्या हल्ल्यात स्वातंत्र्यासाठीची मनिषा उराशी बाळगून काहींनी हौतात्म्य पत्करले. अर्जापूर येथील हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या बलिदानाला कोण विसरेल. टेळकी येथील निजामाने केलेल्या गोळीबारात अनेक शहीद झालेत. मराठवाड्याच्या मुक्तीच्या लढ्यातील या ऐतिहासिक घटनांची स्मरण हे शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करून केले जाणार आहे. त्यादृष्टिने जिल्ह्यातील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गावात प्रातिनिधीक स्वरुपात कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्र गिताचा जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जागर
शालेय विद्यार्थ्यांपर्यंत स्वातंत्र्याच्या, मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या शहिदांप्रती कृतज्ञता निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत येत्या महिन्यांमध्ये राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि मराठवाडा गिताचे सामुहिक गायन केले जाईल. यात जिल्ह्यातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांचा समावेश करून घेण्याचे निश्चित करण्यात आले.
नाट्य, क्रीडा आणि साहित्याचाही उत्सव
अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नाट्य स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. येत्या सप्टेंबर पर्यंत शालेय परीक्षांचे नियोजन व इतर बाबी लक्षात घेऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाणार आहे.
मराठवाड्यातील लोककला व भुमिपुत्रांचा सन्मान
मराठवाड्यातील लोककलेला वृद्धींगत करून यात अनेक कलावंतांनी आपले योगदान दिले आहे. समाजातील वाईट प्रवृत्तीबद्दल आवाज उठवून आपल्या वग-नाट्याद्वारे मनोरंजनासह प्रबोधन ही लोककलेची मोठी देण आहे. त्यादृष्टीने मराठवाड्यातील लोककलावंतांचा प्रातिनिधीक सन्मान करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
******




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...