Friday, March 17, 2023

वृत्त क्रमांक 122

 मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

▪️सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मराठवाड्यातील मान्यवरांचा होणार गौरव
▪️अर्जापूर येथे हुतात्मा पानसरे यांच्या अभिवादनाने
होणार शुभारंभ
▪️खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली
आढावा बैठकीत नियोजन
नांदेड (जिमाका) दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षाला साजेशा विविध उपक्रमांचे आयोजन भव्य प्रमाणात हाती घेतले असून याचा प्रातिनिधीक शुभारंभ अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून केला जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते येत्या 31 मार्च, 1 एप्रिल या कालावधीत हा शुभारंभ व बंदाघाट येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हाती घ्यावयाच्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित करण्यासाठी उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, समिती सदस्य संपादक शंतनू डोईफोडे, प्रवीण साले, सुनिल नेरलकर, लक्ष्मण संगेवार, आनंदी विकास, प्रा. निवृत्ती कौसल्ये , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, डॉ. सान्वी जेठवाणी आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते विचारविनिमय करून कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात आली.
मराठवाडा मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्ह्याचे योगदान हे अपूर्व आहे. यात उमरी येथील लढा असो, कल्लाळी येथील संघर्ष असो, नांदेड येथील झेंडा सत्याग्रह असो, ताडी झाडासाठी प्रातिनिधीक अंदोलन असो, या सर्व प्रत्येक घटना मराठवाड्याच्या मुक्तीसाठी मोलाचा टप्पा ठरलेल्या आहेत. या योगदानाला अधोरेखित करण्यासह हुतात्म्यां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जिल्हा पुढे सरसावेल असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
असे असतील कार्यक्रम
बंदाघाट येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम
महिना अखेरीस अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंदाघाट येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लोकधारा व लोकपरंपरा यांना अधोरेखीत करणारा हा भव्य कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामातील नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक घटनांची संक्षिप्त माहिती असणारी टेबलटॉप दर्शिका प्रकाशित केली जाणार जाईल. याचबरोबर ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांचे व्याख्यान शासनाच्या विविध संकेतस्थळावरुन प्रसारीत केले जाणार आहे. याचे प्रातिनिधीक विमोचनही या कार्यक्रमात प्रस्तावित करण्यात आले.
जिल्ह्यातील मान्यवरांचा सन्मान
मराठवाड्याच्या मुक्तीनंतर खऱ्या अर्थाने अमृत महोत्सवी वाटचालीत अनेकांनी विविध क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आहे. शेती, ग्रामविकास, सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य, संगीत आदी क्षेत्रात अनेकांनी नांदेड जिल्ह्याचा गौरव वृद्धींगत केला आहे. या प्रातिनिधीक मान्यवरांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हा गौरव त्या-त्या क्षेत्रानुसार आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात केला जाईल.
उमरी, टेळकी, अर्जापूर, इस्लापूर, नांदेड येथे होणार ऐतिहासिक जागर
मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात उमरी येथील रेल्वे, बँक, पोलीस स्टेशनचा लढा व्यापक आहे. ही लुटीतील प्रत्येक पैशाचा हिशोब अंदोलनकर्त्यांनी देऊन सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा ही आदर्श सर्वांपुढे ठेवला. इस्लापूर येथील पोलीस स्टेशनच्या हल्ल्यात स्वातंत्र्यासाठीची मनिषा उराशी बाळगून काहींनी हौतात्म्य पत्करले. अर्जापूर येथील हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या बलिदानाला कोण विसरेल. टेळकी येथील निजामाने केलेल्या गोळीबारात अनेक शहीद झालेत. मराठवाड्याच्या मुक्तीच्या लढ्यातील या ऐतिहासिक घटनांची स्मरण हे शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करून केले जाणार आहे. त्यादृष्टिने जिल्ह्यातील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गावात प्रातिनिधीक स्वरुपात कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्र गिताचा जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जागर
शालेय विद्यार्थ्यांपर्यंत स्वातंत्र्याच्या, मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या शहिदांप्रती कृतज्ञता निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत येत्या महिन्यांमध्ये राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि मराठवाडा गिताचे सामुहिक गायन केले जाईल. यात जिल्ह्यातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांचा समावेश करून घेण्याचे निश्चित करण्यात आले.
नाट्य, क्रीडा आणि साहित्याचाही उत्सव
अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नाट्य स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. येत्या सप्टेंबर पर्यंत शालेय परीक्षांचे नियोजन व इतर बाबी लक्षात घेऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाणार आहे.
मराठवाड्यातील लोककला व भुमिपुत्रांचा सन्मान
मराठवाड्यातील लोककलेला वृद्धींगत करून यात अनेक कलावंतांनी आपले योगदान दिले आहे. समाजातील वाईट प्रवृत्तीबद्दल आवाज उठवून आपल्या वग-नाट्याद्वारे मनोरंजनासह प्रबोधन ही लोककलेची मोठी देण आहे. त्यादृष्टीने मराठवाड्यातील लोककलावंतांचा प्रातिनिधीक सन्मान करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
******




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...